तिचे माझे तसे तर फारसे नव्हतेच काहीही
जगाने काढले अंदाज पण भलतेच काहीही
तिच्याविषयी कुणाशी मी कधीही बोललो नाही
तरीही बातमी माझी कशी फुटतेच काहीही
अताशा रोजची माझी गझल होतेच एखादी
अशी आहेच ती की पाहता सुचतेच काहीही
मला नक्की कळत नाही कसे मी प्रेम हे लपवू
किती मी काळजी घेतो तिला कळतेच काहीही
कधी रस्त्यात दिसता मी मला घेते मिठीतच ती
अता स्वप्नातही माझ्या असे दिसतेच काहीही
कशाला मी करू पर्वा, करू का काळजी सांगा
असे प्रेमात पडल्यावर नवे घडतेच काहीही

– रचना : शेखर गिरी
❤️❤️❤️❤️❤️❤️