Sunday, December 22, 2024
Homeसाहित्यचला, हसु या!

चला, हसु या!

“हसा मुलांनो हसा” लहानपणापासून ऐकत आलेले हे गीत, यातील मर्म, ते आज कळलं. ”हसणे ” ही मानवी जीवनाची अत्यंत महत्त्वाची क्रिया आहे. या क्रियेतूनच सुख-दुःख, या भावना प्रकट होत असतात.

जीवनात आनंदाचे क्षण आले, की माणूस मनातल्या मनात हसतो. एखादा विनोद कळला, की ते मनातलं हास्य, चेहऱ्यावर पसरते. मग खो-खो हास्याचे ध्वनी कानी पडतात.

हसरी बाळे, हसऱ्या व्यक्ती सर्वांनाच आवडतात. तसेच दुसऱ्यांना हसवणारी व्यक्ती नेहमीच सर्वांना प्रिय असते. ही व्यक्ती स्वतःचे दुःख बाजूला ठेवून, दुसऱ्याच्या दु:खांना विसरवण्याचे भावूक काम करत असते. हास्याने मन प्रसन्न राहते. शिवाय हसताना चेहराही सुंदर व मनमोहक दिसतो.

घरात कितीही ताणतणाव असला, तरी अचानक येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत, चेहऱ्यावर “हास्य” ठेवूनच केले जाते. “चेहऱ्यावर हास्य असेल, तर जग भूलेल.” ह्या म्हणीतून कितीतरी चांगल्या गोष्टी घडून जातात.

हसतमुखाने नोकरीसाठी दिलेली मुलाखत, सर्वांची मने जिंकून, यश पदरी पडते. न जुळणारे विवाह, एका “हास्याने” लग्नगाठ बांधू शकतात. आजारी व्यक्ती उपचारासोबत, डॉक्टरला हसतमुख पाहून बरा होतो. कंपनीचा मालक किंवा कार्यालय मुख्य प्रबंधक, हसर्‍या-खेळकर वृत्तीतून, कामगारांकडून योग्य व नीटनेटके काम करून घेण्यास सफल होतो.

हसत- हसत शिकल्याने मुलांना न समजणाऱ्या गोष्टी, लवकर लक्षात येतात. दुकानदार स्वतःच्या, हसतमुख चेहऱ्याने, गिऱ्हाईक जोडून ठेवतो. अशा अनेक गोष्टी, एका “हास्याने” जुळून येत असतात.

“हसून- हसून पोट दुखले, बुवा!”, “हसून-हसून डोळ्यात पाणी आले.”, “हसून-हसून गाल दुखले.” हे “हास्य” कित्येक अवयवांसोबत क्रिया करत असते. हा सुद्धा एक योग प्रकार आहे. हसता- हसता, आंतरेंद्रिये क्रियाशील होतात. डोळ्यातून येणाऱ्या पाण्याने, डोळे स्वच्छ होतात. तर डोळ्यातील शिरा क्रियाशील होतात. खो-खो हसून गाल दुखतात, म्हणजेच गालांच्या शिरांना व्यायाम मिळतो.

थकून भागून घरी येताच, घरातील वातावरण हसरे असेल, तर त्या व्यक्तीचा, दिवसभराचा ताण-क्षीण क्षणात निघून जातो. म्हणूनच घराचे घरपण हसरे असणे खूप महत्त्वाचे आहे.

आजकाल काळानुरूप #छोटे कुटुंब, सुखी कुटुंब# ही पद्धत रूढ झाली आहे. छोट्या कुटुंबातील एक किंवा दोन मुले, आधुनिक विचारसरणीनुसार स्वतःच्या मनोरंजनात व्यस्त असतात. मग या घरात शिरताच दिवसभराचा ताण-तणाव कोण दूर करणार?

आजचा काळ स्पर्धात्मक झालेला आहे. स्वतःचे आयुष्य घडविण्यासाठी, विविध क्षेत्रात जागा मिळविण्यासाठी, प्रत्येक जण स्पर्धेच्या तयारीत असतो. प्रत्येक जण तणावाखाली जखडलेला आहे. त्यामुळे #हास्य# मिळवण्यासाठी, ज्याला- त्याला “हास्य- योगाभ्यास” करावे लागत आहेत.

घरातील जेष्ठ व्यक्ती, हास्य मिळविण्यासाठी, एखाद्या बगिच्यात, त्याच वयाची मंडळी एकत्र येऊन, जोरजोरात कृत्रिम हास्याचे योग करताना दिसतात.

मित्रांनो कृत्रिम आयुष्य जगण्यापेक्षा, नैसर्गिक खरेखुरे आयुष्य जगण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावयास हवा. देवाने बहाल केलेला, मूल्यवान दागिना, म्हणजे हास्य. जगी अशी एकही व्यक्ती नाही, की त्याच्या जवळ हा दागिना नाही. त्याचा आयुष्यात मनसोक्त वापर करून घ्यावयास हवा. जगी उल्हास पसरणारे हे हास्य, म्हणजे सुगंधित अत्तर आहे.

घरात मनमोकळेपणाने केलेला संवाद, घरात हास्य निर्माण करू शकतो. एकत्र कुटुंब पद्धती अवलंबली, तर घराचे गोकुळ होऊ शकते. त्यात कृष्ण-जीवन पाहताना, हास्याचे फवारे उडू लागतील. हसऱ्या स्वभावाने घराला घरपण येतं. हास्याने आयुष्य वाढतं. म्हणूनच ताण- तणावावरील एकच मात्रा, सर्वांनी स्वभाव राखा हसरा!

लेखिका – वर्षा भाबल.

– लेखन : वर्षा भाबल.
– संपादन : अलका भुजबळ. 9869484800

 

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments