विज्ञानवादी, समाजसुधारक, सेवाभावी संत गाडगबाबांनी विविध लोकोपयोगी संस्था उभ्या केल्या. समाजाला नवी दृष्टी देणारे उपक्रम राबविले. त्यांच्या या सर्व सेवा कार्याची महती आणि माहिती सांगतायेत, अकोला येथील पत्रकार श्री विशाल बोरे. श्री बोरे हे दूरदर्शन, पीटीआय वृत्त संस्थेचे प्रतिनिधी आहेत.
न्यूज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे हार्दिक स्वागत आहे.
– संपादक
“जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले,
तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा”
आयुष्यभर विज्ञानवादी विचार प्रत्येक मनात तेवत ठेवणारे, भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या नागड्यांना वस्त्र अशी दशसूत्री प्रत्यक्ष अमलात आणून जगावेगळा विचार मांडणारे खरे लोकसंत म्हणजे श्री संत गाडगे महाराज..
देशाला स्वच्छतेचा मूलमंत्र देणाऱ्या संत गाडगेबाबांची मूर्तिजापूर ही खरी कर्मभूमी .संत गाडगे महाराजांनी १९०५ मध्ये मूर्तिजापूर येथे गोरक्षणची स्थापना केली. त्या परिसरात संत गाडगेबाबांनी कुटुंबीयांसाठी झोपडी उभारून तेथे वास्तव्यही केले आहे. त्यांच्या सेवाभावी कार्याचा वसा अनेकांनी जोपासत तो काळाच्या सोबत पुढे आणला.
संत गाडगेबाबांचे पणतू सतीश सोनवणे यांच्या मार्गदर्शनात मूर्तिजापूरमध्येच मातोश्री कुंतामाता कन्या छात्रालय सुरू आहे. यामध्ये सध्या गोरगरिबांच्या ६० मुलींचे शिक्षण सुरू आहे.तर मुंबईतील श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा मिशनचे व्यवस्थापन मूर्तिजापूरचे प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
संत गाडगेबाबांनी मुर्तीजापुरला सुरू केलेले गोरक्षणाचे कार्य बापूसाहेब देशमुख अविरतपणे करीत असून त्यांच्या व्यवस्थापनात अमरावती जिल्ह्यातील नागरवाडी येथे ८०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
१९५४ मध्ये संत गाडगेबाबांनी मुंबईत जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रोगी व नातेवाइकांसाठी भायखळा येथे धर्मशाळा बांधली. हीच प्रेरणा घेऊन २३ डिसेंबर १९८४ मध्ये दादर येथे श्री.संत गाडगे महाराज मिशन धर्मशाळेचा जन्म झाला. ही धर्मशाळा सुरू झाल्यापासून अखंड सेवेचे व्रत घेऊन कार्यरत आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या टाटा मेमोरियल सेंटरला कर्करोगाच्या उपचारासाठी जगभरातून येणाऱ्या लाखो रुग्णांसाठी ही वास्तू ‘हक्काचां निवारा” बनली आहे.
“सेवा परमो धर्म” हे ब्रीद घेउन या सात मजली धर्मशाळेमध्ये सातशे लोक राहण्याची व्यवस्था आहे. एक मोठा हॉल, २ लहान हॉल ज्याचे भाडे नाममात्र केवळ ५० रुपये प्रतिदिवस आहे. धर्मशाळेत १५० खोल्या असून यामध्ये ४५० लोक राहू शकतात, ज्यांचे प्रतिव्यक्ती भाडे केवळ ७० रुपये आहे. अनेकदा रुग्णाकडे भाडे देण्यासाठीही पैसे नसतात. पण पैसे नाहीत म्हणून एकही रुग्ण आजवर परत गेला नाही. इथे लाखो रुग्णांना मायेचा आधार मिळत आला आहे.
अन्नछत्र:
या धर्मशाळेत येणाऱ्या प्रत्येकासाठी वर्षभर गाडगेबाबा अन्नछत्र चालवल्या जाते. ज्यामध्ये सकाळी ४५० लोकांना वरण-भात-भाजी-पोळी तर सायंकाळी ५५० लोकांना वरण-भात-भाजी-पोळी या सह मिष्टान्न ही दिल्या जाते.हे कार्य वर्षातील ३६५ दिवस अखंडपणे सुरू असते.
“संत गाडगेबाबांच्या संदेशानुसार भुकेलेल्याना अन्न” हा त्या मागचा विचार आहे.विशेष म्हणजे गाडगेबाबा अन्नछत्रासाठी देशभरातील अन्नदाते पुढे येत असतात. अन्नछत्राच्या २०२५ मधील सर्व तारखा बुक झालेल्या असून एखाद्या अन्नदात्याला अन्नदान करायची इच्छा असेल तर त्याला अन्नदानासाठी २०२६ ची वाट पहावी लागेल.असे हे बहुदा जगातील एकमेव उदाहरण असावे !
चौथी पिढीही सेवेत:
“जळणाऱ्याला विस्तव कळतो बघणार्याला नाही.
जगणाऱ्याला जीवन कळते पळणाऱ्याला नाही.”
मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो गावातील भिकुबाई गुलाबराव देशमुख गाडगेबाबांच्या कीर्तनाला जायच्या. हिरपूरचे कीर्तन ऐकून भिकुबाईचे मनपरिवर्तन झाले . त्यानंतर देशमुख कुटूंबानी पुर्ण आयुष्य गाडगेबाबाच्या कार्यासाठी अर्पण केले. भिकुबाईचे जेष्ठ पुत्र दादासाहेब देशमुख वयाच्या १८ व्या वर्षांपासून आयुष्यभर गाडगेबाबा सोबतच राहीले.हाच वारसा देशमुख कुटुंबातील चौथ्या पिढीपर्यंत आला आहे. दादासाहेबांचे पुत्र गोविंदराव उर्फ अण्णासाहेब व त्यानंतर हाच विचार उच्चविद्याविभूषित असणाऱ्या व सध्या संत गाडगेबाबा मिशन धर्मशाळा ट्रस्टचे व्यवस्थापक असणाऱ्या प्रशांत देशमुख व त्यांच्या तीनही लहान मुलांपर्यंत रुजला आहे.विदेशी बँकेतील लाखो रुपयांची नोकरी सोडून प्रशांत देशमुख सेवेचा वसा घेऊन २००५ मध्ये दादर येथील संत गाडगेबाबा धर्मशाळेचे व्यवस्थापक म्हणून सेवा देऊ लागले. त्यांनी मोळकडीस आलेल्या संत गाडगेबाबा मिशन धर्मशाळेचे रूपच पालटले.
विविध धर्मशाळा
मुंबईमध्ये जेजे रुग्णालयाच्या बाजुला भायखळा धर्मशाळा, केइएम हॉस्पिटलजवळ परेल धर्मशाळा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, सेंट जॉर्ज हॉस्पिटल जवळ धर्मशाळा, खारघर, नवी मुंबई धर्मशाळा तसेच पंढरपूर, नाशिकसह राज्यभरात गाडगे बाबांनी धर्मशाळा स्थापन केल्यात.
विशेष म्हणजे राज्यातील एकाही धर्मशाळेतील कोणतेही पद किंवा मालकी संत गाडगेबाबांनी स्वतःच्या नावे कधीही घेतली नाही. तर सर्व धर्मशाळेवर सेवाव्रती भाव असणारे विश्वस्त नेमले. गाडगेबाबानी विश्वस्त नेमताना प्रत्येक वेळी त्यांची पारख केली.
“लाखो रुपयांच्या धर्मशाळा बांधल्या जगतात,
स्वतःच्या नावाने काहीच नाही,सर्व पंचाच्या ताब्यात…”
कॅन्सरमुक्त भारत अभियान:
एखाद्या व्यक्तीला कर्करोग झाला की त्याचे कुटुंबच नव्हे तर संपूर्ण गाव चिंतेत असते. त्यामुळे देश कॅन्सरमुक्त व्हावा या उदात्त हेतूने आगामी काळात देशातील चार राज्यात संत गाडगेबाबा कॅन्सर केअर सेंटर उभारले जाणार आहे. त्या संदर्भातील कामे सुरू झाली आहेत. मुंबईतून कर्करोगातून मुक्त झालेले रुग्णच त्यांच्या राज्यातील सेंटरवर हे काम पाहणार आहेत. म्हणजे कर्करोगमुक्तच खरे “राजदूत” असणार, हे उल्लेखनिय आहे.
देशभरातून मुंबईतील टाटा ट्रस्ट हॉस्पिटल येथे कर्करोगावर उपचार करण्यासाठी रुग्ण मोठ्या संख्येने येतात. येथे उपचारार्थ येणाऱ्या गोर-गरीब रुग्णांना दादरच्या धर्मशाळा ट्रस्टकडून मोफत राहण्याची व जेवण्याची व्यवस्था केली जाते. मुंबईत कुठे थांबावे, कर्करोगाच्या उपचारासंदर्भात असणाऱ्या सोयी-सुविधांच्या अनुषंगाने योग्य मार्गदर्शन मिळावे व देश कर्करोगमुक्त व्हावा हाच विचार यामागे आहे.
विचारांची नाळ :
आजवर मुंबईत उपचारासाठी आलेल्या लाखो रुग्णांना कुटुंबाप्रमाणे प्रेम देऊन मायेचा निवारा देणाऱ्या संत गाडगेबाबा धर्मशाळेतून सर्व रुग्ण कर्करोगमुक्त होऊनच जातात. कारण वास्तूमध्येच एक सकारात्मक ऊर्जा आहे. त्यामुळे संत गाडगेबाबांचा विचार लाखो रुग्णांसाठी आज प्रेरणा बनला असून गाडगेबाबांच्या विचारांची नाळ देशभरात पसरलेली दिसत आहे.
लवकरच पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगला संत गाडगेबाबा कॅन्सर केअर सेंटर होणार असून दार्जिलिंग मधील घरोघरी गाडगेबाबांच्या प्रतिमा लागलेल्या आहेत हिच खऱ्या अर्थाने गाडगेबाबांच्या विचारांची नांदी म्हणता येईल.
संत गाडगेबाबा धर्मशाळेचे व्यवस्थापक प्रशांत देशमुख यांच्या प्रयत्नाने संत गाडगेबाबांची प्रेरणा घेऊन उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे दिनेशचन्द्र जैन प्रतिष्ठान व उद्योगपती राहुल जैन यांच्या सहकार्याने लवकरच गाडगेबाबांच्या नावाने एक अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय निर्माण होणार असून यामाध्यमातून गाडगेबाबांचे कार्य संपूर्ण आशिया खंडात एक मोठा विचार पेरणारे ठरेल.
आजीवन सेवक
२००५ मध्ये विदेशी बँकेतील नोकरी सोडून अडीच वर्षाचा मुलगा घेऊन दादरच्या धर्मशाळेत आलेले प्रशांत देशमुख आज खऱ्या अर्थाने स्वतःला गौरवान्वित समजतात. संत गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा लाभल्याने आपल्याला धर्मशाळेमध्ये सेवा देण्याची संधी मिळत आहे. अजून काय हवे असते आयुष्याकडून ? असे त्यांचे मत आहे. धर्मशाळेचा व्यवस्थापक या पदापेक्षा संत ‘गाडगेबाबांच्या विचारांचे सेवक’ हे पद मला जगावेगळे वाटते कारण हे पद कधीही जाऊ शकत नाही, असा आशावाद प्रशांत देशमुख व्यक्त करतात.
“उद्देश पावलांचा
जाणे पुढेच जाणे,
हे ध्येय काय असते थांबायचे बहाणे”

– लेखन : विशाल बोरे. अकोला
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
गाडगेबाबा हे भारतातील श्रेष्ठ कर्ते समाजसुधारक होते.समाजातील उपेक्षित घटकांसाठी जे लोकप्रबोधन आणि सेवेचे कार्य सुरु केले ते आज विविध लोकांकडून विस्तारित रूपात केले जाते.बाबांच्या कार्याचा हा वटवृक्ष नक्कीच आनंददायक आहे. सुंदर लेख.