कोरोनाच्या या खडतर काळात पुणे येथील शं. ल. चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून दररोज ३०० गरजूंना मोफत जेवण देण्यात येत आहे. तसेच खेड शिवापुर दर्गा येथील वस्ती, तसेच अनेक बेघर लोकांना पोटभर अन्न मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
या अन्नदानात नेहमीच्या जेवणा व्यतिरिक्त वेगळ्या पद्धतीने कधी मिसळ पाव, कधी पावभाजी, खिचडी पुलाव, पुरणपोळी, पुरीभाजी, थालीपीठ अशा विविध पदार्थांचा समावेश असतो. हे पदार्थ बनविण्याचे काम बचत गटाच्या महिलांना देण्यात आले आहे. त्यामुळे या महिलांना रोजगारही मिळत आहे. अन्नाची गुणवत्ता चांगली ठेवण्यावर संस्थेचा भर असून सध्या पंचवीस महिला या कार्यात सहभागी असल्याचे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. गिरीजा भास्कर शिंदे यांनी सांगितले.

महिलांना प्रशिक्षण
सध्या सर्वत्र संचारबंदी असल्यामुळे अनेक व्यवसाय बंद करावे लागले आहेत तर काही ठिकाणी रोजंदारीवर काम करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व बाबींचा विचार करून शं. ल. चव्हाण प्रतिष्ठानतर्फे महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या दृष्टीने मोफत प्रशिक्षण वर्ग घेण्यात येत आहेत जेणे करून महिलांना घर बसल्या व्यवसाय सुरू करता येईल.
यामध्ये सर्व प्रकारचे मसाले, इन्स्टंट पीठे, कागदी पिशव्या, विविध प्रकारचे आयुर्वेदिक तेल, वाळवणीचे पदार्थ, बाळंतविडा, गोधडी, इमिटेशन ज्वेलरी, बाग आणि सेंद्रिय खत निर्मिती, विविध प्रकारची कलाकौशल्य, रुखवत, बालवाडी प्रशिक्षण, अंगणवाडी प्रशिक्षण, डेंटल डॉक्टर असिस्टंट प्रशिक्षण, नर्सिंग असिस्टंट प्रशिक्षण, वृद्ध सेवा प्रशिक्षण, असे अनेक प्रशिक्षण वर्ग घेऊन महिलांना रोजगार मिळवून दिला जात आहे.
कागदी पिशव्यांच्या प्रशिक्षणामुळे महिलांना कायमस्वरूपी काम मिळाले असून गोधडी प्रशिक्षणामुळे महिलांनी बनवलेल्या आकर्षक गोधड्यांना दुबईची बाजार पेठ मिळाल्याचेही डॉ. शिंदे यांनी सांगितले. हे सर्व उपक्रम सर्व सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करून करण्यात येत आहे.
अशा प्रकारे महिलांना अर्थार्जन मिळवून देण्याचे काम गेले वर्षभर सुरू आहे. यामुळे चव्हाण प्रतिष्ठान, बचत गट तसेच बेरोजगार महिलांसाठी हक्काचे स्थान झाले आहे. राज्यात असेच उपक्रम इतरही स्वयंसेवी संस्थांनी राबविल्यास गरजूंना निश्चितच मोठी मदत होईल.
– लेखन : करुणा पाटील.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.