“खरे की कळेना..” हा आकर्षक शीर्षक असलेला एक अत्यंत श्रवणीय व देखणा म्युझिकल व्हिडिओ नुकताच यू ट्यूब वर बघण्यात आला. या अवघ्या दोन कडव्याच्या गाण्यातून दिग्दर्शकाने एका भावस्पर्शी रचनेला कथारूपात प्रेक्षकांपुढे प्रभावीपणे मांडले आहे.
व्हिडिओत आपल्याला काव्याच्या तरलपणाला साजेशा एका टवटवीत तरूण जोडप्याचे सौम्य सुखद सहजीवन सुरू झालेले व फुलत गेलेले दिसते. अतिशय साधे नैपथ्य व परिणामकारक प्रकाश योजना वापरून, कुठेही भडक न होऊ देता त्यांच्या नात्यातील ऊब दाखवण्यात दिग्दर्शक सफल झाले आहेत. कथेची हाताळणी प्रेक्षकांना खिळवून ठेवते व पुढे काय
ही उत्सुकता वाढवत जाते. सावनी भट्ट व प्रांजल आचार्य या उदयोन्मुख कलाकारांनी सशक्त पण संयत अभिनय करून गाण्याचा बाज पडद्यावर सुंदर साकार केला आहे. काव्य, स्वरसाज, गायन, दिग्दर्शन, अभिनय यासह एकूणच सादरीकरण व विशेषतः व्हिडिओचा शेवट प्रेक्षकाच्या अंतर्मनास स्पर्शून जाण्यात यशस्वी ठरला आहे .
डॅा. स्वाती घाटे यांच्या “आठवण कोऱ्या पानाची” या काव्यसंग्रहातील काव्याला सावनी भट्ट हिने साज व आवाज दिला आहे.
सावनीचा आवाज खूपच तरल, काव्याला आणि प्रसंगाला अत्यंत अनुरूप आहे. मंदगतीचे शांत संगीत व कर्णमधुर वाद्यमेळ यामुळे काव्यातील भावनांची परिणामकारकता वाढली आहे.
एक ताजेतवाने गाणे या सहजसुंदर चित्रफितीद्वारे जिवंत करून समोर आणण्यात ऑफ टॉपिक मिडिया लॅब व क्रिएटीव्ह डायरेक्टर, फोटोग्राफर व एडिटर ओजस गोडटवार सफल झाले आहेत, याचा प्रत्यय प्रत्येकाला निश्चितच येईल.
हा व्हिडिओ आपण पुढील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
— लेखन : सौ. अंजली मराठे. बडोदे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800