Home बातम्या *आम्ही सिद्ध लेखिका संस्थेचे चौथे राज्यस्तरीय साहित्य संमेलन*

*आम्ही सिद्ध लेखिका संस्थेचे चौथे राज्यस्तरीय साहित्य संमेलन*

0

“आम्ही सिद्ध लेखिका” संस्थेचे चौथे दोन दिवसीय राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन नुकतेच मिरज येथील पटवर्धन सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या संमेलनासाठी विविध ठिकाणांहून 200 लेखिका उपस्थित होत्या.

मा. सोनाली नवांगुळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या संमेलनाची सुरुवात सकाळी ग्रंथदिंडीने झाली.डॉ. जयश्री श्रेणिक पाटील उद्घाटक, मा. उषाताई चांदोरकर या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष तर डॉ. छाया महाजन आणि भूमी मगदूम या विशेष अतिथी होत्या.

स्वागताध्यक्ष उषाताई चांदुरकर यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरीही ती समृद्ध करण्यासाठी आपण आता प्रयत्न करणे गरजेचे आहे, बोली भाषेमधून साहित्य निर्मिती करणे तसेच तंत्रज्ञानाचा उपयोग करून साहित्य अनुवादित करणे अशा अनेक मुद्द्यांवर आपल्या भाषणात विचार मांडले.

डॉ. छाया महाजन यांनी प्रत्येक लेखिकेने आपल्यातील साहित्याचा आस्वाद घेण्याची क्षमता काय आहे, लेखक वाचक संवाद होतो आहे का,  लेखनात नवीन संकल्पना येत आहेत का, या मुद्द्यांवर आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे असे अधोरेखित केले.

उद्घाटक डॉ. जयश्री श्रेणिक यांनी लोकसाहित्याची महती  विषद केली.

संमेलनाध्यक्ष मा. सोनाली नवांगुळ यांनी स्त्रियांनी डिजिटल साक्षर होणे ही काळाची गरज आहे, धार्मिक आस्था असायला हरकत नाही पण त्याचे स्तोम माजवू नये असे विचार मांडले.

या संमेलनात 11 लेखिकांची  पुस्तके मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित झाली.

माननीय डॉ. तारा भवाळकर यांची प्रकट मुलाखत हे या संमेलनाचे आकर्षण होते. या मुलाखतीतून जगण्याबद्दलचे तत्त्वज्ञान ऐकायला मिळाले. स्वातंत्र्य हे मागून मिळत नाही ते मिळवावे लागते असं त्या म्हणाल्या.

कवी संमेलन, गझल मुशायरा, सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद, कथाकथन अशी आणखी काही सत्रे या दोन दिवसीय संमेलनात आयोजित करण्यात आली.

परिसंवाद सत्रात प्रादेशिक मराठी साहित्यातील दीपाशीखा ह्या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. ज्यात मराठी प्रांतिक स्त्री लेखकांवर रचना, आरती दिनकर, स्नेहल पाठक, पद्मा हुशिंग, वासंती वर्तक, संध्या महाजन यांनी माहिती दिली.

परिसंवाद सूत्रसंचालन अस्मिता चौधरी आणि प्रतिभा चांदुरकर यांनी केले.

आम्ही सिद्ध लेखिका संस्थेच्या अध्यक्षा प्रा. पद्मा हुशिंग यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सांगली जिल्हा अध्यक्ष मनीषा रायजादे पाटील आणि सांगली जिल्हा कार्यकारिणीने या संमेलनाचे आयोजन केले होते.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version