Saturday, July 12, 2025
Homeबातम्याकबड्डी कबड्डी

कबड्डी कबड्डी

“कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कबड्डीचा संघ उभारण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार.” असे वक्तव्य राज्य कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष खासदार गजानन कीर्तिकर यांनी कबड्डी जिल्हा सचिवांना मार्गदर्शन करताना केले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या वतीने जिल्हा सचिवांकरिता दोन दिवसाचे “मंथन शिबीर” अलिबाग येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात नुकतेच आयोजित करण्यात आले होते.

कबड्डी हा धाडसी आणि चपळाईचा खेळ असून तो उच्च दर्जाचा आहे. हे कॉर्पोरेट जगताला पटवून देणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यांच्या सीएसआर(CSR) फंडाचा निधी  कबड्डी खेळाच्या विकासाकरिता वापरता येईल असे पुढे ते म्हणाले.

रायगड जिल्हा कबड्डी असो.चे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करताना सांगितले की, आज कबड्डी हा खेळ मॅटवर खेळला जात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त खेळाडूंना मॅटवर सराव व स्पर्धा कशा भरवता येतील याकरिता राज्य संघटनेने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच कायम स्वरूपाची आर्थिक सोय कशा पद्धतीने करता येईल याकरिता प्रयत्न होणे गरजेचे आहे.

या वर्षात मृत झालेले खेळाडू, संघटक, कार्यकर्ते व अन्य क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. जिल्ह्याचा सचिव हा जिल्हा व राज्य संघटना यामधील दुवा म्हणून काम करतो. त्यांच्याशी वर्षातून एकदा तरी संवाद साधावा असे राज्य संघटनेचे मुख्य सचिव आस्वाद पाटील यांनी आपल्या प्रास्तविक भाषणात सांगितले. त्यांनी घोषणा केली की,  जिल्हा व राज्य आणि भारतीय कबड्डी महासंघाने मान्यता दिलेल्या  प्रत्येक सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल जेणेकरून खेळाडूंना एक दर्जा मिळेल व त्यांच्या खेळात सुधारणा होईल.

खेळाडू निवड समिती नेमताना त्या सदस्यांने किमान वर्षभर तरी खेळाडूंचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. संघाच्या प्रशिक्षकाला देखील एक वर्षापेक्षा अधिक संधी मिळणे गरजेचे आहे असे पुढे ते म्हणाले.

या शिबिरात स्पोर्टवोट कंपनीचे चेअरमन अग्रवाल यांनी सामन्याचे थेट प्रक्षेपण कसे होईल याचे प्रात्यक्षिक दाखवले तसेच स्पोलटो कंपनीने ऑनलाईन कार्यक्रम घेऊन खेळाडूंनी आपली खेळाडू नोंदणी “ऑन लाईन” कशी करावी याचे मार्गदर्शन केले.

यापुढे सर्व राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत व राज्य संघटनेने मान्यता दिलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत खेळताना खेळाडूंची नोंदणी राज्य संघटनेकडे केलेली असणे आवश्यक आहे. नोंदणी न झालेल्या खेळाडूस राज्याच्या अधिकृत स्पर्धेत खेळता येणार नाही. तसेच अनधिकृत स्पर्धेत खेळणाऱ्या संघ व खेळाडू यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

अर्जुन पुरस्कार शकुंतला खटावकर – शालेय शिक्षकांना अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञानामार्फत प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. खेळाडू शाळेतूनच तयार होत असतात, तर राज्य संघटनेच्यावतीने दरवर्षी दोन तरी सदस्य एनआयएसच्या प्रशिक्षणाकरिता पाठविले पाहीजे व खेळाडुकरिता वर्षभर प्रशिक्षण देता येईल अशी प्रबोधिनी हवी असे सौ.सिमरन गायकवाड म्हणाल्या.

अर्जुनवीर शांताराम जाधव – राज्यातून २५-२५ उदयोन्मुख खेळाडूंची निवड करून त्यांना ठराविक कालावधीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशिक्षण देणे व त्यांनी त्या प्रशिक्षणाचा फायदा आपल्या जिल्ह्यातील खेळाडूंना करून द्यावा. तसेच राज्य संघटनेने व्यावसायिक व आधुनिक दृष्टिकोन ठेऊन कार्य करावे. त्याच बरोबर दिलेल्या वेळेत स्पर्धेचे उद्घाटन व सामना कसा सुरू होईल  याकरिता कटाक्षाने लक्ष द्यावे. याची सुरुवात राज्य निवड स्पर्धेपासून करावी.

मिनानाथ धानजी- किशोर व कुमार गटाच्या स्पर्धेकरिता वयाची निश्र्चिती करण्याकरिता एकच तारीख निश्र्चित करणे जेणेकरून जिल्हा व राज्य संघटनेला आपले वार्षिक स्पर्धा कार्यक्रम आखणे सुलभ जाईल.

शिबिराची सांगता जे.जे.पाटील यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. शिबिराचे आयोजन भव्यदिव्य पद्धतीने व्यावसायिक दृष्टिकोन डोळ्या समोर ठेऊन करण्यात आले होते.

हे शिबीर यशस्वी करण्याकरिता जे.जे.पाटील, सूर्यकांत ठाकूर, संजय मोकल, प्रमोद म्हात्रे, राज्य कबड्डी संघटनेचे कार्यालय प्रमुख सचिन भोसले, जनार्दन पाटील, जगदीश पाटील व रायगडच्या अनेक सदस्यांने अथक परिश्रम घेतले.

– टीम एनएसटी 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments