Saturday, September 21, 2024
Homeलेखकरोना आणि महिलांचे विश्व

करोना आणि महिलांचे विश्व

जेव्हा पहिला लॉकडाउन जाहीर झाला,तेव्हा महिलांच्या मनात करोना विषयी खूप भीती बसली होती. सतत त्याच त्या बातम्या पाहून खूप अस्वस्थ वाटत होते.उद्या काय होणार? आपण सर्व यातून सुखरूप बाहेर पडू का? याची धास्ती व चिंता सतावत होती.सतत त्याच गोष्टींचा विचार करून घाबरत होती. मात्र यातूनही काही सकारात्मक गोष्टींचा अनुभव ती घेत होती.

आज अनेक वर्षाने तिला कुटूंबाचा सहवास लाभला होता. सर्व एकत्रित होते, अनेक गप्पा गोष्टी रंगत होत्या. अनेक जुने अल्बम पाहिल्यावर जुन्या आठवणीना उजाळा मिळाला होता.सतत घडयाळावरच्या काट्यावर चालणारी ती महिला थोडी शांत होती.कामे थोडी पुढे मागे झाली तरीही काही हरकत नव्हती. कारण मुलांचे शाळेचे डब्बे नव्हते व पतीचेही वेळेप्रमाणे धावणे थांबले होते.


महिलांचे विश्व हे तिचे कुटुंबच असते. आज ह्या विश्वात ती रमली होती. आज मनापासून ती खुश होती.काही घरातील दृश्य तर दृष्ट लागेल असे होते. कारण पती व मुले आवडीने व आनंदाने पदार्थ बनवून आईला प्रेमाने भरवत होती. तिला कामाला सुट्टी होती. त्या लहान लहान हाताने प्रेमाने भरवलेले ते घास! तिच्या डोळ्यात आनंद अश्रू तरंगत होते. नजर लागेल असे ते क्षण होते.पुरुषांना आज महिलांचे महत्व पटले होते. कारण ते अगदी सहज म्हणतात, अमुक अमुक पदार्थ बनवून ठेव. मात्र तो बनवायला किती कष्ट असतात, हे सर्वांना दिसत होते. आज त्या महिलेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला होता.

जर प्रत्येक कुटुंबाने आपली काळजी घेतली तर आपण सर्व ह्या महामारीतून नक्कीच बाहेर पडू हे तिला माहीत आहे. ती अतिशय जागरूक आहे. घरातही तसेच कठोर नियम आखले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याची सर्वाना सक्ती आहे.नोकरी करणाऱ्या महिलांना तर तारेवरची कसरत करावी लागत आहे. महिला त्यांच्या कामात कायम तत्पर व जागरूक असतात.

व्यवसाय अथवा नोकरी करणाऱ्या महिलांनी समतोल राखून स्वतःला सिद्ध केले आहे. ती कोठेही मागे नाही.त्या परमेश्वराने स्वतः तिला अदभूत शक्ती बहाल केली आहे, ज्या मुळे ती अनेक कामे शिस्तबद्ध व काटेकोरपणे व्यवस्थित करू शकते.

आज करोनामुळे महिलांवरचे ताण तणाव वाढले आहेत.अनेक महिला ह्या पुरुषी अहंकाराला बळी पडतात व अत्याचार ही सहन करतात. आज करोनामुळे असंख्य महिलांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने काही महिला अमानुष वेश्या व्यवसाय करायला देखील भाग पडल्या. कारण त्यांचे पूर्ण कुटुंब सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून आहे. कुटुंबासाठी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना ह्या नकोश्या गोष्टी अगदी नाईलाज म्हणून कराव्या लागत आहे.काही घरात महिलेचे स्थान एकाद्या नोकरा प्रमाणे आहे. आता तर सतत नवरा घरात असल्यामुळे त्याचा सतत रुबाब आहे. त्याचे वर्चस्व असल्यामुळे तिची दयनीय अवस्था आहे . काही व्यसनी नवरे तर मारहाण करत आहेत. मात्र अश्या परिस्थितीत ती घराबाहेर पोलिसांपर्यंत अथवा एखाद्या सामाजिक संस्थेपर्यंत देखील जाऊ शकत नाही.बाहेर जाऊन फोन करणे शक्य नसल्याने आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही. अशा एक न अनेक नकारात्मक गोष्टीही ह्या कोरोनामुळे घडत आहेत.त्यामुळे अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचे धाडस वाढत आहे.अशा अनेक परिस्थितीला महिला बळी पडत आहेत.बऱ्याच वेळा तिला माहेरचे काही पाठबळ नसल्याने वाईट गोष्टीचा सामना करावा लागत आहे.


काही ठिकाणी अत्यंत सकारात्मक गोष्टीही दिसत आहेत.तिला स्वतःच्या कला गुणांसाठी भरपूर वेळ मिळत आहे .त्यामुळे तिचे स्वतःचे अस्तित्व ती निर्माण करत आहे.तिच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे .त्याचा ती पुरेपूर उपयोग करत आहे.घरातील जबाबदारीनं बरोबर स्वतःला सिध्द करत आहे.वाचन,नृत्य, चित्रकला अशा अनेक गोष्टीतून ती आनंद घेत आहे. स्वतःच्या मुलांना वेळ देऊन त्यांना देखील नवीन गोष्ठी करण्यासाठी प्रेरणा देत आहे. ती घरातील वातावरण आनंदी व उत्साही ठेवण्याचा अतोनात प्रयत्न करत आहे.घरातील कामाबरोबर मुलांशी देखील हसत खेळत आहे. जेणे करून त्यांना घरात बसण्याचा कंटाळा येणार नाही.त्यांना देखील लहान सहान कामे शिकवत आहे ज्या मुळे त्याचा उपयोग त्यांना भविष्यात होईल व ती स्वावलंबी होतील. देशाचे नाव देखील करतील. ती त्यांना फक्त पुस्तकी किडे नव्हे तर व्यावहारिक ज्ञान देत आहे , जेणेकरून ते एक उत्तम नागरिक होतील.एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे सामर्थ्य महिलेत आहे. काही महिला आज वेळेचा सदुपयोग करत आहे. ह्या कठीण परिस्थितीचा सामना हसत मुखाने व धैर्याने करत आहे.वेळेचे उत्तम नियोजन असल्याने सर्व गोष्ठी तिला सहज शक्य आहे.

आज तर ती पहिल्यापेक्षा अधिक जागरूक आहे.सोशल मीडिया अथवा वृत्तपत्राचे वाचन करुन ती सर्व गोष्टीची माहिती करून घेत आहे. पूर्ण कुटुंब हे तिच्यावर अवलंबून असते .म्हणून तर प्रत्येक स्त्री ही आपल्या कुटुंबावर निरागस व निस्वार्थी प्रेम करत असते. पण गृह खाते सांभाळणारी ही गृहिणी कायम दुर्लक्षीत असते. असे का ? कधी बदलणार हे चित्र ? तुम्हीच सांगा.जरा विचार करा ! आजच्या ह्या कठीण कोरोनाच्या काळात ती धैर्याने सामोरी जात आहे.ह्यासाठी तिला कोणत्याही पारितोषिकाची गरज नाही. फक्त तुमचे प्रेमाचे दोन शब्द तिला दहा हत्तीचे बळ देऊन जातात.फक्त तिचा आदर करा. तिचा मान राखा. एवढीच मागणी स्त्रीची असते. आज रोज स्वयंपाक करताना देखील एक भाजी नवऱ्याच्या आवडीची तर एक मुलांसाठी आवडणारी असते. तिच्या काही वेगळ्या आवडी निवडी नसतात. कुटुंबाचे पोट भरले की तिचे पोट भरते. मात्र जेव्हा सहज बोलले जाते की , तू तर दिवसभर घरात असते ना. तू काय करते ? हे शब्द तिच्या जिव्हारी लागतात.आज सर्व जण घरात आहे व तिचे काम देखील दिसत आहेत.त्या मुळे हे वाक्य म्हणण्या अगोदर त्यांनी अनेक वेळा विचार करावे.महिला दमते, थकते मात्र कोणालाही काहीही सांगत नाही. एकटीच ती सर्व सहन करते. आपले दुःख लपवण्याची कला जणू तिला अवगत आहे.नोकरी अथवा कितीही मोठया पदावर असलेली ती प्रथम गृहिणीच आहे .आणि हो ! तिला त्याचा अभिमान आहे.

एक स्त्री म्हणून तुम्हाला आवर्जून एक गोष्ठ सांगू इच्छिते .या करोनाविषयी भीती असली तरीही आम्ही सर्व महिला शक्ती ह्या संकटाशी समाना करायला तयार आहोत . आणि हो , हा कोरोना केवळ आमच्या घरातूनच नव्हे तर संपूर्ण देशातुन, ह्या जगातून पळवुन लावणार हा आमचा निर्धार आहे , पूर्ण विश्वास आहे.एकीचे बळ अशक्य गोष्टी साध्य करू शकतात. आम्ही सर्व मिळून हा लढा लढणार आणि जिंकणार ही.ह्यात तिळमात्र शंका नाही.

पतीची अर्धांगिनी……..!
मुलांची प्रेरणा………….!
समाजाची रण रागिणी….!
कुटुंबाची प्रतिष्ठा………..!
कर्तव्यदक्ष गृहिणी……….!
देशाचा अभिमान …………!
समस्त महिलांना सलाम….!
– लेखन : रश्मी हेडे.
-संपादन : देवेंद्र भुजबळ.9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” भाग : सात
सौ.रोहिणी अमोल पराडकर on आनंदी जीवनाची गुरुकिल्ली
श्रीकांत चव्हाण on आनंदी जीवनाची गुरुकिल्ली