Sunday, October 19, 2025
Homeलेखआम्ही संगमनेरकर....

आम्ही संगमनेरकर….

सौ शहरी आणि एक संगमनेरी’  अशी ओळख असलेल्या संगमनेरची एका लेखात ओळख करून देणे केवळ अशक्य आहे. त्यातून संगमनेर माझं आजोळ, त्यामुळे तर विशेषच ममत्व आहे. अशा या संगमनेर विषयी सांगतायत डॉ. संतोष खेडलेकर.

डॉ. संतोष खेडलेकर हे संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचे संस्थापक आहेत. तसेच कवी अनंत फंदी साहित्य पुरस्कार समितीचे प्रमुख व महाराष्ट्र शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाचे विद्यमान सदस्य आहेत……..-संपादक.

सुमारे तेवीसशे वर्षांपूर्वी म्हणजे सातवाहन काळात संगमनेर नावाचे गाव वसल्याचे म्हटले जाते. शहराला संगमनेर हे नाव मिळण्यामागे इथे झालेला चार नद्यांचा संगम हे महत्वाचे कारण आहे. शहराच्या पश्चिमेला म्हाळुंगी आणि म्हानुटी या दोन नद्यांचा संगम होतो आणि म्हानुटी हे नाव मागे पडून म्हाळुंगी नदी पुढे मार्गक्रमण करते. अवघ्या दीड दोन फर्लांग अंतरावर प्रवरा आणि म्हाळुंगी या दोन मुख्य नद्यांचा संगम होतो आणि म्हाळुंगी प्रवरेत एकरूप होऊन जाते. यानंतर पावसाळ्यात कधीतरी दोन चार तास पूर येऊन पूर्वेकडून येणारी वाहतूक ठप्प करणारी नाटकी नदी जवळच प्रवरेला मिळते. दोन ताम्रपटांवर संगमनेरचा उल्लेख ‘संगमिका’ म्हणून तर प्रवरा नदीचा उल्लेख ‘पयोधरा’ असा आढळून येतो.

निजामशाही, मोगलकाळ, शिवकाल, पेशवाई, ब्रिटीशराज या सर्वच कालखंडात संगमनेर हे महत्वाचे ठिकाण राहिलेले आहे. जहांगीरशी वाद झाल्यावर शहाजहान आणि मुमताज आपली मुले दाराशुकोह आणि औरंगजेबासाह संगमनेरमध्ये आश्रयाला आले होते असे सेतू माधवराव पगडी यांनी लिहून ठेवले आहे.

छत्रपती शिवरायांच्या जन्मापूर्वी शहाजीराजे आणि जिजाऊसाहेब संगमनेरच्या देशमुखांच्या वाड्यात राहून गेल्याची नोंद गो. नी. दांडेकरांनी आपल्या ‘शिवकाल’ या ग्रंथात केलेली आहे. असा मोठं वारसा सांगणाऱ्या संगमनेरचे नाव सर्वदूर पोहोचवणाऱ्या लोकांची यादी तर खूप मोठी आहे.

‘बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको’ या गाजलेल्या फटका काव्याचे करते, पेशवाईत ज्येष्ठत्वाचा मान असणारे आणि तमाशाच्या इतिहासात आपला स्वतःचा तमाशा संच असलेले पहिले ज्ञात तमाशाकलाकार म्हणून प्रसिद्धीस पावलेले कवी, शाहीर अनंत फंदी हे संगमनेरचेच. पेशवाईतील साडेतीन शहाणे या चौकडीतील पूर्ण शहाणे म्हणून ओळखले जाणारे विठ्ठल सुंदर परशरामी हे देखील संगमनेरचे. त्यांच्या भव्य वाड्याच्या जागेवर सध्या संगमनेरचे पेटीट विद्यालय वसलेले आहे.

पेटीट विद्यालय

पेशव्यांचे कर्तबगार सरदार व ग्वाल्हेरचे महाराजे महादजी शिंदे हे संगमनेरचे जावई. महादजी शिंदे यांची चौथी पत्नी भवानीबाई या संगमनेरच्या म्हस्के – देशमुखांच्या कन्या होत्या. भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे सासर संगमनेर. त्याचे पती गोपाळराव जोशी हे संगमनेरचे.

तमाशासृष्टीतील पहिली स्त्री कलाकार म्हणून ओळखली जाणारी पवळाबाई हिवरगावकर या संगमनेर शेजारच्या हिवरगाव पावसा या गावच्या होत्या. लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे मूळगाव संगमनेर तालुक्यातले चिकणी. ज्येष्ठ तमाशा कलावती कांताबाई सातारकर यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी स्थायिक व्हायचे ठरवले तेव्हा संगमनेरचीच निवड केली आणि आपला अखेरचा श्वासही इथेच घेतला.

सुप्रसिद्ध अभिनेता आणि सौमित्र नावाने काव्यरचना करणाऱ्या किशोर कदम यांचे मूळगाव संगमनेर तालुक्यातले तळेगाव दिघे.

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू अजिंक्य रहाणे याचे मूळ गाव संगमनेर शेजारील चंदनापुरी. त्याच्या वडिलांचे बालपण आणि शिक्षण इथेच झाले.

संगमनेर हे असे गाव आहे याच्या अंतरंगात डोकावयाचे झाले तर आपल्या नेहमीच्या डोळ्यांबरोबर मनाचे डोळे उघडून बघितले तर या गावाचे मोठेपण थेट हृदयात उतरते. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय वारसा लाभलेल्या संगमनेरने हा वारसा आजही पुढे सुरु ठेवलेला आहे. संगमनेरचे पेटीट विद्यालय हे संगमनेरच्या अनेक चळवळींचे केंद्रबिंदू राहिलेले आहे.

१९०८ पासून पुढे दोन दशकाहून अधिक काळ पेटीट विद्यालयाचे मुख्याध्यापक राहिलेल्या देवीदास भास्कर लेले यांनी अनेक गोष्टींची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी सर्वप्रथम वर्गाबाहेर बसवल्या जाणाऱ्या दलित विद्यार्थ्यांना वर्गात बसवायला सुरुवात केली. मराठी माध्यमाच्या शाळेत त्यावेळी कुठेही न होणारा हिंदी शिकवण्याचा प्रयोग सुरु केला. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यासारख्या सुधारकांची व्याख्याने आयोजित केली. सर्वप्रथम स्वतःच्या मुलीला हायस्कूलमध्ये शिकवायला पाठवून मुलींच्या माध्यमिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.

संगमनेरचा स्वातंत्र्यसंग्राम हे तर संगमनेरच्या इतिहासातले सुवर्णपान. लेले मास्तर, रामकृष्णदास महाराज, भैय्यासाहेब कुलकर्णी, नामदेवराव नवले, मुरलीधर जयराम मालपाणी, टी. के. जोशी, काकासाहेब पिंगळे, गंगाधर दळवी, नारायणराव परदेशी, पांडुरंग मंचरकर, राम नागरे, तुकाराम बाळाजी निऱ्हाळी, बापूसाहेब पारेगावकर, पनालाल लोहे, पनालाल लाहोटी आदींच्या नेतृत्वाखाली शहरात तर तालुक्यात भाऊसाहेब थोरात आदी मंडळी स्वातंत्र्यसंग्रामात काम करीत होती.

स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात ८१८ मे १९१७ रोजी लोकमान्य टिळकांची तर २२ मे १९२१ रोजी महात्मा गांधींची संगमनेरला सभा झाली.

१९३७ मध्ये ब्रिटीश सरकारने पहिल्यांदाच असेंब्ली निवडणुका जाहीर केल्या तेव्हा संगमनेरचे के. बी. देशमुख उर्फ केबी दादा हे कॉंग्रेसचे उमेदवार होते. केबी दादांच्या प्रचारासाठी १५ फेब्रुवारी १९३७ रोजी
नेहरूंची संगमनेरला सभा झाली.

याखेरीज साने गुरुजी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, आचार्य अत्रे, संत तुकडोजी महाराज ही मंडळीही संगमनेरला येऊन गेली आहे.

१९२० च्या दरम्यान संगमनेरला, खासगी मोटार कंपन्यांचा प्रवासी वाहुतुकीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर बहरला होता. सध्याचा नेहरू चौक त्यावेळी जुना मोटार अड्डा म्हणून ओळखला जायचा. पुढे सध्याच्या सय्यदबाबा चौकात मोटार अड्डा आला. सरकारची बससेवा सुरु झाली तेव्हा अगदी गावाबाहेर म्हणजे सध्याच्या बस स्थानकाच्या जागेवरून प्रवासी वाहतूक सुरु झाली.

हातमाग हा संगमनेरचा सर्वात मोठं व्यवसाय. स्वातंत्र्यपूर्व काळात संगमनेरमध्ये सुमारे तीन हजार हातमाग होते. १९४०च्या दरम्यान संगमनेरला वीज आली. १९२६ मध्ये भंडारदऱ्याला धरण झाले तरी संगमनेर तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जायचा. १९५९ मध्ये संगमनेरला नळ योजना सुरु झाली.

भंडारधरा धरण

काळाच्या ओघात यंत्रमाग आले, मुंबई आणि इतर ठिकाणच्या मोठ्या कापड गिरण्यांमधून कापडाचे उत्पादन होऊ लागले आणि संगमनेरचा वस्त्रनिर्मिती उद्योग काळाच्या ओघात नष्ट होत गेला. १९८५ च्या दरम्यान हा उद्योग पूर्णतः संपला. परंतु त्यापूर्वी तीन चार दशके अगोदर इथे बिडी उद्योगाने बाळसे धरले. संगमनेर शहराबरोबरच ग्रामीण भागात अनेक स्त्रिया कुटुंबाला हातभार लावण्यासाठी विड्या वळण्याचे काम करायच्या. आजही कमी अधिक प्रमाणात हे काम सुरु आहे.

१९६९ मध्ये संगमनेरला साखर कारखाना सुरु झाला, तंबाखू उद्योगही अधिक विस्तारला जाऊ लागला. या दोन्ही उद्योगांमुळे संगमनेरला रोजगाराच्या संधी तर निर्माण झाल्याच परंतु संगमनेरचा व्यापार अधिक बहरला.

आज संगमनेर व्यापारीदृष्ट्या अतिशय संपन्न शहर आहे. इथल्या व्यापाऱ्यांची सचोटी, ग्राहकांप्रती असलेली बांधिलकी यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यातून लोक खरेदीसाठी संगमनेरला येतात.

ज्या गावात आर्थिक स्थैर्य असते, शैक्षणिक सुविधा असतात तिथे सांस्कृतिक वातावरण बहरण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते. आज तालुका पातळीवरील गावात वर्षभरात होणाऱ्या सांस्कृतिक उपक्रमाची तुलना केली केली तर संगमनेरला जितके कार्यक्रम होतात तितके खचितच इतरत्र होत असतील.

व्याख्यानमालांना प्रेक्षक जमत नाही अशी ओरड असण्याच्या काळात संगमनेरला कवी अनंत फंदी व्याख्यानमालेला तिकीट काढून रसिक येतात. संगमनेर फेस्टिव्हल, भाऊसाहेब थोरात यांचा जयंती महोत्सव, संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचा कवी अनंत फंदी साहित्य पुरस्कार सोहळा, दिवाळी पहाट गाणी कार्यक्रम, सर्वोदय उत्सव, सय्यद बाबांच्या उरुसातील कव्वाल्यांचे बहारदार कार्यक्रम याखेरीज वेगवेगळ्या लहानमोठ्या संस्थानच्या वतीने वर्षभर कार्यक्रमांची रेलचेल सुरु असते.

संगमनेरची दुसरी ओळख म्हणजे इथली खाद्य संस्कृती. संगमनेरची मिसळ, मिठ्ठावडा, भेळ या गोष्टी सर्वदूर प्रसिद्ध आहेत. पारंपरिक महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ मिळणारी हॉटेल्सही आता संगमनेर परिसरात लोकप्रिय होत आहेत. धान्य आणि उसाबरोबर, डाळींब, भाजीपाला अशी नगदी पिके आणि जोडीला दुग्ध व्यवसाय करून इथल्या ग्रामीण भागात सुबत्ता आली आहे.

संगमनेर चा प्रसिध्द मिठ्ठा वडा

संगमनेरची साहित्य परंपराही समृद्ध आहे. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक रंगनाथ पठारे, ज्येष्ठ विचारवंत, लेखक व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रा. डॉ. रावसाहेब कसबे, संस्कृत व मराठीत विपुल साहित्यसंपदा निर्माण करणाऱ्या दिवंगत लेखिका प्रा. डॉ. विमल लेले ही मंडळी संगमनेरचीच.

महाराष्ट्राच्या राजकारणातही मागील आठ दशकांहून अधिक काळापासून संगमनेरचा एक वेगला ठसा उमटलेला आहे. संगमनेरचे पहिले आमदार के.बी. देशमुख यांनी निवडून आल्यावर आपलाच पक्ष निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळीत नाही म्हणून स्वपक्षाविरोधात बंड केले. गावोगाव शेतकरी परिषदा घेऊन सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर आणि प्रांतिकच्या कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची तक्रार थेट तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्ष सुभाषचंद्र बोस यांच्याकडे केली होती. देशाच्या इतिहासात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने आपल्याच पक्षाच्या वरिष्ठांच्या विरोधात बंड करण्याची ही देशातील पहिलीच घटना असावी.

यानंतर आमदार झालेल्या दत्ता देशमुखांची ओळख कष्टकरी, शेतकऱ्यांचे नेते अशीच होती. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात दत्तांनी महत्वाची भूमिका बजावली.

१९६२ मध्ये कॉंग्रेसकडून निवडून आलेल्या बी.जे. खताळ यांनी राज्यभर आपल्या कामाचा ठसा उमटवला. अनेक धरणे, अनेक नाविन्यपूर्ण योजना आखून त्यांनी महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरचा महाराष्ट्र घडविण्याचे काम केले.

आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेरच्या सहकारात शिस्त आणून सहकारात असंख्य प्रयोग केले.

१९८५ पासून ते आजतागायत सातत्याने निवडून येऊन राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विद्यमान महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी खऱ्या अर्थाने संगमनेर तालुक्याचा कायापालट केला.

एक संगमनेरकर म्हणून माझ्याच गावाच्या वेगळेपणाचा, विविध क्षेत्रातील योगदानाचा विचार करताना मनापासून अभिमान वाटतो की मी संगमनेरकर आहे. इतका समृद्ध वारसा असलेल्या गावात आज आम्ही सर्वजण हा वारसा एखादा वसा घेतल्याप्रमाणे पुढे नेत आहोत. इथले सणउत्सव, इथला उद्योग व्यवसाय, इथले सांस्कृतिक वातावरण, इथले शैक्षणिक वातावरण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे इथली अस्सल सौ शहरी आणि एक संगमनेरी माणसं हे सगळंकाही जगावेगळं आहे.

संतोष खेडलेकर

– लेखन : डॉ. संतोष खेडलेकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

ॲड.श्रध्दा बापूसाईनाथ राऊळ. आरवली.. on माणसांच्या गर्दीतूनी या…!!
संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप