महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागातील अधिकारी
डॉ.चंद्रकांत हलगे यांना दि. 20 मे 2022 रोजी जळगाव येथे राज्यस्तरीय “गुणवंत पशुवैद्यक” पुरस्काराने गौरविण्यात आले, ही खरोखरच गौरवास्पद बाब आहे.
पशुसंवर्धन विभागाकडून दरवर्षी दिं.२० में या पशुसंवर्धन दिनानिमित्त उत्कृष्ट काम करणाऱ्या पशुवैद्यकांना सन्मानित करण्यात येते. हा पुरस्कार सहजासहजी मिळत नाही. या पुरस्कार निवडीसाठी 21 बाबनिहाय निकष, उद्दिष्टपूर्ती असे विविध निकष लक्षात घेऊन त्या आधारे केलेल्या गुणांकानाद्वारे जिल्हा व विभाग स्तरावरून शिफारस आयुक्तालयात केली जाते. यातील काही बाबी म्हणजे पशुसंवर्धन विषयक गत पाच वर्षाचे तांत्रिक काम, योजनांची अंमलबजावणी, अभिलेखे, नस्त्यांची अद्ययावतता, प्रसार माध्यमे व इतर लेखन प्रसिद्धी, यशोगाथा व लोकाभिमुख राबविलेले विविध उपक्रम, संख्यात्मक व गुणात्मक कामकाज आणि केलेल्या उल्लेखनीय कामकाजाच्या निकषावर हे पुरस्कार दिले जातात. त्यामुळेच हे पुरस्कार फार महत्वाचे आणि प्रतिष्ठित समजले जातात.
हा पुरस्कार पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-2 अंतुर्ली तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथे कार्यरत असलेल्या डॉ.चंद्रकांत शंकरराव हलगे यांना, “सहाय्यक पशुधन विकास अधिकारी” संवर्गातून सन 2019–20 साठीचा राज्यस्तरीय “गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार” प्रदान करण्यात आला. २० में रोजी जिल्हा परिषद सभागृह, पुणे तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री श्री सुनील केदार पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र सिंह, अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त, डॉ परकाळे, यांच्याहस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी कन्या सहाय्यक रचनाकार अधिकारी श्रेणी 1,
कु.रश्मी हलगे याही उपस्थित होत्या.
त्यांच्या ह्या पुरस्कार प्राप्ति बद्दल सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन झाले आहे.
डॉ. हलगे यांनी अंतुर्ली ता मुक्ताईनगर, पातोंडा ता.चाळीसगांव, जामनेर, यावल येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कामकाज केलेले आहे.
डॉ. हलगे यांना यापूर्वी विभागीय स्तरावरील आदर्श पशुवैद्यक पुरस्कार मिळाला आहे. ते पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे जळगाव माजी जिल्हा अध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे कार्यकर्ते व कासार समाज संघटनेत तसेच विविध संस्था संघटनांच्या जबाबदाऱ्या पार पाडीत आहेत.
डाॅ.चंद्रकांत हलगे आज जरी यशाच्या, कीर्तीच्या शिखरावर असले तरी, इथपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास सहज, सरळ, सोपा असा कधीच नव्हता.
विदर्भातील वाशिम ही डॉ चंद्रकांत हलगे यांची जन्मभूमी असली तरी त्यांचे बालपण, तरुणपण, शिक्षण ज्ञानभुमी, कर्मभूमी सर्व काही जळगाव जिल्ह्यातील जामनेर हीच राहिली आहे. तेथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यांचे
वडील पशुसंवर्धन खात्यात व्रणोपचारक होते. पण वडील लहाणपणीच वारले आणि या कुटुंबावर दुःखाचा पहाड कोसळला.

पण अशा परिस्थितीत खचून न जाता त्यांच्या आईने वडिलांच्या जागे वर अनुकंपा तत्त्वावर नोकरी पत्करून त्यांची व दोन लहान बहिणींची सर्व जबाबदारी स्व कर्तृत्वावर पार पाडली. अवेळीच आलेल्या संकटाला डॉ हलगे यांनीही समर्थपणे तोंड दिले. वेळ प्रसंगी दुध, पेपर, रांगोळी, लाॅटरीची तिकीटे, ब्रेड, खारी, बांगडी विकुन व खाजगी दवाखान्यात वाॅर्डबाॅय चे काम करुन ते बारावी विज्ञान झाले.
त्यानंतर त्यांनी व्हेटरनरी शाखेतील डिप्लोमा प्राप्त केला. बहिणी या परक्याचे धन आहे, कशाला अशा बिकट परिस्थितीत त्यांना शिकवा ? असा कोता, संकुचित विचार न करता स्वतः शिकत असतांनाच त्यांनी बहिणींनाही शिकवले. इतकेच नव्हे तर दोन्ही बहीणींची रितसर लग्नेही लावून दिली.
डॉ हलगे १९८६ साली महाराष्ट्र शासनाच्या सेवेत पशुधन पर्यवेक्षक म्हणुन रुजू झाले. अत्यंत निष्ठेने, आपल्याला जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देता येईल, याचा नुसता विचार न करता, प्रत्यक्ष तशी कृती ही ते करीत आले आहेत आणि अजूनही करीत आहेत. म्हणुनच त्यांना तत्कालीन पशू संवर्धन मंत्री मा.हसन मुश्रीफ, पशुसंवर्धन खात्याचे आयुक्त श्री एकनाथ डवले यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.
बऱ्याचदा एखादी व्यक्ती तथाकथित मोठी झाली की आपल्या जन्म दात्या आई वडिलांना विसरते. त्यांनी आपल्या साठी खाल्लेल्या खस्ता नजरेआड करते.पण डॉ हलगे मात्र मोठ्या कृतज्ञतेने नमूद करतात की, “माझ्यावर व माझ्या मुलांवर सर्व चांगले संस्कार माझी आई शारदाबाई हिने केले आहे.
त्यामुळे आमच्या यशाचे सर्व श्रेयही तिचेच आहे. स्वतः अशिक्षित असुन सुध्दा तिचे मनोबल उच्च होते, दृष्टी विशाल होती. आई चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करणारी व तसा विचार करायला लावणारी होती. म्हणूनच तिने सर्वांसाठी ध्येय निश्चित करून ते प्राप्त करण्यासाठी पाठपुरावा करायला शिकवले. आज आई हयात नाही. पण तिच्यामुळेच माझ्यासहीत माझी मुले सुध्दा हस्ताक्षर, लेखन, कविता, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा,
सुत्रसंचलन व ईतर विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करीत आहेत.”
डॉ हलगे यांची कन्या रश्मी या एम टेक झाल्या आहेत. पुढे त्यांची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून असिस्टंट टाऊन प्लॅनर, राजपत्रित अधिकारी वर्ग १ या मोठ्या पदावर झाली. अभिमानाची बाब म्हणजे या पदाच्या स्पर्धा परीक्षेत त्या राज्यात दुसऱ्या आल्या आहेत. आज त्या या पदावर वाशिम येथे कार्यरत आहेत.
डॉ हलगे यांचा मुलगा प्रसाद हा बीएमएस झाला असून तो सध्या एमबीएचे पुढील शिक्षण घेत आहे.
डॉ हलगे यांनी स्वतःचे आयुष्य “मी आणि माझे कुटुंब” इतकेच मर्यादित ठेवले नाही. तर व्यावसायिक, कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत असतानाच ते सामाजिक कार्यात ही व्यस्त आहेत. गेली 25 वर्षे ते पशुचिकीत्सा व्यवसायी संघटनेचे अध्यक्ष आहेत. तर जिल्हा परीषद कर्मचारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सचिव, अखिल भारतीय पशू वैद्यक संघटनेचे कार्यकारिणी सदस्य म्हणूनही ते जबाबदारी पार पाडीत आहेत.
समाजाने दिलेले समाजाला परत करणे हे आपले कर्तव्यच आहे, या भावनेने काम करण्याचा त्यांचा गुण सर्वच शासकीय, निमशासकीय आणि अन्य सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांनी अंगी बानवणे हीच आजच्या घडीला मोठी देशसेवा ठरेल.
अशा या गुणवंत पशुवैद्यक डॉ चंद्रकांत हलगे यांना व त्यांच्या परिवारास पुढील कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा.

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूप सुंदर यथोचीय लिखाण आमच्या या गुणी व मेहनती मित्राचे आपण केले याबद्दल आपले आभार, या आमच्या मित्रास त्याने पुढील काळातही असेच समाजकार्य सुरू ठेवावे, त्यासाठी त्याला उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य व बळ देवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना व त्याच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
गुणवंय पशुवैद्यक डॉ हलगे यांची स्टोरी आवडली. सर आपले अभिनंदन
उद् बोधक माहिती मिळाली