कधी हसते गालात
कधी मुसूमुसू रडे
समजेना रे मजला
क्लिष्ट मनाचे हे कोडे
कधी जाते भूतकाळी
घेई आठवांचा झोका
कधी जातो तोल याचा
चुके अवचित ठोका
नाही बसत हे स्थिर
जणू पायात भिंगरी
याला ताब्यात ठेवणे
आहे कला एक खरी
याच्या कप्प्यात दडले
काही अनमोल क्षण
थोडी आपली माणसे
काही घाव काही व्रण
मोह जालात फसते
भांडे बुद्धीशी ही किती
मन चंचल उनाड
आहे बिलंदर अती

– रचना : सायली कुलकर्णी. गुजरात