चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी पाडवा हा आपला नवं वर्षाचा पहिला सण असतो. पाडवा म्हणजे शुभ दिवस. वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस.! हा नववर्षाचा पहिला दिवस.! गुढी हे आनंदाचे प्रतीक! गुढी म्हणजे एक प्रकारचा विजय ध्वज!. विजयानंतर गुढी उभारून आनंदोत्सव साजरा करतात.
शालिवाहन राजाने शकांवर विजय मिळवला. तेव्हापासून शालिवाहन शकाची परंपरा सुरू झाली. हा विजयोत्सव दाराबाहेर गुढी उभारून साजरा करण्याची परंपरा आहे. त्यालाच गुढीपाडवा असे म्हणतात. हा नववर्षाची शुभ सुरुवात असल्यामुळे विशेष महत्वाचा आहे !

गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या नवरात्राला प्रारंभ होतो. प्रभू रामचंद्रांनी लंकाधिपती रावणाचा वध करून चौदा वर्ष वनवास संपल्यावर या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला.गुढीपाडवा आनंदाचा उत्साहाचा सण आहे
गुढीपाडव्याचे पौराणिक, ऐतिहासिक आणि साहित्यिक महत्व अनेकांनी प्रतिपादित केले आहे.
म्हाईंभट, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत जनाबाई आणि संत चोखामेळा यां सर्वांच्या लेखनांत, गुढीचे उल्लेख येतात.
महाराष्ट्रीय गुढीचे लिखित साहित्यिक संदर्भ पंडित म्हाइंभट सराळेकर रचित लीळाचरित्रात उल्लेख आहे “….
मग तेंही सडासंमार्जन करवीलें
चौक रंगमाळीका भरवीलीया
गुढी उभविली उपाहाराची ॥
संत ज्ञानेश्वर….
ज्ञानेश्वर माऊलींनी विजयाची गुढी उभारतात असा उल्लेख ज्ञानेश्वरीत केला आहे .
अधर्माचि अवधी तोडीं ।
दोषांचीं लिहिलीं फाडीं ।
सज्जनांकरवी गुढी ।
सुखाची उभवीं ॥
ऐकें संन्यासी आणि योगी ।
ऐसी एक्यवाक्यतेची जगीं ।
गुढी उभविली अनेगी।
शास्त्रांतरी ॥
माझी अवसरी ते फेडी ।
विजयाची सांगें गुढी ।
येरु जीवीं म्हणे सांडीं ।
गोठी यिया ॥
संत ज्ञानेश्वरांनी सुखाची गुढी म्हटले आहे .
संत नामदेव ….
हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांनी हिंदीतही काव्यरचना केली आहे
देवा गगन गुडी बैठी मैं नाहीं तब दीठी ॥टेक॥
जब लीग आस निरास बिचारै तब लगि ताहि न पावै ॥
देवा आज गुडी सहज उडी । गगन मांहि समाई ।
बोलन हारा डोरि समांनां । नहीं आवै नहीं जाई ॥
कागद थैं रहित गुडी । सहज आनंद होई ।
नांमदेव जल मेघ बूंद । मिलि रह्या ज्यूं सोई॥
श्रीराममाहात्म्य – रामजन्म …
फोडा फोडारे भांडारें । आणवा गाईचीं खिल्लारें
उभवा उभवारे गुढी । सोडा वस्रांचीं गाठोडीं ॥
संत जनाबाई ….
ऋषि अभिषेकिती रायाला । थोर मनीं आनंदाला
राया प्राप्ती जाला पट । गुडी उभवी वसिष्ठ ॥
येथुनी हरिश्चंद्र आख्यान । नामयाची जनी म्हणे ॥
चोखामेळा …विविध
नामदेवांच्या संतमेळ्यातील वारकरी संतकवी होते.
टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥
संत एकनाथ महाराज…
संत एकनाथ महाराज यांच्या साहित्यात, अभंगात, एकनाथी भागवतात, भारूढात गुढी शब्द कैक वेळा वापरला.
आत्मस्थिती….
भक्त देव एके ठायीं ते आवडी । घेऊनिया गुढी जाऊं तेथें ॥१॥
चतुःश्लोकी भागवत…
सेवक परचक्र विभांडी । राजा हर्षाची उभवी गुडी ॥
एकीं शाद्विकशास्त्रमूढीं । ज्ञातेपणाची गुडी॥
एकनाथी भागवत …
जेणें रामराज्याची रोकडी । उभविली गुढी तिन्ही लोकीं ॥
भजन वाढे चढोवढी । भक्तीची गुढी वैकुंठीं उभारे ॥
मी राम म्हणोनि हांक फोडी । जैताची गुढी कीर्तनीं ॥
शत्रु जिणोनियां डाडीं । रणांगणीं उभवितां गुढी ॥
उभवूनि वैराग्याची गुढी । प्राणापानवोढी जिंकिल्या ॥
म्हणौनि रोमांची उभविली गुढी । जिंतिली गाढी अविद्या ॥
जेणें भावार्थाची उभविली गुढी । तो जाणे गोडी मद्भक्तीची ॥
हृदयीं स्वानंदाची उभवी गुढी । एवढी गोडी श्रवणार्थी ॥
लागतां स्वानंदाची गोडी । उभिली गुढी रोमांची ॥
उभवूनि सायुज्याची गुडी । परापरथडी पावले ॥
त्याच्या निजधर्माची गुडी । उभारे रोकडी वैकुंठीं ॥
जेणें भावार्थाची उभविली गुढी । तो जाणे गोडी मद्भक्तीची ॥
लागतां स्वानंदाची गोडी । उभिली गुढी रोमांची ॥
उभवूनि सायुज्याची गुडी । परापरथडी पावले ॥
त्याच्या निजधर्माची गुडी । उभारे रोकडी वैकुंठीं ॥
भारूड – गाय
जनी जनार्दन दुहिला आवडी ।
उभविली गुढी एकनाथे ॥
सेवकु परचक्र विभांडी । तंव राजा उभारी यशाची गुढी ॥

संत चोखोबा …
संत चोखोबा त्यांच्या अभंगात म्हणतात
टाळी वाजवावी गुढी उभारावी ।
वाट हे चालावी पंढरीची ॥१॥
संत तुकाराम महाराज
संत तुकारामांच्या गाथेतील गुढीचे उल्लेख आहेत
तुका ह्मणे गुढी आणीन पायांपें । जगा होइल सोपें नाम तुझें ॥3॥
पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥
तुकाराम महाराजांनी श्रीकृष्णाच्या बाललीलांचे वर्णन करणारे १०० अभंग आहेत. त्यांच्या बालक्रीडेचे अभंगात गुढ्या उभारण्याचा उल्लेख त्यांनी 5 वेळा केला आहे.
गुढिया तोरणे करिती कथा गाती गाणे II
रोमांच गुढिया डोलविती अंगें ।
आली दारा देखे हरुषाची गुढी | सांगितली गुढी हरुषें मात II
कृष्ण गोकुळात आल्यावर तेथे किती आनंदाचे वातावरण होते,ते सांगताना तुकाराम महाराज
म्हणतात.
ब्रह्मानंदें लोक सकळ नाचती ।गुढिया उभविती घरोघरी ॥
समर्थ रामदास….
समर्थ रामदासांच्या अभंगातील गुढीचे उल्लेख….
समर्थांनी दासबोध ग्रंथासोबत गाथा ही रचल्या होत्या.
कांहीं बोल रे विठ्ठला । मौन वेष कां धरिला ॥
काय मागतों गांठोडी । बोलसीना धरिली गुडी ॥ध्रु०॥
विष्णुदास नामा यांच्या अभंगात गुढीपाढव्याच्या दिवसाचा उल्लेख ‘गुढीयेसी’ असा आहे. रामाच्या अयोध्येत आगमनावर अभंग आहे .
अजिंक्य जिंकोनी आले कौसल्यानंदन । धन्य आजि दिन सोनियाचा ।।
कनक दंड चवऱ्या ढळताती रामा । विष्णुदास नामा गुढीयेसी ||
अर्वाचीन साहित्यात…
अर्वाचीन साहित्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी त्यांच्या ‘गुढी उभारनी’ या कवितेतून गुढीपाडव्याचे खालील अर्वाचीन साहित्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी त्यांच्या ‘गुढी उभारनी’ या कवितेतून गुढीपाडव्याचे वर्णन करतात.
आरंभ होई चैत्रमासीचा
गुढ्या-तोरणे सण उत्साहाचा
गुढीपाडव्याचा सन
आतां उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं
सोडा मनांतली आढी
स्त्री लोकगीत….
स्त्री लोकगीतांत गुढीपाडव्याचे वर्णन आहे.
गुढी पाडव्याला उंचे गुढी उभवावी
कुळाची कीर्ती जावी दाही दिशा ॥
गुढी पाडव्याला गुढी उंच उभी करी
खण घाली जरतारी गोपूबाळ ॥
गुढी पाडव्याला कडुलिंब खाती
आधी कडू मग प्राप्ती अमृताची ॥
गुढी पाडव्याला घरोघरी गुढी
पडू दे माझी कुडी देवासाठी ॥
पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी
चांदीची वर लोटी गोपूबाळाची ॥
पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी
कुळाची कीर्ती मोठी बाप्पाजींच्या ॥
पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी
वर खण जरीकाठी उषाताईचा ॥
सानेगुरुजी म्हणायचे, पंढरपूरचा विठोबा महाराष्ट्राच्या जनशक्तीचा तो मुका अध्यक्ष आहे. समतेच्या वाळवंटामध्ये सर्व वारकरी एकत्र येतात, जाती धर्म विसरतात.
एकची टाळी झाली
समतेची गुढी उभी राहिली.॥
अशा वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या संदर्भाने ही साहित्यिक गुढी आपल्याला आनंद देऊन जाते. संतसात्हित्यातून, अभंग, ओव्यातून विचार धारेतून आध्यात्मिक गुढी आपल्याला अलौकिक आत्मानंद देते.

— लेखन : मीना खोंड. हैद्राबाद. ह. मु. लंडन.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️+91 9869484800
