नमस्कार मंडळी 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आज पुन्हा एकदा पाहू या कविवर्य म पां भावे यांनी लिहिलेली एक विराणी जिचे शब्द आहेत ….
घडणारे सारे घडून गेले पुरते
मी अजून स्वप्नी खुळ्यापरी का रमते
या गाण्यातील तरूणीचा प्रियकर गोड गोड वचने देऊन आणि भूलथापा देऊन तिच्यापासून दूर निघून गेला आहे. आता तो परत येणार नाही असं एक मन खात्रीपूर्वक तिला सांगतं आहे, तर दुसरं मन तिला सांगत रहातं “अग वेडे तुम्ही दोघं एवढे जवळ आला होतात की तुझा प्रियकर तुला सोडुन जाणं शक्यच नाही” दोन मनांचं हे द्वंद्व सुरू असताना तिला मात्र कुणाचं ऐकावं ते समजत नाहीये आणि मग उदासीन अवस्थेत तिला फक्त एवढंच जाणवत रहातं सर्व मर्यादा ओलांडून आम्हा दोघांमध्ये बरंच काही घडून गेलं आहे. मला दुःखाच्या खाईत लोटून माझा साजण माझ्यापासून लांब कुठेतरी निघून गेला आहे. “पुन्हा परत न येण्यासाठी” असं एक मन आक्रोश करतंय तर दुसरं मन हळूवारपणे फुंकर घालत म्हणतंय “आशा चिवट असते….तिला सोडू नकोस …. तुझा प्रियकर नक्की तुझ्याकडे येईल”. दुसऱ्या मनाच्या बोलण्यातला फोलपणा लक्षात येऊन देखील ती पुन्हा पुन्हा तेच स्वप्न पहाते आणि त्यातला फोलपणा लक्षात येऊन मग स्वतःलाच दोष देते आहे.
हळुवारपणाने जपली होती प्रीत
परी विपरीत तो ही विपरीत त्याची रीत
भ्रमराच्या नादे, फूल बिचारे फसते
माझं हे पहिलंच प्रेम जे मी जिवापाड जपलं होतं. मी माझ्या प्रियकरावर मनापासून प्रेम करत राहिले, अजूनही करते आहे. आज मात्र मला कळून चुकतंय त्याची वागण्याची पद्धत रा़ंगडी होती, बोलण्यात आढ्यता होती. कुणालाही पटकन तोडून बोलण्यात त्याला गंमत वाटत असे. त्याची प्रेयसी असूनही मी देखील त्याला अपवाद नव्हते पण मला मात्र तेंव्हा त्याचा हा बिनधास्तपणा आवडत असे, नव्हे, खरं तर या त्याच्या बिनधास्तपणावरच माझं मन जडलं होतं, प्रेम बसलं होतं. आज मला कळतंय कि या फुलावरून त्या फुलावर फिरणाऱ्या भुंग्याप्रमाणे त्याचं आयुष्य तो जगत होता. प्रेमाची धुंदी चढलेल्या डोळ्यांनी त्याच्या गुणदोषांसकट मी स्वीकारलं आणि तो मात्र फुलातला मध शोषून झाल्यावर दुसऱ्या फुलाकडे निघून गेले आणि मी मात्र अजूनही तो परत येईल या आशेवर त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहे.
त्या शपथा हळव्या, हळवे प्रेम उखाणे
ते होते केवळ फसवे, धूर्त बहाणे
ना गुन्हा तरीही शापित जीवन जगते
एकांतात झालेल्या आमच्या प्रत्येक भेटीत तो कधी कधी मला टाकून बोलत असे पण लगेच त्याचा मूड बदले अणि गोड गोड वचनांची खैरात तो माझ्यावर करत असे. मी देखील त्याच्या या गोड वचनांना आणि थापांना भुलून, त्याची मागणी पूर्ण करत रहायचे पण आज एकटी असते तेंव्हा मला समजतं की हे सर्व त्याचे बहाणे म्हणजे माझ्या डोळ्यावर केलेली धूळफेक होती. त्यावेळेस मात्र मला त्याचं बोलणं म्हणजे त्याने अगदी मनापासून माझ्या प्रेमाचं स्वागत केलंय अशीच माझी धारणा होत असे आणि पुन्हा पुन्हा मी त्याच्या प्रेमात फसत राहिले…. माझी काही चूक नसताना वियोगाचं हे शापित जीवन जगत असताना देखील माझ्या दुसऱ्या मनाचं बोलणं ऐकून तो परत येईल असं स्वप्न मी अजूनही पहात रहाते.
आसमंत सारा भासे शून्य भयाण
ना वृक्षावरती एकही हलते पान
का जुन्या स्मृतींना आठवुनी मी रडते
माझ्या प्रेमाला तिलांजली देऊन आणि मला विरहाच्या आगीत लोटून तू माझ्यापासून दूर निघून गेलास त्यामुळे माझं मन उदास आहे. या उदासीनतेमुळे माझं कुठेही लक्ष लागत नाही. आजुबाजूचा परिसर जरी बदलला नसला तरी मला मात्र तो आता भयाण दिसतो आहे. एरवी माझ्या भोवती पिंगा घालत खट्याळपणा करणारा वारा देखील आता माझ्या आसपास फिरकत नाही. झाडंही स्तब्ध उभी आहेत…. जणूकाही ती देखील माझ्या दु:खात सामील झाली आहेत, त्यामुळे झाडांच्या पानांची सळसळही मला ऐकू येत नाहीये. तू निघून गेलास आणि जगण्याचा अर्थ पार बदलला. आता मनानं कितीही ठरवलं तरीही मी वेड्यासारखी आपल्या भेटीगाठी, तू दिलेली वचनं आठवत रहाते आणि एकही स्वप्न पूर्ण झालं नाही या विचाराने आणि आठवणींना कुरवाळत रहाते आणि डोळ्यातून पाझरणारे अश्रू पुसत रहाते. आता तेव्हढंच माझ्या दैवामध्ये लिहिलेलं आहे असं मला वाटतं.
संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे विरह गीत ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या आवाजात रेडिओवर लागत असे.
– लेखन : विकास मधुसूदन भावे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
प्रेमात फसलेल्या तरुणीच्या मनातील भावना कविवर्य म.पा.भावे यांनी त्यांच्या लयदार शैलीत कवितेत छान मांडल्या आहेत.
कवी श्री.विकासजी भावे आपण केलेले रसग्रहणही फार छान झाले आहे.
आपले अभिनंदन🌹
विजय म्हामुणकर
धन्यवाद विजयजी 🙏
विकासजी खूप सुंदर व विस्तृत रसग्रहण.👌👌👌
धन्यवाद अजितजी 🙏
सर, आपण आतापर्यंत अनेक गीतांचे रसग्रहण केले आहे. तसेच या गीतातील प्रेम, आर्तता, भावना अतिशय सुंदर रितीने उलगडून दाखविले आहे. खूप छान. धन्यवाद.
धन्यवाद अनीता 🙏
सुरेख रसग्रहण.
धन्यवाद विवेक 🙏
अप्रतिम
धन्यवाद क्षितिज सर 🙏