मित्रांनो, तुम्ही आम्ही सगळेच जण प्रवास करतो. परंतु आपल्या प्रवासाला काही मर्यादा आहेत, आपला प्रवास असतो तो काही वेळेपूरता किंवा काही दिवसांचा.
आपला प्रवास अगदीच काही किलोमीटर मध्ये असतो आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला प्रवास केव्हा संपणार आहे आणि आपलं ‘डेस्टिनेशन’ काय आहे हे आपल्याला माहित असतं.
परंतु तुम्ही कधी अशा प्रवासाबद्दल ऐकलं का जो प्रवास कधीही न संपणारा आहे, कधीही न थांबणारा आहे.?
आहे ना खरंच आश्चर्य…….!
चला तर मग अशाच एका विलक्षण प्रवासाबद्दल जाणून घेऊ या.
एक वस्तू अवकाशात अशा प्रवासाला निघालेली आहे जिथे त्या प्रवासाला अंत नाही, अनंताकडे प्रवास !!
त्याचं नाव आहे व्हॉयेजर 1 हे यान !
आता या यानाने निघाल्यापासून आतापर्यंत किती प्रवास केला आहे ?
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, ह्या यानाने निघाल्यापासून आत्तापर्यंत अडीच हजार कोटी किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पार केलं आहे. 1977 पासून हे यान अनंत अवकाशात सतत प्रवास करत आहे. आज 50 वर्षांपासून हया यानाचा प्रवास हा न थांबता सतत चालू आहे.
चला तर मग अशा या उद्भुत याना बद्दल आणि त्याच्या विलक्षण प्रवासाबद्दल आणखी थोडे जाणून घेऊया.
या यानाचा प्रवास आणि कुतुहल तुम्हाला थक्क करून सोडेलच पण त्याच बरोबर आपले मानवी जीवन हया विश्वाच्या अफाट पसाऱ्यात किती नगण्य आहे हेही कळेल.
भाग 1: उद्देश
हे यान अंतराळात का सोडण्यात आलं….?
नासाचे शास्त्रज्ञ व्हॉयेजर 1 यानाच्या प्रवास मोहिमेवर काम करत होते, त्यांना असं यान बनवायचे होतं जे सूर्यमालेतील सगळ्या ग्रहांची माहिती पुरवेल, सूर्यमालेतील प्रत्येक ग्रहांची माहिती, त्यांचे उपग्रह, त्या ग्रहांवर घडणाऱ्या अद्भुत आणि विलक्षण गोष्टी या सर्वांची माहिती हे यान पृथ्वीवर पोहोचवणार होतं. मग हे यान 1977 सालीच का अवकाशात सोडण्यात आलं?
त्याच्यामागे अत्यंत शास्त्रीय एक महत्त्वाचं कारण होतं, अवकाशात दर 175 वर्षांनी एक दुर्मिळ संधी येते ती म्हणजे आपल्या सूर्यमालेतील चार ग्रह गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्युन एका विशिष्ट रेषेत येतात. याचा फायदा असा होता की एका ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून आपण यानाला पुढच्या ग्रहाकडे ढकलू शकत होतो. वैज्ञानिक भाषेत याला “ग्रॅव्हिटी असिस्ट” असे म्हणतात. गॅरी फ्लेँड्रॉ नावाच्या एका इंजिनियरने ही माहिती नासा समोर मांडली आणि ही संधी जर 1977 साली हुकली असती तर पुढची संधी थेट 2152 साली मिळणार होती, याचा अर्थ आपल्या येणाऱ्या दोन ते तीन पिढ्यांपर्यंत ही संधी कुणालाही मिळाली नसती.
शास्त्रज्ञांनी ठरवलं की कोणत्याही परिस्थितीत हे यान पाठवायचं कारण हीच आता एकमेव आणि दुर्मिळ संधी आहे.
5 सप्टेंबर 1977… अमेरिकेतल्या फ्लोरिडा मधून या यानाने अंतराळात झेप घेतली.

व्हॉयेजर या शब्दाचा असा अर्थ आहे की असा प्रवासी जो खूप लांबच्या आणि अज्ञात प्रवासाला निघालेला आहे. यानाचे वजन होतं 815 किलो.
त्याचे छोटेसे इंजिन, त्यात छोटे न्यूक्लिअर जनरेटर बसवलेले होते. प्लुटोनियम 238 च्या रेडिएशन पासून मिळणाऱ्या उष्णतेतून हे यान आपली वीज स्वतः तयार करत होतं.
याची मेमरी 69.63 किलो बाईट म्हणजे एका साध्या फोटो पेक्षाही कमी!
भाग 2 : अवकाश प्रवेश आणि सूर्यमालेत प्रवास
या प्रवासातील यानाचे सर्वात पहिले लक्ष सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु हे होतं.
या यानाने गुरुच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून आपला वेग कित्येक पटीने वाढवला. मार्च 1979 मध्ये जेव्हा हे यान गुरूच्या कक्षेच्या जवळ पोहोचलं आणि त्याने जो फोटो पाठवला त्या फोटोने संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले.
यानाला गुरु ग्रहावर दिसला तो ग्रेट रेड स्पॉट!
हा ग्रेट रेड स्पॉट म्हणजे प्रत्यक्षात गुरु ग्रहावर आपल्या पृथ्वीपेक्षाही मोठं एक महाकाय वादळ आहे जे 300 वर्षांपासून तेथे सुरू आहे, हे इतकं मोठं वादळ आहे की यात पृथ्वी सारखे दोन ते तीन ग्रह सामावू शकतात. या वादळाचं रुद्र रूप मानवाला यानामुळे बघायला मिळाले. मात्र आता या वादळाचा प्रभाव हळूहळू कमी होत चालला आहे.
गुरु ग्रह सूर्यमालेतील सर्वात मोठा आणि जड ग्रह आहे. हा इतका विशाल आहे की आपल्या पृथ्वीसारखे तीनशे ग्रह यात सहज सामावू शकतात. सर्वात वेगाने फिरणाऱ्या या ग्रहाचा एक दिवस अवघ्या दहा तासांचा आहे. गुरु ग्रहाकडे 95 चंद्र आहेत.
आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट नासाचे इंजिनियर लींडा मोराबिटो यांना यानाने पाठवलेल्या गुरूच्या चंद्र आयवो च्या फोटोचा अभ्यास करताना त्यांना एका फोटोत या चंद्राच्या कडेला धुरांचा लोट दिसला जो प्रत्यक्षात एक सक्रिय ज्वालामुखी होता. पृथ्वी बाहेर सक्रिय ज्वालामुखी असण्याचा हा पहिलाच पुरावा होता. इतकच नाही तर गुरुचा दुसरा चंद्र युरोपा च्या बर्फाळ पृष्ठभागाखाली महासागर असू शकतो ही माहिती यानामुळे जगासमोर आली. नासा आज युरोपावर जीवसृष्टी शोधत आहे त्याचं मूळ ह्याच माहितीमध्ये दडलेलं आहे.
गुरु ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून हे यान शनी ग्रहाकडे निघालं. नोव्हेंबर 1980 मध्ये शनि ग्रहाच्या कक्षेत पोहोचलो. शनी ग्रह भोवती असलेले मोठे कडे प्रत्यक्षात दगड आणि बर्फाच्या असंख्य तुकड्यांनी बनलेलं आहे हे या यानाने पाठवलेल्या माहितीमुळे जगाला स्पष्ट झाले.
शास्त्रज्ञांना शनि चा सर्वात मोठा चंद्र टायटन याचा सखोल अभ्यास करायचा होता. याच्यावर अत्यंत दाट वातावरण असल्याचे लक्षात आल्यावर त्याचा सखोल अभ्यास करणे वैज्ञानिक दृष्टीने अतिशय आवश्यक होते. हा अभ्यास करण्यासाठी यानाच्या मार्गात बदल करण्यात आला.
या एका निर्णयामुळे यानाला ला सूर्यमालेतील पुढील बाह्यग्रहांच्या अभ्यासाची संधी मिळाली नाही. मात्र टायटन विषयी मिळालेली माहिती क्रांतिकारी ठरली, तिथे द्रव मिथेनचे महासागर असण्याची शक्यता यानामुळे पहिल्यांदा समोर आली. ह्या मोहिमेमुळे मानवाला सूर्यमालेतील अनेक रहस्यांची माहिती मिळाली.
शनि ग्रहानंतर यानाचा प्रवास सूर्यमालेच्या बाहेरील अथांग प्रदेशाकडे सुरू झाला. आता त्याच्या मार्गावर कोणताही ग्रह नव्हता. सोबतीला कोणीही नव्हतं. होता तो फक्त अथांग अंधार आणि अनंत अंतराळ. टायटनच्या अभ्यासासाठी यानाचा मार्ग बदलल्याने ते युरेनस आणि नेपच्यून कडे जाऊ शकले नाही. ही जबाबदारी मग व्होयेंजर 2 ने यशस्वीपणे पार पाडली.
भाग 3 : अनंतात सुरु झालेला प्रवास
यानंतर यानाने आपल्या सूर्यमालेच्या सीमेकडे आपला प्रवास सुरू केला. 1980 पासून पुढे अनेक वर्ष हे यान शांतपणे अवकाशात पुढे जात राहिले. मात्र त्या काळात पृथ्वीवर तंत्रज्ञानाची मोठी क्रांती झाली होती. इंटरनेट आले, संगणकाचे स्वरूप बदललं आणि जग पूर्णपणे बदलून गेलं, पण या सर्व बदलांमध्ये हे यान मात्र कुठेही थांबलं नाही. ते आजही अथांग अवकाशात एका अज्ञात आणि अनंत दिशेला आपला ऐतिहासिक प्रवास करत आहे.
पेल ब्ल्यू डॉट : 14 फेब्रुवारी 1990 हा यानाच्या आयुष्यातला ऐतिहासिक दिवस. त्यावेळी हे यान पृथ्वीपासून सुमारे 600 कोटी किलोमीटर इतक्या दूर अंतरावर पोहोचलं होतं.
त्यावेळी या यानाच्या मोहिमेवर काम करणारे प्रसिद्ध शास्त्रज्ञ कार्ल सेवन यांनी नासाला एक वेगळी विनंती केली. या यानाच्या कॅमेऱ्याला एकदा मागे वळून पृथ्वीचा एक अंतिम फोटो घ्यावा अशी ती विनंती होती. सुरुवातीला इंजिनियर्स आणि शास्त्रज्ञ थोडे साशंक झाले. इतक्या प्रचंड अंतरावरून पृथ्वी दिसेल का आणि सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे कॅमेरा खराब तर होणार नाही ना याची काळजी त्यांना होती. पण अखेर नासाने या प्रयोगाला संमती दिली. यानाने आपला कॅमेरा फिरवला आणि सुमारे 600 कोटी किलोमीटर अंतरावरून एक ऐतिहासिक फोटो टिपला. या अथांग अंधारात सूर्याच्या एका फिकट किरणाखाली एक अतिशय छोटासा निळसर ठिपका दिसत होता तो छोटासा ठिपका म्हणजे आपली पृथ्वी होय. याच फोटोला पुढे नाव देण्यात आलं पेल ब्लू डॉट ….
विचार करा, एखाद्या ठिपक्यासारख्या दिसणाऱ्या, एका छोट्याशा धुळीच्या कणासारखी दिसणारी कोटी किलोमीटर वरून आपली ही पृथ्वी या मध्ये सर्व काही सामावलेले आहे.या विश्वाच्या पसाऱ्यात खरंच आपण कोणीही नाही, आपलं शरीर, आपली संपत्ती, आपला अहंकार याचं काहीही अस्तित्व नाही. आपण एक नगण्य आहोत. या अफाट विश्वामध्ये आपल्याला मिळालेली जगायची संधी याचा आनंद घेऊन प्रत्येकाने आपले जीवन खरंतर आनंदाने जगले पाहिजे.
ह्या ऐतिहासिक फोटो नंतर यानाची ऊर्जा वाचवण्यासाठी त्याचे सगळे कॅमेरे बंद करण्यात आले, त्यानंतर हे यान फक्त माहिती देणारी उपकरणे सुरू ठेवून आपला पुढचा प्रवास करत राहिले.
त्यानंतर पुढचे 22 वर्ष हे यान सूर्यमालेच्या सीमेकडे सतत प्रवास करत होते नंतर मात्र तिथून येणारे रेडिओ सिग्नल सुद्धा हळूहळू कुमकुवत होतं गेले.
भाग 4 : सूर्यमालेची सीमा पार.
अखेर तो ऐतिहासिक दिवस उजाडला,12 सप्टेंबर 2013. एडवर्ड स्टोन जे 1972 पासून या प्रकल्पाशी जोडलेले होते त्यांनी संपूर्ण जगाला अधिकृतपणे सांगितलं की या यानाने ‘हिलिओस्फीयर’ स्पेस सोडला आहे आणि त्याने ‘इंटरस्टेलर स्पेस’ मध्ये प्रवेश केला आहे.
आता ‘हिलिओस्फीयर स्पेस’ म्हणजे काय हे माहित करून घेऊ या.
सूर्य सतत सौर वारा (सोलर वाइंड )बाहेर फेकत असतो. या कणांमुळे सूर्याचा प्रभाव ज्या भागापर्यंत असतो त्या भागापर्यंत एक अदृश्य कवच तयार होतं यालाच ‘हिलिओस्फीयर स्पेस ‘ म्हणतात.
हे यान जेव्हा हिलिओस्फीयर स्पेस च्या बाहेर गेलं तेव्हा सौरवाऱ्याचे प्रमाण अचानक कमी झालं तर बाहेरून येणाऱ्या गॅलेकटिक कॉस्मिक रे च प्रमाण वाढलं. त्यामुळे सूर्याचे संरक्षण कवच किती महत्वाच आहे याचा प्रत्यक्ष पुरावा या यानामुळे मिळाला.
याचा अर्थ असा होता की यानाने सूर्याच्या प्रभावाखाली असलेली सीमा सोडलेली आहे आणि ते आता अशा एका अशा प्रदेशात पोहोचलं होतं जिथे दोन ताऱ्यांमधील अथांग अवकाश सुरू होतं.
हा प्रदेश सोडल्यानंतर मग ते कुठे पोहचलं.?
तर ते पोहचलं ‘इंटरस्टेलर स्पेस’ मध्ये. यालाच अंतर तारकीय अवकाश असे म्हणतात. म्हणजे दोन ताऱ्यांमधील मोकळी जागा..!!
दोन ताऱ्यांमधील जो विशाल प्रदेश जिथे सूर्याच्या सौर वाऱ्याचा प्रभाव संपतो आणि तेथे इतर ताऱ्यांमधून आलेले कण, वायू आणि वैश्विक किरणांचे साम्राज्य असते. मानवाने बनवलेली कोणतीही वस्तू प्रथमच इतक्या प्रचंड लांब त्या अज्ञात आणि अथांग प्रदेशात पोहोचली होती.
सूर्यमालेच्या 460 कोटी वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच माणसाने तयार केलेली एक वस्तू सूर्याच्या हेलिओस्पेयर ची सीमा पार करून पुढे गेली होती.
भाग 6 : यानाची सध्याची स्थिती.
चालू वर्षात 2026 मध्ये या यानाची काय स्थिती आहे…?
आज 2026 मध्ये हे यान पृथ्वीपासून साधारण 2500 कोटी किलोमीटर अंतरावर पोहोचले आहे आणि त्याचा प्रवास आजही चालू आहे. त्याचा वेग तब्बल 17 किलोमीटर प्रति सेकंद म्हणजेच सुमारे 61,200 किलोमीटर प्रति तास इतका प्रचंड आहे.
हा वेग किती प्रचंड आहे याची कल्पना करायची असेल तर कल्पना करा मुंबई ते पुणे हे अंतर कापायला या यानाला अवघे नऊ सेकंद लागतील. परंतु विश्वाच्या अफाट पसाऱ्यासमोर हा प्रचंड वेग सुद्धा खूपच कमी वाटतो.
हे यान सध्या ज्या दिशेने जात आहे त्या मार्गावर साधारण 40,000 वर्षानंतर ते ‘ग्लिज 445’ या ताऱ्याच्या जवळून जाईल, पण समजा, आपण या यानाला आपल्या पृथ्वीपासून सर्वात जवळ असलेल्या ताऱ्याकडे म्हणजेच ‘प्रॉक्सिमा सेंटॉरी’ कडे वळवलं तरी इतक्या प्रचंड वेगाने तेथे पोहोचायला त्याला 73000 हजार वर्षं इतका काळ लागेल यावरूनच आपल्याला समजते की आपलं विश्व किती अथांग आहे आणि त्या पसाऱ्यात यानाने ने मारलेली मजल खरोखर ऐतिहासिक आहे.
भाग 7 : उर्ट क्लाऊड
थांबा…….. वाचून थकलात का…?
पण या यानाचा चा प्रवास इथेच संपत नाही, त्याच्यासमोर आता एक अथांग आणि गुढ प्रदेश आहे त्याचं नाव आहे. ‘ऊर्ट क्लाऊड’. हा आपल्या आपल्या सूर्यमालेभोवती पसरलेला बर्फाळ धुमकेतुचा एक महाकाय पट्टा आहे. हा प्रदेश सूर्यापासून साधारण 30 हजार कोटी किलोमीटर पासून सुरू होतो आणि तब्बल 15 लाख कोटी किलोमीटर पर्यंत पसरलेला असू शकतो. आज २०२६ मध्ये व्हॉइंजर वन पृथ्वीपासून साधारण 2500 कोटी किलोमीटर पेक्षाही जास्त अंतरावर पोहोचलं आहे. यावरूनच अंदाज लावा की ऊर्ट क्लाऊडच्या केवळ सुरुवातीपर्यंत पोहोचायला सुद्धा या यानाला अजून तीनशे वर्षे लागणार आहेत आणि जर हा संपूर्ण प्रदेश पार करून बाहेर पडायच असेल तर तब्बल 30 हजाराहून अधिक वर्ष प्रवास करावा लागेल.
याचाच अर्थ मानवाने तयार केलेलं छोटसं यान हजारो वर्ष आपल्या सूर्यमालेच्या या शेवटच्या सीमेतून असाच शांतपणे प्रवास करत राहणार आहे.
नोव्हेंबर 2023 मध्ये या यानाच्या पन्नास वर्ष जुन्या संगणकामध्ये बिघाड झाला आणि त्याच्या कडून कडून मिळणारा डेटा विस्कळीत झाला. त्याचा काहीच अर्थ लागत नव्हता पृथ्वीवरून पाठवलेला संदेश तिथे पोहोचायला 23 तास आणि उत्तर यायला 23 तास लागत असल्याने एका दुरुस्तीचा निकाल समजण्यासाठी शास्त्रज्ञांना दोन दिवस वाट बघावी लागत होती. अखेर एप्रिल 2024 मध्ये शास्त्रज्ञाने शोधलं की एक मेमरी चीप खराब झाली आहे त्यांनी तो सॉफ्टवेअर कोड मेमरीच्या दुसऱ्या सुरक्षित भागात हलवला. जून 2024 मध्ये हे यान पुन्हा पूर्णपणे सक्रिय झालं आणि माहिती पाठवू लागलं.
सुमारे 2500 कोटी किलोमीटर अंतरावर बसून पन्नास वर्षे जुना यंत्रणेची केलेली ही यशस्वी दुरुस्ती आधुनिक विज्ञानाचे एक अद्भुत उदाहरण आहे.
भाग 8 : यानाने प्रवासात सोबत नेलेल्या आठवणी आणि आपली ओळख.
या यानाने सोबत कोणत्या वस्तू नेलेल्या आहेत..?
आपण जेव्हा एखाद्या प्रवासाला निघतो तेव्हा आपल्या सोबत अनेक वस्तू ठेवतो, त्या वस्तूमध्ये आपली ओळख असते, त्यात आपल्या भावना दडलेल्या असतात.
या यानाने सुद्धा आपल्या सोबत अनेक गोष्टी नेलेल्या आहेत. भविष्यात जर हे यान परग्रहवासीयांना सापडले तर ते कुठून आले आहे याची सगळी माहिती त्यांना मिळावी हा त्यामागचा उद्देश आहे. आपण कोण आहोत, आपली पृथ्वी कुठे आहे, आपल्या पृथ्वीवर काय काय आहे या सगळ्या गोष्टींची एकत्रित माहिती ह्या याना सोबत पाठवलेली आहे.
हे केवळ एक यंत्र नाही तर ते एक प्रवासी सुद्धा आहे, पृथ्वीवरचा प्रवासी…!!
त्यावर एक विशेष सोन्याची तबकडी बसवलेली आहे. तिला ‘द गोल्डन रेकॉर्ड’ म्हणतात. ही साधारण 12 इंच व्यासाची आणि सोन्याचा मुलामा दिलेली तांब्याची रेकॉर्ड आहे. भविष्यात कधी जर हे यान एलियन्सला किंवा परग्रह वासियांना सापडलं तर आपण कोण होतो आणि आपली पृथ्वी कुठे आणि कशी आहे हे त्यांना कळावं हा त्यामागचा उद्देश आहे. या रेकॉर्डमध्ये पृथ्वीवरील अनेक आवाज रेकॉर्ड केले आहेत जसे की, पावसाचा आवाज, समुद्राच्या लाटांचा आवाज, विविध संगीत,पक्षांची गाणी आणि आईचं आपल्या बाळासोबतच हसणं. इतकच नाही तर जगातील 55 भाषांमध्ये शुभेच्छा संदेश यात रेकॉर्ड केले आहेत. यामध्ये भारतातील दहा भाषांचा समावेश असून यात आपल्या मराठी आणि हिंदी भाषेचा ही समावेश आहे. या गोल्डन रेकॉर्डच्या कव्हर वर काही वैज्ञानिक खुणा किंवा सूचना देखील कोरल्या आहेत. जर एखाद्या बुद्धिमान जीवाला ही डिस्क सापडली तर ती कशी प्ले करायची आणि त्यातील चित्र व आवाज कसे समजून घ्यायचे याची माहिती त्या चिन्हांमधून दिली आहे. इतकच नाही तर या रेकॉर्डच्या कव्हर वर आपल्या पृथ्वीचा पत्ताही दिलेला आहे. पल्सर ताऱ्यांच्या स्थानांचा वापर करून एक विशेष नकाशा तयार केला आहे ज्यामुळे ही डिश सापडणाऱ्या बुद्धिमान जीवाला आपली सूर्यमाला नेमकी कुठे आहे हे समजू शकते. आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे या गोल्डन रेकॉर्डमध्ये भारतीय शास्त्रीय संगीताला ही स्थान मिळालं आहे. सुप्रसिद्ध गायिका केसरबाई केरकर यांची ‘जात कहा हो’ ही भैरवी त्यात समाविष्ट आहे. विचार करा आपल्या मातीतील हा स्वर आज अवकाशाच्या बाहेर अथांग अंतराळात प्रवास करत आहे. प्रकल्पाच्या सदस्य आणि लेखिका अँडरुअन यांनी स्वतःच्या मेंदूच्या लहरी या रेकॉर्डमध्ये समाविष्ट केल्या आहेत. हे रेकॉर्ड करताना त्या पृथ्वीचा इतिहास, मानवी जीवन आणि कार्ल सेगन यांच्यावरील आपल्या प्रेमाचा विचार करत होत्या. म्हणजेच मानवाने आपल्या भावना आणि प्रेमाची एक झलकही अथांग अंतराळात पाठवली आहे.
भविष्यातील हे यान कधी कोणाला सापडेल का..?
याचे उत्तर आज तरी कुणाकडे नक्कीच नाही. इतक्या अफाट विश्वामध्ये हे यान म्हणजे अतिशय छोटी गोष्ट आहे. पण तरीही आपण ते पाठवलं, कारण ते फक्त यान नाही तर आपण कोण आहोत, आपल्या पृथ्वीची ओळख, मानव जातीची ओळख, आपली संस्कृती यांचा छोटासा ठसा आहे आणि म्हणूनच या यांना बरोबर कोणतेही शस्त्र पाठवलेलं नाही, कोणत्याही देशाचा झेंडा नाही, कोणत्याही धर्माचा उल्लेख नाही.
2030 च्या आसपास याची ऊर्जा संपल्याने त्यावरील उपकरणे बंद होतील आणि पृथ्वीशी संपर्क तुटेल पण त्याचा प्रवास मात्र कधीही थांबणार नाही त्यावरची गोल्डन रेकॉर्ड डिस्क पृथ्वीचे आवाज आणि संगीत घेऊन कदाचित अनंत काळासाठी तार्यांच्या विश्वात फिरत राहिल.
(माहितीचा स्रोत : गुगल, wiki आणि video reference)
— लेखन : प्रकाश फासाटे. मोरोक्को (नॉर्थ आफ्रिका)
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800