नमस्कार 🙏 गाणं-संगीत, गाणं-बजावणं, गाणं-जगणं या काही मराठी शब्दांच्या जोड्या सातत्याने आपल्या कानावर पडत असतात. आता रेडिओ जास्त वेळ ऐकला जात नसला तरी कोणे एके काळी, रेडिओ हा जीवनाचा एक अविभाज्य घटक होता ही गोष्ट तर आपल्याला मान्य करायला हवी.
“ओठावरलं गाणं” या सदरात आज आपण पहाणार आहोत जी गाणी कोणत्याही भाषेत असली तरी कानांना गोड लागतं. तर गाण्याची महती सांगणा-या एका गाण्याचं रसग्रहण मी आज करणार आहे.
कदाचित हे गाणं तुम्हीही ऐकलं असेल. गाण्याचे शब्द लिहिले आहेत कवि आणि गझलकार रमण रणदिवे यांनी –जमेल तेंव्हा जमेल त्याने जमेत घ्यावे गाणे
जगणाऱ्याने जगता जगता मजेत गावे गाणे
रेडिओवर जरी नाही तरी प्रत्येकाच्या मनाच्या रंगभूमीवर प्रसंगानुरूप कधी ना कधी गाणं सुरू असतं. कधी ते दु:खाचं असतं, कधी मनाला गुदगुल्या करणारं असतं तर कधीकधी मनातलेच अव्यक्त भाव एखाद्या गाण्यातून प्रकट होतात आणि आपला मूड आनंदी करून जातात. आयुष्याचा अविभाज्य घटक असलेल्या या गाण्याचा आनंद घ्यावा, कधीकधी आपणही तो गाण्यामधून व्यक्त करावा. जगणं शिकवण्याचं बळ या गाण्यामध्ये आहे जे प्रत्येक क्षणी नकळतपणे आपली साथ करत असतं.
आयुष्याच्या वेलीवरती भावफुले बहरावी
ती वेचाया अलगद खाली नक्षत्रे उतरावी
नक्षत्रांच्या श्वासातूनही पेरीत जावे गाणे
भाव, भावना या गोष्टी दाखवणं आणि प्रसंगी ते भाव, भावना व्यक्त करणं हेच तर आयुष्याचं अवघड गणित सोडवण्याचं खरंखुरं उत्तर आहे. ही अशी भावसुमनं बहरताना आयुष्याची चौकट अशी काही सजावी कि आकाशातल्या नक्षत्रांनाही त्या भावसुमनांची भुरळ पडून रात्र झाल्यावर आपली जागा सोडून त्या नक्षत्रांनीही हळूच धरतीवर उतरावं. आपणही या शुभघडीला जागे राहिलो तर या नक्षत्रांच्या श्वासातूनही एकेक गाणं निश्चितच पेरता येईल आणि “गाण्यातून प्रकटे गाणे” अशी भावावस्था पुन्हा एकदा आपल्याला अनुभवता येईल.
पाऊस-पाणी-प्रकाश-वारा, पक्षी-सागर-सरिता
परमेशाच्या प्राणांमध्ये जिवंत सा-या कविता
आनंदाने मिळेल त्याचे कवेत घ्यावे गाणे
मनामध्ये गाणं जरी सुरू असलं तरी व्यवहाराच्या आणि नोकरी व्यवसायाच्या चौकटीत वेगाच्या तालावर धावणा-या माणसाला निसर्ग संगीत ऐकायला वेळ नसतो. पावसाचं बरसणं, पाण्याचं कधी संथपणे तर कधी आवेगाने धावणं, प्रकाशाचं संगीत, वा-याच्या झुळूकीचं मधुर गाणं, पक्षांचं कूजन, सागराच्या लहरींचं नर्तन, सरितेचं खळाळणं हे सारे आविष्कार म्हणजे परमेश्वराच्या प्राणांमधुन आलेल्या जिवंत कविता आहेत. प्रत्येक आविष्काराच्या निर्मितीमधुन तयार होतं नादमधुर संगीताचं मोहक गाणं! शक्य असेल तर किमान एकदा तरी रोमारोमातून हे गाणं आपल्या शरीरात भिनवून घ्यावं आणि प्रत्येक निर्मिती मधून निर्माण होणाऱ्या गाण्याचा मनमुरादपणे आस्वाद घ्यावा.
जगण्याचे बळ उदंड देते गाणे प्रत्येकाला
इथे न कोणी अमर अखेरी जाणे प्रत्येकाला
जाताजाता दुनियेसाठी उधळून जावे गाणे
चैतन्याची लहर, उत्साहाचा सुगंध आणि आनंदाचा शिडकावा देणारी ही गाण्याची त्रिमिती माणसाला हरघडी जगण्याचं बळ देत असते. या जगामध्ये अजूनपर्यंत कुणीही अमरपट्टा घेऊन आलेला नाही. जनन मरणाची ही शिडी तर प्रत्येकाला चढणे क्रमप्राप्तच आहे. म्हणूनच जाताजाता या दुनियेसाठी गाण्याचं हे मोहक इंद्रधनुष्य जर आपण मागे ठेवून गेलो तर पुढल्या कित्येक पिढ्यांना जगण्याचं बळ आणि गाण्याचा आनंद मिळेल.
सुप्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं हे द्वंद्व गीत “क्षण मोहरले” या अल्बम साठी ह्रषीकेष रानडे आणि प्राजक्ता जोशी-रानडे यांनी गायलं आहे.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
अप्रतिम लेखन!
‘परमेश्वराच्या प्राणातून आलेल्या कविता’!
वा! यापेक्षा सुंदर वर्णन काय करावे!
फार सुंदर
छान रसग्रहण
सुंदर
धन्यवाद गौरव🙏