लतादीदी चे जन्मस्थळ
मी गानसम्राज्ञी लता दीदी यांच्या सोबत पहिल्यांदा 1976 साली गायन केले. माझ्या आयुष्यातील दुसरे रेकॉर्डिंग दिदी व किशोर दा यांच्या सोबत ताडदेव च्या फिल्म सेंटर मध्ये केले होते. आर डी बर्मन यांचे संगीत होते. नंतर त्यांच्या सोबत अनेक गाण्यात कोरस मध्ये गायले. क्रांती, राम लखन, सौदागर असे अनेक चित्रपट होते.पण आता सर्व आठवत नाही.
लता दीदी सोबत मी पहिला स्टेज शो 28 फेब्रुवारी 1981 रोजी औरद शहाजनी, लातूर इथे केला होता.
त्यामध्ये सुरेश वाडकर, नितीन मुकेश, उषा जी यांचा सहभाग होता. या कार्यक्रमाचे निवेदन माझे मित्र हरीश भिमानी यांनी केले होते.
दुसरा स्टेज शो 28 फेब्रुवारी 1983 रोजी सोलापूर येथे वालचंद हिराचंद यांच्या कडून आयोजित करण्यात आला होता. पुण्याचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल साठी च्यारिटी शो केला होता.असे अनेक स्टेज शो केले.
लता दीदी यांच्या घरीही मी अनेक वेळा जात असे. त्यांची माझी चांगली ओळख होती.
मी अनेक संगीतकारांसोबत काम केले आहे. लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, ए आर रहमान, रवींद्र जैन राजकमल, तसेच टिव्ही मालिका रामायण, महाभारत, कृष्णा हेमामालिनी ची नुपूर अश्या अनेक मालिकांमध्ये माझा सहभाग राहिला आहे.
लतादीदी सोबतच्या अनेक आठवणी आहेत.
ज्यांच्या स्वरांनी गेली आठ दशके आपल्या मनावर अधिराज्य गाजवले त्या थोर लता दिदीचे जन्म स्थान पाहण्याची माझी फार वर्षांपासूनची इच्छा होती. हा सुवर्ण मनिकांचन योग नुकताच आला. दिदींचे जन्म स्थळ असलेल्या इंदोर येथील ज्या ठिकाणी दिदीचा स्वर पहिल्यांदा आसमंतात गुंजला ते ठिकाण पाहताना अंगावर रोमांच उभे राहिले. हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव आहे.
लता दीदी ना आपण स्वर सम्राज्ञी म्हणतो. खरे तर स्वर हे प्रत्येकाच्या परिचयाचेच असतात. प्रत्येकाच्या कंठात स्वर दडलेलाच असतो. परंतु ज्यांचा स्वर, साधना आणि श्रध्देचा, तपस्येचा बळ घेतलेला असतो तो शारदेच्या विणेमध्ये वसत असतो. सामान्य माणूस त्याच्या कंठातील स्वरांची पूजा बांधू शकत नाही म्हणून त्यांचा स्वर हा केवळ आवाजच असतो.
लतादीदी सारख्या कलावंताची साधनाच आवाजाला स्वराचे सामर्थ्य देते म्हणूनच आपण त्यांना स्वर सम्राज्ञी म्हणतो. अश्या या शतकातील सर्वात महान गायिकेचे जन्म स्थान पाहताना माझी अवस्था फार विचित्र झाली होती. त्यांच्या सहवासातील अनेक क्षण, स्टेज शो व अनेक रेकॉर्डींग आठवत होत्या. मनात आठवणीचा कल्लोळ माजला होता. आता त्या आपल्यात नाहीत, या भावनेने डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते.
लता दीदी चा जन्म इंदोर चा आहे हे मला माहीत होते. पण निश्चित ठिकाण माहीत नव्हते. मी नुकताच इंदूर येथे गेलो असताना अनेक लोकांना विचारले पण त्यांना माहित नव्हते. पण मी चिकाटी सोडली नाही. शेवटी मला पत्ता मिळाला.
कोर्टा जवळील एका गल्लीत जुनी इमारत होती. ती पाडून तेथे आता नवीन बिल्डिंग झालीय. त्या जागेत मेहता क्लॉथ स्टोअर झाले आहे. तेथे मी जाऊन साष्टांग दंडवत घातला.
तेथील मॅनेजरला सांगितले की, मी दीदी सोबत अनेक वर्षे काम केले. त्यांना ही खूप आनंद झाला. त्यांनी मला ती जागा दाखवली. त्यांनी तेथे दिदिचा फोटो लावला आहे. तेथे मी अक्षरशः निशब्द झालो.
लता दीदींना विनम्र अभिवादन.

– लेखन : सिनेगायक उदय वाईकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800