कुठून येते कशी ती येते ओठावरती राणी
आज सांगते खरी खुरी कवितेचीच कहाणी…
अगम्य आहे अगाध आहे अज्ञाताचे फुल
कशी करावी उकल बरे मनास पडते भूल…
लिहिन कविता केव्हा मी, हे ही महित नसते
अवचित येते लकेर ओठी सरसावून बसते..
निसटता हातातून ती मुळीच गवसत नाही
म्हणून मग, अनुभवाने बसते, करते घाई…
ओळ येता पहिली ती, दुसरी माहित नसते
मनात मग सुमती तेव्हा स्वत:लाच हसते…
दुसरी येते लगेच तिसरी कुठून कशी येते ?
गंमत बघते तिची, मग लगेच चवथी येते..
कोण सांगते कानी माझ्या ? मनातून ती स्रवते
लेखनिक मी फक्त तिला तावावर उतरवते
सुरू ती होते कुठे थांबते सारे तिच ठरवते
नसते माझ्या हाती काही फक्त लिहित असते..
प्रवास तिचा सहज सोपा कुठेच ना अडखळते
विषय संपला वाटताच ती पूर्णविरामही देते…
अवघड आहे तिचे वागणे शब्द कुठून येतात ?
हात जोडूनी जणू सामोरी उभेच ठाकतात
प्रवास अवघ्या क्षणांचा थक्क करून सोडतो
कवितेचे हे कोडे सांगा कोण बरे उलगडतो ?
जमली नाही कुणास व्याख्या अज्ञाताचे लेणे
खरे वाटो अथवा नाही, कुणास असते घेणे ?
मनात आले आता पहा ना अवचित आली ओठी
मुळीच नाही गोष्ट कोणती, सांगत नाही खोटी
— रचना : प्रा.सौ.सुमती पवार. इंग्लंड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खुप सुंदर कविता👌👌
खूप सुंदर
सुंदर
जेष्ठ साहित्यिक सुमती ताईंनी कविता स्फुरणेविषयी उतम मांडणी काव्य रुपी केली आहे. अभिनंदन
गोविंद पाटील
जळगाव जिल्हा जळगाव
अप्रतिम
Thank u so much sir
Thanks a lot
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹