खरंच, आता आपण उगीच साठी साठी करत आपलं म्हातारपण कुरवाळत बसतो. पण मला असं वाटतं की म्हातारपण कधी त्याला वय नाही. काही जण तर ऐंशीत सुध्दा, किती ताठ ऐटीत चालत असतात, स्विमिंग करतात, सायकल चालवतात. तर काही जण चाळीशीतच चाळीशी आली ग बाई डोळ्यात, म्हणून डोक्यात बसतात बघतोच ना आपण आजूबाजूला.
आता प्रत्येक वयात कधी मधी इथे तिथे आपली इ स्त्री मोडतेच, आपल्या शरीराची आपल्या अवयवाची हो.
पण काही जणी अ हं !
इ…स्त्री.. नाही मोडत स्वतःची….
कशी…तर…? बघाच..हं
अग, बाई डोळ्याला जरा अंधुक दिसतय, कधी ताण येतो कधी दुखतात, वाचायला गेलं की सारखं डोळ्यात पाणी येतं मग वाचावसं वाटत नाही. आहे ना मग स्पेशालिस्ट….
चला तर मग आय स्पेशालिस्ट कडे जाऊ या, असेल जर मोतीबिंदू तर ते काढून ऑपरेट करून ते डोळ्याना स्पष्ट दिसावं म्हणून लेन्स लावतात. हो आजूबाजूला बघतो ना आपण, एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण करतांना मिळते माहिती. मग चष्म्याशिवाय कसं टकमक बघतात.

झाली ना डोळ्याची इ..स्त्री तयार.
काय सांगू ही गुडघे दुखी अगदी चालताना इतका त्रास होतो ना ! कुठे जायचं म्हणजे अगदी ब्रम्हांड आठवतं. किती दिवस असं घरी बसून राहणार…आहे ना टेक्नॉलॉजी गुडघे बदलून घेण्याची. मग उशिर कशाला करू या, चला तर मग गुडघ्याच्या ऑरथोपेडिक्ट कडे बदलू आपण गुडघे (knee रीप्लेस्मेंट हो..) करू रोजचा व्यायाम, मग आपल्याच स्वतःच्या गुडघ्याला काठी शिवाय मस्त चालवू या, न दूखता पाय कसे भरा भरा पडतात बघाच तर मग.

झाली ना गुडघ्याची इ…स्त्री तयार…
आई, ग, चकली खायला कुणाला नाही आवडत ? पण काही कडक खायचं म्हणजे नकोच ते खाणं, दात दुखतात नकोच ते, मन मारत का राहायचं. अरेच्या चवीचवीने पदार्थ का नाही खायचे? जाऊ या ना डेन्टिस्ट कडे. जाऊ या ! खर्च तर आहे फार महाग. पण आहे दात दुखी सहन होत नाही रे बाबा ! किती दिवस जूने दात देतील साथ. दात इम्प्लांट करून घेतले की कायम नवीन दात आयुष्यभर देतील साथ ! काहीही खा मग कडक तडक.

झाली ना दातांची इ…स्त्री तयार.
काय गाण्याचे शब्द समजत नाही, बातम्या काय बोलतात आहेत नीट कळत नाही. थोडं थोडं ऐकू येतं, कधी स्पष्ट कधी अस्पष्ट कधी लागतो कानाला तडा. अरे देवा, काय हे सगळे घरी जमले आहेत, हसतात आहेत, खिदळत आहेत. उगीच अपराधी सारखं वाटतयं. अगदी ऐकू न आल्यामुळे रडूच कोसळतयं. अगदीच काय या वयात बहिरं व्हायचं. गाणी,भजनं पण ऐकाविशी वाटतात, आहेत ना ! मग
चला चला जाऊ या बाबा ई.एन. टी च्या डाॅक्टर कडे, वयाप्रमाणे असं होणारच म्हणत देतो बाई कानाला अडकवायला, ऐकायचं हलकं मशीन जरूर असेल तेव्हा लावा म्हणतो. अरे व्वा, छान ऐकू येतयं मस्त गाणी, छान गाणी. हसत खेळत राहते पण वाणी.

झाली ना कानाची इ…स्त्री तयार.
यार, सख्यांनो इ..स्त्री ही हवीच. कुठे चुरगळलेल्या कपड्यावर तर कधी थकलेल्या शरीरावर …स्त्री…ही. इ…स्त्री वापरत आपलं आयुष्य जगणार आणि इतरांनाही जगवणार…कुठे कमी तिथे आम्ही.
बरोबर ना….संख्यांनो…
इ…स्त्री आहे तर स्त्री आहे.
इ..स्त्री आहे तर स्त्री परिपूर्ण आहे.

— लेखन : सौ पूर्णिमा शेंडे. मुंबई
— संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
फारच छान लिखाण, पौर्णिमा.मस्त
वा! अप्रतिम लेख!खंरच!प्रत्येक स्त्रियांना ..नाही म्हटले तरी या त्रासातून किंवा या अनुभवातून गेले असतीलच..हे मात्र निश्चित!तु या सर्वाला एकप्रकारे वळण देऊन आपण पुढे कसे जावे यात उत्तेजित करीत आहेस….! 👍🏻👌🏻👌🏻🤗