आज, २७ फेब्रुवारी या मराठी भाषा दिनानिमित्त विशेष लेख…
– संपादक
काही साहित्यिक हे कधीही काळाबरोबर विस्मृतीत जात नाहीत. त्यांची नावे रसिक मनावर कोरलेली असतात. त्यापैकीच एक. “आधुनिक युगाचे कवी” अशी ओळख असलेले कवी म्हणजे कवी कुसुमाग्रज मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, समीक्षक, नाटककार, आणि कथाकार. २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस. मराठी भाषा दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
कुसुमाग्रज हे त्यांचे टोपण नाव. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर. पण त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्यामुळे, त्यांचे नाव बदलले आणि विष्णू वामन शिरवाडकर हे नाव त्यांना प्राप्त झाले. आणि साहित्य क्षेत्रात याच नावाने त्यांना ओळख मिळाली. त्यांना सहा भाऊ आणि एक बहीण अशी भावंडे होती. बहिणीचे नाव कुसुम होते. त्यावरून त्यांनी कुसुमाग्रज हे टोपण नाव स्वतःसाठी घेतले. कवी म्हणून कुसुमाग्रज आणि नाटककार म्हणून वि वा शिरवाडकर या नावाने ते प्रसिद्ध झाले. त्यांचे बालपण, शालेय शिक्षण हे नाशिक या नगरातून झाले. आजही नाशिककर कुसुमाग्रजांचे गाव—आमचे नाशिक” असेच अभिमानाने सांगतात. लेखन गुण हे त्यांच्या ठाई जन्मजात होते. शालेय शिक्षण घेत असताना “रत्नाकर” नावाच्या मासिकातून त्यांची पहिली कविता प्रकाशित झाली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी चित्रपटासाठी पटकथा लिहिल्या. वृत्तसंपादनाचे काम केले. स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी, ही काही त्यापैकी असलेली वृत्तपत्रे.
मराठी लिखाणावर प्रेम असणारे कुसुमाग्रज, पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आले. त्यावेळीही मराठी साहित्याची अवस्था तशी दुर्दैवीच होती. डॉक्टर अ.ना. भालेराव यांनी कुसुमाग्रजांना दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी खरी प्रेरणा दिली. त्यातूनच एक सच्चा कवी आणि श्रेष्ठ नाटककार उदयास आला. त्यांच्या साहित्यातून कायमच नव समाजाचे चित्र उमटत राहिले. बुरसटलेल्या विचारांना डावलत, त्यांनी साहित्यात नवक्रांती घडवली आणि म्हणूनच त्यांना “आधुनिक युगाचे कवी” म्हणतात.
त्यांची साहित्य संपदा ज्यात कविता, नाटके, कथासंग्रह यांचा समावेश आहे ती अफाट आहे. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने कुसुमाग्रजांविषयी लिहिताना त्यांच्या अनेक कविता मनात गर्दी करतात. पृथ्वीचे प्रेम गीत, कोलंबसचे गर्वगीत, क्रांतीचा जयजयकार, जोगीण, सागर, अखेर कमाई, नदी या कवितेतल्या अनेक ओळी मनावर चपखल बसलेल्या आहेत.
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान
एकेक जात, जमात तरी तुमच्या पाठीशी आहे
माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती…
या संपूर्ण कवितेतला उपहास, त्यांच्या प्रत्येक शब्दातून जाणवल्याशिवाय राहत नाही.
पृथ्वीचे प्रेमगीत ही तर नितांत सुंदर कविता. शब्द, काव्य भाव, आंतरिक वेदना, उसासे, उमाळे या सर्वांचा एकत्रित अविष्कार म्हणजे पृथ्वीचे प्रेम गीत. एक सुरेख रूपकात्मक, प्रातिनिधिक काव्य !
परी दिव्य तेज पाहून पूर्ण
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे …
या काव्यपंक्ती काळजाच्या आरपार जात मनावर प्रहार करतात.
शब्द— जीवनाची अपत्ये
मृत्यूपर्यंत पोहोचत नाहीत
म्हणून तुझ्या समाधीवर
मी वाहत आहे
माझे मौन..
विलक्षण ताकद असलेलं, खोलवर जाऊन रुतणारं, नि:शब्द करणारं काव्य म्हणजेच कुसुमाग्रजांची कविता!
त्यांच्या कवितेत रंग, रस, भाव यांचं वैविध्य आणि संमिश्रण जाणवतं. जितक्या सामर्थ्याने, आवेशाने, वीरश्रीने,
गर्जा जयजयकार क्रांतीचा।
गर्जा जयजयकार ।
अन् वज्रांचे छाती वरती घ्या झेलून प्रहार।।
असे शब्द धावतात, तितक्याच हळुवारपणे
आणि गेलीस तू— वसंत ही सखे गेला तुझ्या संगती पुष्पातील उडून गंध उरले निर्माल्य हे भोवती…
याही काव्यपंक्ती उलगडतात.
आजही समुद्रकिनारी क्षितिजावर सूर्य बुडताना पाहत असताना, नकळत याच ओळी मुखातून सहज बाहेर येतात..
आवडतो मज अफाट सागर
अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर
सायंकाळी मिळे
केस फुलांचे सफेद शिंपीत
वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती
गात किनाऱ्याकडे ….
कणा या कवितेतील संवेदनशील, सर्वच हरवलेल्या व्यक्तीची एकच मागणी हृदयाला जाऊन भिडते.
पैसे नकोत सर.. जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार
तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून
फक्त लढ म्हणा….
नैराश्यग्रस्त अवस्थेतल्या अनेकांना केवळ या जबरदस्त शब्दांनी पुन्हा नवी उभारी, नवी ताकद, नवे बळ दिले असेल.
आत्माविष्कार आणि संवाद याचे परिणिती म्हणजे कुसुमाग्रजांचे काव्य.
दुर्बोधता, अश्लीलता, लैंगिकता या प्रवृत्ती बद्दल त्यांनी सदैव नापसंती व्यक्त केली. त्यांनी सामाजिकतेचा स्वीकार केला. पढिक पांडित्याच्या कैदखान्यात ते बांधून राहिले नाहीत. म्हणूनच ते सामान्य माणसांपर्यंत त्यांचे शब्द,विचार घेऊन पोहोचले.
बांधीलकीपेक्षा सामीलकी त्यांना हवी होती. बांधिलकी ही स्थिर आहे आणि सामीलकी ही प्रवाही आहे, असे त्यांचे मत होते. विचारांचे प्रवाहीपण त्यांनी कधीही नाकारले नाही. पर्यायाने अस्तित्व आणि संस्कृती ही त्यांच्या काव्यातून सदैव विकसित होत गेली. त्यांच्या जाणिवा व्यापक आणि सर्वस्पर्शी होत्या.
ज्ञानपीठ पुरस्काराने, साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांच्या अलौकिक साहित्यावर एक दृश्य स्वरूपाचा महान शिक्का उमटला… पण माझ्या मते, आमच्यासारख्या सामान्य व्यक्तींच्या मनात त्यांच्या काव्यपंक्ती, त्यांच्या आख्खा शब्द खजिना, पिढ्यान पिढ्या टिकून राहावा यासारखं त्यांच्यासाठी दुसरं भूषण कोणतं ?
मराठी भाषेने आम्हाला काय दिलं तर अभिमानाने मराठी भाषिक सांगतील,
“या भाषेने आम्हाला कुसुमाग्रज दिले…”
धन्यवाद !

– लेखन : राधिका भांडारकर. पुणे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800