Thursday, March 13, 2025
Homeयशकथाएकनाथ शिंदे : अनाथांचा नाथ

एकनाथ शिंदे : अनाथांचा नाथ

आज, रविवार ९ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्याने हा विशेष लेख प्रसिद्ध करीत आहे. श्री एकनाथ शिंदे साहेबांना न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
– संपादक

भारतीय राजकारणात अनेक नेत्यांना व राज्यकर्त्यांना आपल्या वाडवडीलांचा- पूर्वजांचा राजकीय वारसा लाभून ते सहजपणे सत्तास्थानी विराजमान होतात. मात्र शिवरायांच्या सातारचे एकनाथ शिंदे हे त्याला अपवाद आहेत. त्यांनी आपल्या कार्यकर्तुत्वाने शून्यातून विश्व निर्माण केलं. त्यांचा नगरसेवक ते मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री हा यशस्वी राजकीय प्रवास नवोदित युवा नेत्यांसाठी खचितच पथदर्शक ठरणारा आहे. खरं तर, हीच त्यांच्या यशस्वी राजकीय प्रवासाची यशगाथा होय.

मित्रहो, “अनाथांचे नाथ – एकनाथ” या सातारच्या सुपुत्रानं शिवछत्रपतींच्या कर्मभूमीची माती ललाटी लावून, काही तरी करून दाखवावं या उद्देशाने ठाणे या सांस्कृतिक नगरीत पदार्पण केलं अन् बघता..बघता त्यांच्या जीवनास मोठी कलाटणी मिळाली.या शाश्वत घटनेला समस्त ठाणेकर साक्षीदार आहेत.

एकनाथजीं जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी वंदनीय गंगूबाई आईसाहेब यांच्या उदरी झाला, अन् जणू गोरगरीब, कष्टकरी लोकांचा आश्रयदाता उदयास आला.भाईंच्या वडिलांचे नाव संभाजीराव तर,महाबळेश्वर तालुक्यातील “दरे” हे त्यांचं मूळगाव. शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जहाल, परखड अन् ओजस्वी वाणीनं प्रेरित होऊन, तर धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या भगव्या विचाराच्या शिकवणीने वयाच्या अवघ्या २० व्या वर्षीच त्यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला आणि बघता-बघता त्यांचं राजकीय-सामाजिक- आध्यात्मिक जीवन भगवामय झालं.वंदनीय बाळासाहेब ठाकरे अन् धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांचे भगवे हिंदुत्व अन् राजकारणातून समाजकारण करणं या दोन तत्त्वांचा अंगिकार करून राज्यातील गोरगरीब, गरजू, कष्टकरी, अल्पभूधारक शेतकरी, कामगार, दिव्यांग, महिला, सुशिक्षित बेरोजगार व मागास जनजातीच्या लोकांसाठी हिताच्या विविध योजना राबवून त्यांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी ते सर्वतोपरी तह हयात प्रयत्न करत आहेत.

परंतु दुर्दैवानं एक काळा दिवस उजाडला. अन् २००१ मध्ये दिघेसाहेबांचा दुर्दैवाने अपघाती मृत्यू होऊन ठाणेकरांवर दुःखाची अवकळा पसरली. संपूर्ण ठाणे शहर सुन्न झालं. प्रत्येकाला आपल्या घरातील थोरली व्यक्ती गेल्याचे दुःख झालं. त्यानंतर शिवसेनाप्रमुखांनी ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून शिंदेसाहेबांवर जबाबदारी सोपविली. ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख पदाचं उत्तरदायित्व यांच्या हाती आलं. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांचा वारसा पूर्णक्षमतेचे चालवत, सर्वांना बरोबर घेऊन मोठ्या आत्मविश्वासाने एकनाथजी राजकारणातून समाजकारण करत आहेत, हीच खरी स्व.दिघेसाहेबांना मानवंदना होय.महाराष्ट्र- बेळगाव प्रश्नाचे गांभीर्य पहाता, त्यांची समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. सदर आंदोलनाचे नेतृत्व करतेवेळी त्यांनी बेल्लारी तुरुंगात ४ महिने कारावास भोगला. त्यांच्या संयम, साहस व संघर्षाचे हे प्रतिक होय.

म्हणतात ना, “हर कामयाब इंसान के पीछे औरत का हाथ होता है” हे विधान शिंदेसाहेबांच्या बाबतीत तंतोतंत खरं आहे. शिंदेसाहेबांच्या पत्नी सौ. लताताई ह्या सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहून त्यांच्या सुख-दुःखाच्या वाटेकरीही राहिल्या आहेत. सौ.लताताई ह्या खऱ्या अर्थानं शिंदेसाहेबांच्या जणू सावलीच. त्यामुळे शिंदे साहेबांचे मनोबल वृद्धिंगत होत गेले. आपला सुपुत्र श्रीकांत यास डॉक्टर बनविण्याचं स्वप्नही लताताईंनी कठोर परिश्रम घेऊन खरं करून दाखविलं. यास्तव आम्ही शिवसैनिक सौ.लताताईंना आई म्हणून वंदन करतो.

कोरोना महामारीमुळे सारं जग मोठ्या संकटात सापडले असता, नगरविकास मंत्री या नात्याने शिंदेसाहेबांनी ठोस उपाययोजना करून ठाणे व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कोरोनाला नियंत्रित करण्यात यश मिळविलं. कोरोना काळातील भाईंनी केलेली रुग्णसेवेची कामे राज्यातील सर्वधर्मीय लोकांच्या आजही स्मरणात आहेत. सुरुवातीच्या काळात पुरेशा आरोग्य सुविधा नव्हत्या, कारण या महामारीवर कोणतीही लस वा औषध जगात उपलब्ध नव्हतं. ना. शिंदेसाहेबांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन” या सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून राज्यातल्या सर्वधर्मीय लोकांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. तसेच कोरोनाविषयक जनजागृती करून लोकांना राज्य सरकारच्या नियमावलीचे तंतोतंत पालन करण्यास प्रवृत्त केलं. त्यामुळे लोकांनी सावधगिरी बाळगून स्वतःची व आपापल्या कुटुंबांची काळजी घेतली.

आज मितीपर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये सुमारे एक हजाराहून अधिक आरोग्य शिबिरे आयोजित केल्याने लाखों लोकांनी या शिबिरांचा लाभ घेतला. त्यामुळे कोरोना काळात लोकांच्या आरोग्याचे खऱ्या अर्थाने रक्षण झाले. या महत्वपूर्ण कार्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक प्रमुख मंगेश चिवटे, कक्षाचे राज्य प्रमुख रामहरी राऊत व सहप्रमुख ज्ञानेश्वर धुळगंडे आणि मदत कक्षाच्या टीमचे मोठं योगदान लाभलं असून, “रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा” हे ब्रीद त्यांनी कृतीनं खरं करून दाखविलं, याचा आम्हा तमाम शिवसैनिकांना सार्थ अभिमान आहे.

“कार्य सम्राट” अन् “विकास पुरुष” म्हणून जनमानसात ओळख असलेल्या भाईंनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती सरकारी कार्यालयात साजरी करण्याचा निर्णय घेतला. राज्यात सर्वधर्मसमभाव प्रस्थापित करताना त्यांनी आपला हिंदुत्व बाणा कायम तेवत ठेवला आहे. आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत जय जय महाराष्ट्र माझा…. या गौरवशाली गीताला त्यांनी राज्यगीताचा दर्जा दिला. उल्लेखनीय गोष्ट राजकारणातून समाजकारण करताना त्यांनी आपली हिंदुत्वाशी नाळ कायम ठेवली. या पार्श्वभूमीवरच योगगुरू रामदेवबाबा यांनी एकनाथजींवर “हिंदूधर्माचे गौरवपुरुष” म्हणून स्तुतीसुमने वाहिली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री या नात्याने शिंदेसाहेबांनी “समृद्धी महामार्ग” या ड्रीम प्रोजेक्टची उभारणी जलदगतीने व्हावी, या उद्देशाने फार लक्ष घातले आहे. यावर सुमारे ५५ हजार कोटी रुपये अंदाजित खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे १० जिल्हे, २६ तालुके अन् ३९३ खेड्यांची दळणवळणाची मोठी सोय झाली आहे. हा प्रोजेक्ट राज्यातील लोकांना वरदान ठरला आहे. त्यामुळे अवघ्या ८ तासात मुंबई- नागपूर अंतर पार करता येत आहे. त्यास वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. वास्तवात हीच खरी ना. एकनाथ शिंदेसाहेबांच्या कारकिर्दीची विकासगाथा होय.

शिंदे सरकारचा सर्वात महत्वाकांक्षी निर्णय म्हणजे स्त्रियांना वयाची अट न ठेवता, एस टी बसने अर्ध्या तिकीटावर प्रवास सवलत तर, ७५ वर्षांवरील वृद्धांना एस.टी. प्रवास मोफत करण्याची मुभा दिल्याने त्यांना तीर्थयात्रा करणं सुकर झालं आहे. त्याची परिणिती म्हणजे स्त्रिया अन् ज्येष्ठ नागरिकांची एस.टी. ने प्रवास करणाऱ्यांची संख्या अनेक पटीने वाढली आहे. यास्तव विविध संघटना, सेवाभावी संस्थांनी, स्त्रिया आणि जेष्ठ नागरिक शिंदेसाहेबांना धन्यवाद देत असतात.

ठाणे शहरातील धोकादायक अन् मोडकळीस आलेल्या इमारतींतल्या लोकांचे जीवन सुरक्षित करून त्यांना त्यांच्या हक्काचे घर देण्यासाठी नगर विकास मंत्री या नात्याने त्यांच्या प्रयत्नांतून “क्लस्टर डेव्हलपमेंट” योजना कार्यान्वित करण्यात आली. त्यासाठी सिडको व ठाणे महापालिका यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. गेली दोन दशके क्लस्टर योजनेसाठी जो लढा दिला, त्याची ही फलश्रुती आहे, असे विधान शिंदेसाहेबांनी याप्रसंगी केले. या महत्वाकांक्षी योजनेमुळे सुमारे ८ ते १० लाख ठाणेकरांना त्यांच्या हक्काचा निवारा मिळून, त्याचे नवे व सुंदर घर मिळण्याचे स्वप्न साकार होईल, हे निश्चित. कृतज्ञतेच्या भावनेतून येथील रहिवाश्यांनी अनाथांचे नाथ एकनाथ यांचे आभार मानले.

माननीय एकनाथजी शिंदे हे खऱ्या अर्थाने देवदूत ठरतात कारण राज्यात कोठेही नैसर्गिक आपत्ती आली वा अपघात झाला, तेथे ते देवदूतासारखे धावून जातात. विशेष म्हणजे ते गोरगरीब लोकांच्या आरोग्याचे रक्षणकर्ते आहेत. शिंदे पिता- पुत्राने लोकोपयोगी कामांच्या व संघटन कौशल्याच्या जोरावर अनुक्रमे विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत मोठा विजय संपादन केला. ना.शिंदेसाहेबांनी कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून सलग ५ वेळा तर, डॉ.श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून सलग ३ वेळा मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून आपली राजकीय योग्यता सिद्ध केली.यास्तव शिंदे पिता पुत्राचे मनस्वी अभिनंदन.

आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात ना.एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून ५१,००० हून अधिक गोरगरीब, निर्धन, गरजू लोकांच्या महागड्या शस्त्रक्रियेंसाठी ३१७ कोटीहून अधिक अर्थसहाय्य अदा केलं, ही अद्वितीय व अतुलनीय गोष्ट असून, आरोग्य क्षेत्रात एक विक्रम प्रस्थापित केला आहे, असे अभिमानाने म्हणावे लागेल. याशिवाय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” या उपक्रमाअंतर्गत राज्यात ७०० दवाखाने सुरू करण्याचा शिंदेसाहेबांचा मानस आहे. ठाणे-मुंबई जिल्ह्यात आज शेकडो आरोग्य केंद्रे कार्यान्वित आहेत. त्याचा
आजमितीपर्यंत लाखों लोकांनी लाभ घेतला आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत असंख्य गोरगरीब लोकांना महागडे ऑपरेशन करण्यास अर्थसहाय्य प्राप्त झालं आहे. आता पांढऱ्या रेशन कार्डधारकांना देखील या योजनेचा लाभ मिळत आहे. त्यामुळे गरजू रुग्णांमध्ये जगण्याची एक नवी उमेद निर्माण झाली आहे.

गेल्या काही वर्षांत राज्यातील गोरगरीब, निर्धन लोकांच्या सुमारे ५,६०० लहान मुला-मुलींच्या हृदयावरील छिद्राचे ठाण्याचे सुप्रसिद्ध ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करून दिल्या आहेत. त्यामुळे ती मुलं आता निरोगी जीवनाचा श्वास घेत सुदृढ जीवन जगत आहेत. याशिवाय कोरोना काळात रुग्णांची ने-आण करणं सुकर व्हावं, या उद्देशाने डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्यावतीने राज्यात सुमारे ३०० रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. खऱ्या अर्थाने ही आरोग्य क्षेत्रातली क्रांतीच म्हणावी.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन, आरोग्यदूत फाउंडेशन तथा रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या “षष्ठ्यब्धि” निमित्त राज्यात “एकनाथ हिरक आरोग्य वर्ष” साजरा केलं जात आहे. अत: या वर्षादरम्यान ६०० लहान मुलांच्या हृदयावर मोफत शस्त्रक्रिया; ६०० दिव्यांग बांधवांना मोफत साहित्य वाटप; ६० महाआरोग्य शिबिरांचे आयोजन; ६० हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी; ६० हजार नागरिकांना मोफत चष्मे वाटप; ६० हजार नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया; ६० हजार किलोमीटरची आरोग्य संपदा यात्रा; ६० हजार वृक्षांची लागवड आणि ६० हजार रक्तपिशवींचे संकलन संकल्प हे उपक्रम राबविले जात आहेत.

ना.एकनाथजी शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत ऐन विधानसभा निवडणुकींच्या आधी “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण*” ही महत्त्वाकांक्षी योजना राबवून आपली राजकीय परिपक्वता सिद्ध केली. गत लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला होता. त्याचा वचपा काढत शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीने विधानसभा निवडणुकींमध्ये प्रचंड विजय संपादन करून महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. या अभूतपूर्व विजयश्रीचे श्रेय बहुतांशी शिंदेसाहेबांना जाते. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्वधर्मीय महिलांना माहे १५०० रुपये अर्थसहाय्य देऊन त्यांना स्वावलंबी जीवन जगण्याचा मार्ग दाखविला. या अर्थसहाय्याच्या मदतीने राज्यातल्या माता-भगिनी छोटेखानी उद्योग करून स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. राज्यातील सुमारे २ कोटी ४१ लाख एवढ्या गोरगरीब, गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळाला. यास्तव या भगिनींनी शिंदेसाहेबांना भाऊरायाची उपमा देऊन त्यांचे मन:पूर्वक आभार मानत, त्यांना बहिणीच्या नात्याने भरभरून राख्या बांधल्या. यालाच खऱ्या अर्थानं राजकारणातून समाजकारण करणं म्हणतात.

राज्यातील गोरगरीब, गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे घरकुल, शिक्षण, रोजगार- स्वयंरोजगार, आरोग्य हे मूलभूत प्रश्न शिंदेसाहेबांनी मार्गी लावले आहेत, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. त्याचप्रमाणे बळीराजाच्या कृषी वीजपंपाचे बिलं माफ करण्यात आली आहेत. अतिवृष्टी अन् गारपिटीमुळे शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वेळोवेळी अर्थसहाय्य देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी सुखावला आहे. शिंदेसाहेबांच्या प्रयत्नातून वारकरी मंडळांना प्रत्येकी 20 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत तीर्थ यात्रा करण्यास जाण्यासंदर्भात तरतूद करण्यात आली आहे. याबद्दल वारकरी संस्थांकडून शिंदेसाहेबांचे मनस्वी आभार मानण्यात आले.

आदरणीय शिंदेसाहेबांसाठी खास ह्या दोन ओळी, तू न थकेगा कभी..तू न रुकेगा कभी..तू न मुड़ेगा कभी, कर शपथ..कर शपथ, अग्निपथ..अग्निपथ !”
जय 🇮🇳हिंद !
जय🚩महाराष्ट्र !

— लेखन : रणवीर राजपूत.
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. Eknath Shind saheb yana Tyanchya vadh divasa nimitta prem purvak Shubha ani manacha mujara. Tyana udand ayushya labho.

  2. नमस्कार छान आज प्रकाशित झालेल्या आपल्या पोर्टलच्या अंकात राजपूत लिखित ”अनाथांचा नाथ एकनाथ हा लेख वाचला आवडला.लेखकांने मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या समग्र जीवनाचा यथार्थ मागोवा-घेतला आहे.
    एक सिवा एकनिष्ठ शिवसैनिक,शाखा प्रमुख,नगलहै, आमदार,मंत्री या पदांवर राहून जनसेवा करीत आहेत.. त्यांच्या यशाची कमान मुख्यमंत्री पद सन्मानाने भूषविले. आज ते उप मुख्यमंत्री म्हंणून जोमाने कार्यरत आहेत त्याच्या मी पणाचा लवलेशही नसलेले मा भाई साहेब हे सतत कार्यरत रहातात.
    आपल्या लाडक्या भाईसाहेब एकनाथजींच्या आज वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन व शुभेच्छासह त्यांच्या समस्त परिवारासह आम जनतेचे भले होवो हीच साहित्य शारदादेवी जवळ मनापासून प्रार्थना शुभ रात्री 🌹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Shrikant Pattalwar on कविता
शिल्पा कुलकर्णी on स्नेहाची रेसिपी ५
शितल अहेर on कविता
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित