नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन:पूर्वक स्वागत. ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं एक गाणं पूर्वी रेडिओवर लागत असे जे कुमारावस्थेतून तारूण्यात पदार्पण केलेल्या आमच्यासारख्या तरूणांचं आवडतं गाणं होतं. त्या गाण्याचे शब्द होते –
“दिवस तुझे हे फुलायचे | झोपाळयावाचून झुलायचे”
गाण्यातील शब्दांवरून तुम्ही ओळखलं असेलच सुरवंटाचं फुलपाखरू व्हावं तसं यौवनावस्थेत पदार्पण केलेल्या एका युवतीला कवी सांगतोय की यौवनावस्था म्हणजे सळसळता उत्साह, वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करणारं मन आणि प्रितीचा मरंद मिळवण्यासाठी भिरभिरणारं फुलपाखरू! या युवतीला कवीचं सांगणं आहे कि हे सुंदरी तू जीवनाकडे नेहमीच सकारात्मक दृष्टीने पहा. कारण यौवनावस्था ही झाडावर नुकत्याच उमललेल्या तजेलदार फुलासारखी असते. मी आत्मविश्वासाने सांगतो तुला कि या वयात तू ठरवलं तर वाऱ्यावरती झुलू शकतेस, वाऱ्याशी स्पर्धा करू शकतेस. तुझ्या मनाची उभारी एवढी उंच जाऊ शकते कि उंच जाण्यासाठी तुला झुल्यावरती बसण्याची गरज नाही.
स्वप्नात गुंगत जाणे
वाटेत भेटते गाणे
गाण्यात ह्रदय झुरायचे
हे सुंदरी, या वयात एखाद्या राजबिंड्या रूपाचं मनाला वेड लागतं. तोच राजकुमार हळूहळू तुझ्या स्वप्नात येऊन तुझ्याशी गप्पा मारेल, तुला मिठीत घेईल. रोजच रात्री निरनिराळ्या स्वप्नांमध्ये तुझं मन गुंग होऊन जाईल. मनाला उत्साह, उभारी आणणाऱ्या स्वप्नांमुळे कधी कधी मनाला वाऱ्याच्या वेगाचं उधाण येतं तर कधीं कधीं ते मेंदीच्या पानावर बसून अलगद झोके घेत रहातं. मधूनमधून “मला न्यायला परीकथेतला राजकुमार कधी येणार आहे?” असाही प्रश्न तुझं एक मन दुसऱ्या मनाला विचारुन बघेल. तुझ्या मनाला भुरळ घालणारं गाणं तुलाही खुणावत राहील. तुझं मनही मग त्या गाण्याच्या तालावर नाचत राहील. पण आवडत्या व्यक्तीला आठवून आणि आपल्या माणसाचा सहवास मिळत नाही म्हणून तुझं ह्रदय क्षणभरासाठी उदास होईल मात्र ह्रदयात झिरपत जाणारं गाणं त्याला पुन्हा आनंदीत करील. कधी कधी एखाद्या गाण्यातून प्रियकरासाठी झुरणाऱ्या ह्रदयाची अवस्था कशी होते याचाही अनुभव येईल. तारूण्यावस्थेतील मनाच्या या सर्व अवस्था भिरभिरणारं फुलपाखरू होऊन तू जेवढ्या तन्मयतेने जाणून घेशील तेव्हढी आयुष्य जगण्यातली गंमत क्षणाक्षणाला वाढत राहील.
मोजावी नभाची खोली
घालावी शपथ ओली
श्वासात चांदणे भरायचे
स्वप्नांचे पंख लावून आशेच्या किरणांच्या साक्षीने आभाळात उंच भरारी घेण्याची खरं तर तुझी क्षमता आहे. लांबच लांब पसरलेला समुद्र जसा अथांग आहे तसंच काहीसं या आकाशाचंही आहे. पण तू जर त्याचा थांग लावायचा ध्यास घेतला तर मला नक्की खात्री आहे की या नभाच्या अथांगतेचा थांग तुला नक्की लागेल. त्यासाठी तुला वाऱ्यावरती स्वार होऊन त्याच्याशी दोस्ती करावी लागेल. त्याला शपथ घालावी लागेल तसंच तुलाही हे गुपित कुणाला न सांगण्याची शपथ घ्यावी लागेल. एकदा त्याच्याशी दोस्ती झाली की मग तो तुला आकाशाच्या अथांगतेकडे घेऊन जाईल. रात्रीच्या वेळेस आकाशात दिसणाऱ्या चांदण्यांचं सौंदर्य श्वासाश्वासात भरून घे म्हणजे ते तूझ्या ह्रदयापर्यंत सहजपणे पोचेल आणि श्वासाश्वासात भरून घेतल्यानंतर हृदयात स्थानापन्न झालेलं हे चांदण सौंदर्य तुला केंव्हाही पहाता येईल.
माझ्या या घराच्या पाशी
थांब तू गडे जराशी
पापण्या मिटून भुलायचे
तू जरी वाऱ्यावरती स्वार होऊन आकाशात भरारी घेतलीस आणि आकाशाची व्याप्ती मोजण्याचा प्रयत्न केलास तरीही माझी मात्र मनोमनी अशी इच्छा आहे की तू जेंव्हा केंव्हा फेरफटका मारायला बाहेर पडशील तेंव्हा या पामराच्या घरावरही एक दृष्टिक्षेप टाकलास तर माझ्या मनाला तेवढंच समाधान मिळेल. माझ्या घराभोवती असलेल्या बागेतील चमेली, मोगरा, जास्वंदी, चाफा या फुलांचा सुगंध वाऱ्यावरती स्वार होऊन जेंव्हा तुझ्या नाकापर्यंत पोचेल तेंव्हा क्षणभरासाठी का होईना त्या सुवासाने धुंद होऊन डोळे बंद करून तू तो सुगंध जेंव्हा तुझ्या श्वासात भरून घेशील तेंव्हा तुझ्या चेहऱ्यावरचं समाधान मी माझ्या डोळ्यांच्या कॅमेऱ्यात बंदिस्त करेन.
संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं ज्येष्ठ गायक अरूण दाते यांच्या
मार्दवपूर्ण आवाजात ऐकताना मन प्रसन्न होतं.

– लेखन : विकास भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
नेहमीप्रमाणे राहण्याची निवड व रसग्रहण सुरेख झाले आहे.
सर्वांच आवडत गाणं .. तितक्याच समरसतेने लिहिलेलं … गाण गुणगुणताना त्याचा इतका खोल , सुंदर अर्थ कधी लक्षात सेत नाही…खूप धन्यवाद सर , या गाण्यासाठी…
छान.
छान