Wednesday, September 17, 2025
Homeसाहित्यओठावरलं गाणं : ९४

ओठावरलं गाणं : ९४

नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं’ या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन:पूर्वक स्वागत! श्रीकृष्ण आणि त्याच्या ओठावर बासरी असं एक चित्र नेहमी आपल्या पहाण्यात येतं. कधी त्याच्यासोबत राधा असते, कधी गाई गुरं सभोवती चरत असतात आणि हा मुरलीधर वेणुवादन करण्यात रंगून गेलेला असतो. तर कधी कधी तो एकटाच या पाव्यातून निघणाऱ्या सुरांचा आनंद घेत तल्लीन झालेला दिसतो. चित्र कसंही असलं तरी श्रीकृष्ण म्हंटलं कि डोक्यावर मोरपीस आणि ओठांवर मुरली या दोन गोष्टी चित्रामध्ये दिसायला हव्यातच. या मुरलीला आणखी एक प्रतिशब्द आहे तो म्हणजे “बासरी” पण श्रीकृष्ण म्हंटलं कि पावा किंवा मुरली हे दोन शब्द गाण्यात यायलाच हवेत. “वाजवी पावा गोविंद”, “मुरलीधर घनश्याम सुलोचन” ही दोन गाणी उदाहरणादाखल घेता येतील. श्रीकृष्णाच्या या मुरलीविषयी ज्येष्ठ कवी सुधांशू यांनी लिहिलेलं आणि रेडिओवर गाजलेलं एक गाणं आज आपण पहाणार आहोत ज्याचे शब्द आहेत –

“या मुरलीने कौतुक केले | गोकुळाला वेड लाविले

अतिशय सुरेख शब्दरचना असलेल्या या गाण्यातून श्रीकृष्णाच्या मुरली विषयी बोलताना ज्येष्ठ कवी सुधांशू यांनी म्हटलं आहे कि या मुरली मधून निघणाऱ्या सुरांनी आजुबाजूच्या वातावरणावर अशी काही जादू होते कि
समस्त गोकुळवासियांना, गवळणींना आणि राधेला मुरलीच्या या सुरांचं विशेष कौतुक वाटतं. ही जादू फक्त कृष्णकन्हैयाची ही आवडती मुरलीच करू शकते.

वेड लाविले श्रीकृष्णाला
हिजविण क्षणही न सुचे त्याला
सतत आपुल्या अधरी धरीले …. अधरी धरीले

या मुरलीने तर प्रत्यक्ष श्रीकृष्णाला वेड लावलं. गाई गुरांच्या सोबत गेला तरीही ओठावर मुरली ठेवून तिच्यातून हा कान्हा असे काही सूर छेडतो कि ते सूर ऐकून ती मुकी जनावरं सुध्दा आपलं चरणं विसरतात किंवा तो जर त्यांना नदीवर पाणी प्यायला घेऊन गेला आणि त्या जागी मुरलीचे सूर कानावर पडले तर या गायी पाणी प्यायचं विसरून जातात. मुरलीधरालाही या मुरलीशिवाय दुसरं काही सुचतच नाही त्यामुळे कुठेही असला तरी ओठावरच्या या मुरलीच्या सुरांमुळे गोकुळवासियांवर होणाऱ्या जादूचा वारंवार प्रत्यय येत असे.

हिच्या मधुर मंजूळ सुरातून
अमरपुरीचे भुलले नंदन
यमुनेचे जळ चाल विसरले

या मुरलीची महती वर्णन करताना कधी कधी शब्द देखील थिटे पडतात. साऱ्या गोकूळावर, गवळणींवर आणि राधेवर या मुरलीच्या सुरांची जादू तर होतच असते पण इंद्रनगरीपर्यंत या मुरलीच्या सुरांची जादू होऊन स्वर्गलोकातील बागेतली फुलं आणि इंद्रनगरी देखील कान्ह्याने छेडलेल्या या मुरलीच्या सुरांवर डोलत रहाते. आजुबाजुच्या निसर्गावर आणि स्वर्गलोकातही आपल्या स्वरांची जादू पसरवणाऱ्या मुरलीच्या सुरांपासून यमुना नदी तरी अलिप्त कशी राहील! मुरलीच्या या सुरेल सुरावटीमुळे यमुनेचं पाणी देखील आपला खळखळाट विसरून, मुरलीच्या सुरांशी एकरूप होऊन संथपणे वाहू लागलं.

अधरसुधा प्राशुन हरीची
पावन झाली तनु मुरलीची
“भाग्यवती मी” मुरली बोले

श्रीकृष्णाच्या ओठांवर कायमचं वास्तव्य केलेल्या या मुरलीचं मनोगत कवीने या कडव्यात व्यक्त केलंय. ती म्हणते आहे कि भगवान श्रीकृष्णाने सतत मला आपल्या ओठांवर ठेवल्यामुळे आपसूकच भगवंताच्या ओठातलं अधरामृत मला प्यायला मिळालं जे पिऊन माझी काया पावन झाली आहे. त्यामुळे श्रीकृष्णाच्या सहवास लाभलेल्या राधेपेक्षाही मी जास्त भाग्यवंत आहे आणि या गोष्टीचा मलाही सार्थ अभिमान आहे.

संगीत दिग्दर्शक दशरथ पुजारी यांनी दिलेलं संगीत आणि गाणं माणिक वर्मा यांच्या गोड आवाजात ऐकताना नंतरही बराच वेळ आपल्या कानात रुंजी घालत रहातं.

विकास भावे

– लेखन : विकास भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं