मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ शहर सध्या थंडीत कुडकुडत आहे. मोठ्या प्रमाणात थंडीचा पारा खाली गेल्याने उबदार कपड्याशिवाय लोक राहू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे.
सध्या शहरात थंडीचा पारा 10 डिग्री पेक्षाही खाली आला असून गरम आणि उबदार कपड्यांची खरेदी करण्यासाठी भोपाळमधील बाजारपेठा ओसंडून वाहत आहेत. मग रेल्वे स्टेशनचा परिसर असू दे नाहीतर कलेक्टोरेट, लालघाटी, श्यामला हिल्स, बोरखेडा, एम पी नगर असू दे नाही तर गांधीनगर या भागातील लोक थंडीमुळे हैरान झाले आहेत.
भोपाळ शहरामध्ये एवढी थंडी असूनही पोटापाण्याच्या दैनंदिन सोयीसाठी प्रत्येकजण धावताना दिसतो आहे. तिकडे गांधीनगरकडून ब्योवरा व अन्य गावे किंवा इंदौर-सागर हायवेवर दुचाकीवरून मोठमोठ्या ट्रकला सजवण्यासाठी जे विविध प्रकारचे साहित्य लागते ते थेट ट्रकवाल्यांपर्यंत पोहचवण्याचं काम दुचाकीस्वार करीत आहेत. आपापल्या ऐपतीनुसार कुणी मोटारसायकल, कुणी लुना तर कुणी स्कूटरचा वापर करून ट्रकवाल्यांना त्यांच्याकडील सजावटीचे सामान विकतात. ट्रकवालेदेखील ‘लाइफ ऑन हिल’ सारखे आठ आठ दिवस घरदार, कुटूंब सोडून सफरीवर असतात. देशाच्या कानाकोपऱ्यातील विविध प्रकारच्या मालाची ते ने-आण करीत असतात. त्यामुळे रस्त्याने अथवा हायवेवर असणारे धाबे हेच त्यांचे जगण्याचे आधारस्तंभ असतात. धाब्यावरच थांबून आंघोळ करणे, तेथेच जेवण करणे आणि पुढच्या प्रवासाला लागणे असा त्यांचा दिनक्रम ठरलेला असतो.
या हायवेवर पंजाबच्या सरदारजींचा अधिक भरणा असतो. त्यामुळे आठ दिवस घराबाहेर राहणारे हे लोक स्वतःच स्वतःची करमणूक करून घेत समाधान मिळवण्याचा प्रयत्न करीत असतात.
त्यातच अनेक ट्रकचालक आपली गाडी अधिकाधिक सुशोभित ठेवण्याचा आणि मनाच्या प्रसन्नतेसाठी अशा दुचाकीवाल्यांकडून गाडी सजवण्यासाठीचे सामान विकत घेतात, असे फौजी मिराशी या सजावटीचे सामान विकणाऱ्या दुचाकी चालकाने सांगितले.
हे दुचाकी चालक भोपाळमध्ये विशेषतः हायवेवर आपल्याजवळील सामान विकताना दिसतात. त्यांच्या दुचाकीवर रंगीबेरंगी चोटी, रुमाल, विविध प्रकारची प्लास्टिकची फुले आदी सामान असते. ट्रकवाले देखील त्यांच्याकडून शोभिवंत साहित्याची खरेदी करतात.
भोपाळमध्ये विशेषकरून हायवेवर जवळपास 10-11 मैल पर्यंतचा प्रवास हे दुचाकीवाले करुन आपल्याजवळील साहित्याची विक्री करतात. दिवसभरात अडीचशे किंवा तिनशे रुपयांचे पेट्रोल त्यासाठी लागते. मात्र दिवसभरात आठशे किंवा एक हजार रुपयांचा आमचा धंदा होत असल्याचे फौजी मिराशी यांनी सांगितले. याच होणार्या कमाईवर आमचा प्रपंच चालतो, असेही त्यांनी सांगितले. भोपाळ शहरात माझ्यासारखे 15-20 लोक अशाप्रकारची कामे करतात, असेही त्यांचे म्हणणे आहे.
ट्रक गाड्यांना सजवण्याचे हे लोक काम तर करतातच शिवाय त्यांच्यामुळे रस्ते, हायवे यांचीही सजावट झाल्याचे पहायला मिळते. एक प्रकारचे अनोखे मनमोहक दृश्य भोपाळच्या दहा दिवसाच्या मुक्कामात पहायला मिळाले. त्यामुळे यावर काहीतरी लिहिले पाहिजे, असे मनाला सतत वाटत होते. कारण असे दृश्य पहिल्यांदाच नजरेस पडले होते.

– लेखन : शेषराव वानखेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
