माझ्या मनाच्या कुटीला
न्हाई कवाड लावलं
येणं जाणं आपुलकी
सारं मोकळंढाकळं
ज्ञानदेवानं कवाड
रुसून की लावलेलं
झाले ताटीचे अभंग
केलं मुक्ताईनं खुलं
आजबी तरास तसा
ज्ञाना समाधीत जाय
न्हाई जागवण्या मुक्ता
झाला निवृत्त सोपान
मंग ठरवलं म्या बी
कुंडी कुलूप ना लावू
सारी झंझट काढून
नको कवाडंच लावू
राग लोभ नको मोह
अभिमान शिवू नगा
माझ्या झोपडीत बसा
नगा तरास देऊ उगा
जसे आला जावा तुम्ही
परतून की माघारी
माझ्या मनामंदी ऱ्हाई
माझा सावळा श्रीहरी
आता जागा न्हाई कुणा
यावं बनून पाव्हणा
न्हाय कवाड अडसर
सत्त्व भाव ठवी मना
त्याच्या आपुल्या मंदी हा
नगं कवाडाचा खेळ
न्हाय बसायाचा मग
सावळ्याशी कवा मेळ
असं भक्तीचं कवाड
ठेवू सताड उघडं
सुखदुःख त्याच्या पायी
जिवाशिवाची सांगड
रचना©डॉ.मंजूषा कुलकर्णी