Wednesday, September 17, 2025
Homeलेख'चैतन्य' रसाचा प्रवाहो…

‘चैतन्य’ रसाचा प्रवाहो…

प्रत्येक समाजाला त्याचं स्वतःचं म्हणून आभाळ असतं. ते समृद्ध करण्याचं काम त्या समाजातील विविध क्षेत्रांत समर्पणाच्या भावनेतून काम करणार्या व्यक्ती करीत असतात. अशा व्यक्ती समाजाला दिशाही देत असतात. प्रबोधनही करीत असतात. समाजाला आत्मग्लानी आलेली नसेल, नि पुरेसं आत्मभान जागं झालेलं असेल, तर अशा आभाळाएवढ्या माणसांना समाज मस्तकी धारण करतो.

या शृंखलेत संतपदाला पोहोचलेले कासार समाजातील श्री संत प.पू. आडकोजी महाराज असतील, प.पू.संत महादेवबाबा कासार असतील, कलेच्या क्षेत्रात साता समुद्रांपलिकडं स्वतःची नाममुद्रा उमटवून आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केलेले चित्रपती डाॅ. व्ही. शांताराम असतील, वा त्यांचे चिरंजीव आणि मुंबईचे माजी शेरीफ- चित्रपटक्षेत्रात स्वकर्तृत्वाने आगेकूच करणारे किरण शांताराम असतील, किंवा कासार समाजाच्या इतिहासात अगदी प्रथमच शासनाची लाल दिव्याची गाडी मिरविण्याचे भाग्य ज्यांना लाभले, ते राज्यमंत्री दर्जा प्राप्त केलेले स्व. ॲड. राजाभाऊ झरकर असतील. आणखीही काही महनीय नावे असू शकतात.

माणसं एखाद्या समाजात जन्म घेतात. कुठंतरी दूरस्थ राहून स्वतःच्या कर्तृत्वाची ध्वजा आकाशात अशा उंचीवर नेतात, की तिथवर नजर लावताना इतरेजनांचीही मान अभिमानानं ताठ व्हावी. पण आत्मभान विसरलेल्यांना मात्र त्यांची उंची, त्यांची झेप, विशिष्ट क्षेत्रात त्यांनी सिद्ध केलेला अधिकार ह्याविषयी अनभिज्ञता असते.
अल्पसंख्याकांहूनही अल्पसंख्याक – अगदी मायक्रो मायनाॅरिटी – असलेल्या कासार समाजालाही, या समाजात जन्म घेतलेल्या आणि आता समस्त मानव जातीच्या कल्याणाकरिता देशभ्रमण करणार्या ‘महामंडलेश्वर श्री श्री 1008 प. पू. स्वामी विष्णुचैतन्यतीर्थजी महास्वामीजींची फारशी माहिती नाही.

कासार समाजाने ज्यांच्या चरणांवरची धूळ मस्तकी धारण करुन ‘अवघा कल्लोळ करावा’ अशा ह्या महान संतमहात्म्याचं जन्मगाव आहे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेले ‘मिरजगाव’ हे छोटेखानी गाव. या गावाचीही मोठी कमालच आहे. या गावात कासार समाजाची उणीपुरी दहा-बारा घरंच. पण गावातील हिंमतबाज कासार बांधवांनी अनंत अडचणींचे डोंगर पार करीत आणि बाहेरगावच्या समाजबांधवांकडे एका पैशाचाही निधी न मागता चक्क गावाच्या ‘हार्ट ऑफ दि व्हिलेज’ म्हणता येईल अशा मध्यवस्तीत आपल्या कुलदेवतेच्या – श्री कालिकामातेच्या – मूर्तीची पुनःप्राणप्रतिष्ठा तेरा- चौदा वर्षांपूर्वी केली. हा महोत्सव कासार समाजाने तीन दिवस भक्तिभावाने साजरा केला होता. या सोहळ्याला स्वामीजींनी हजारो कि.मी. वरुन विमानाने येऊन उपस्थिती तर दर्शविलीच, वर पुन्हा समाजाला भरभरुन आशिर्वादही दिले.

कोण आहेत हे महास्वामीजी ? त्यांचा आध्यात्मिक अधिकार किती उंचीचा ? असल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यापूर्वी ‘जाति न पूछिये साधूकी, पूछ लीजिये ग्यान’ या संतोक्तीचं भान ठेवायला हवं. महास्वामीजींच्या भोवती एकेकाळी असलेल्या समाजाच्या भिंती त्यांनी केव्हाच ओलांडल्या आहेत. आता अखिल मानवजातीच्या कल्याणाचा वसा घेऊन ते देशभर हिंदुधर्माचा, अध्यामाचा, वेद- वेदांगांचा प्रचार नि प्रसार करण्याचं सूर्यकाम करीत आहेत. आध्यात्मिक साधनेबरोबरच संस्कृत भाषेचा प्रचारही ते करतात. वेद, पुराणे, रामायण, महाभारत, शास्त्रे, संतवाणी, योगसाधना, कुंडलिनी जागृती आदींचा त्यांचा अभ्यास दांडगा नि प्रचंड आहे. संत कबीर, मीराबाई, सूरदास, ज्ञानेश्वर माऊली, गुरु नानक यांची संतवाणी त्यांना मुखोद्गत आहे. आपल्या अभ्यासातून जणू त्यांनी आजच्या भोगवादी युगाला आव्हान दिले आहे. वेदांतशास्त्रातील आध्यात्मिक अंतर्लक्षणे, अंतर्यात्रेतील गहन रहस्ये ते लीलया मांडतात. ब्रम्हानुभूतीतील परमानंद त्यांना सहजच खुणावतो. अध्यात्म विश्वातील अत्यंत महत्वाच्या विषयांवरील त्यांचे विचार परखड, स्पष्ट आणि मूलगामी आहेत.

कासार समाजात जन्म घेतलेले महामंडलेश्वर श्री श्री 1008 प.पू. स्वामी विष्णुचैतन्यतीर्थजी महास्वामीजी हे नवी दिल्ली येथील हिंदूधर्मपीठाचे अध्यक्ष आहेत. तथापि, पीठाच्या नावाचे वादंग नको व निष्कारण अशांती नको म्हणून हिंदू धर्मपीठाचे नामकरण अलिकडेच ‘महायोग साधना मंडल’ असे करण्यात आले आहे. या मंडलाच्या शाखा महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब राज्यांतही आहेत. महास्वामीजी विमानानेच अध्यात्माच्या प्रसारार्थ देशभर भ्रमंती करीत असतात. श्रीक्षेत्र ॠषिकेश येथे त्यांचे प्रधान कार्यालय आहे.

महास्वामीजींचे मूळ गाव नगर जिल्ह्यातील मिरजगाव. तेथील ह.भ.प. विनायकबुवा आष्टेकर (विनायकराव दगडोबा आष्टेकर) यांचे ते थोरले चिरंजीव. मातोश्रींचे नाव लीलाबाई. मातोश्री लीलाबाईंचे माहेर शिरुर कासारच्या गाडेकरांचे. महास्वामीजींनी 49 वर्षांपूर्वी 1974 साली मिरजगाव सोडले. नंतरच्या काळातही त्यांचे गावी येणे-जाणे होते. कालौघात तेही सुटले. 1974 च्या आधी काही काळ ते नगरला कासार मध्यवर्ती मंडळाचे माजी अध्यक्ष स्व. ॲड. राजाभाऊ झरकर यांच्याकडे शिकायलाही होते. तथापि, बालपणापासून अध्यात्माकडे, धार्मिकतेकडे कल असल्याने नगरला शिकायला असतानाच ते कोणालाही न सांगता पंढरपूरला पांडुरंगाच्या दरबारात दर्शनाला गेले. तेथे चंद्रभागेत स्नान करताना त्यांना अचानक एक साधुपुरुष घाटाच्या पायरीवरुन पाय घसरुन चंद्रभागेत गटांगळ्या खाताना दिसला. लहानग्या विष्णूने (महास्वामीजी) मागचा पुढचा कसलाही विचार न करता चंद्रभागेत सूर मारला. त्या साधुपुरुषाला त्यांनी पाण्यातून सुखरुप बाहेर काढून काठावर आणले. साधूने नाव-गाव विचारले. ‘मेरे साथ चलोगे ?’ अशीही पृच्छा केली. संतांच्या खूणगाठी संतांनाच उमजतात. जिवा शिवाची गाठ पडली. छोटा विष्णू कोणाला न सांगता सवरता तडक त्या साधू बरोबर निघाला. त्यावेळी विष्णूचे वय असेल उणेपुरे नऊ-दहा वर्षांचे. पंढरपूर, आळंदी, पैठण, जांब, नाशिक, गाणगापूर अशी भ्रमंती सुरु झाली…आणि सुरु झाला आत्मज्ञानाचा शोधही !

वयाच्या दहाव्या वर्षीच महास्वामीजींनी ब्रम्हगिरीची परिक्रमा पूर्ण केली. अंजनी पर्वतावर आणखी एका महात्म्याची भेट झाली. त्यांच्या विचारांतून महास्वामींना ऊर्जा मिळाली. त्या महात्म्याने छोट्या विष्णूतील सुप्त शक्ती ताडली आणि आदेशच दिला… ‘आध्यात्मिक क्षेत्रात जा’… तेथून महास्वामीजी थेट ॠषिकेशला गेले. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. वेद, वेदान्तशास्त्राचा अभ्यास सुरु झाला. दरम्यानच्या काळात त्यांनी देववाणी संस्कृत भाषेवरही असामान्य प्रभुत्व संपादन केले.

आदि शंकराचार्यांच्या संकल्पनेतील साधूंच्या अत्यंत महत्वाच्या आणि धर्माची मान्यता असलेल्या सात आखाड्यांपैकी
‘निरंजनी आखाड्या’ चे ते आज प्रमुख आहेत ! कासार समाजाचे किती मोठे भूषण आहे हे !! महानिर्वाणी, निरंजनी, जुना आखाडा, अटल वगैरे शैवांच्या आखाड्यांची नुसती नावेच आपण ऐकून असतो. पण त्यापैकी एका आखाड्याचे प्रमुखपद एखाद्या कासार व्यक्तीकडे असावे, ही समाजाला ललामभूत अशीच घटना नव्हे काय ?

‘देशभर कुंभमेळ्यांचे आयोजन आम्ही करतो…’ असंही महास्वामीजींनी मिरजगाव येथे तेथील डाॅ.रमेशचंद्र झरकर, डाॅ. नितीन झरकर, सुरेश झरकर, सचिन गाडेकर प्रभृतींनी आयोजिलेल्या उपरोल्लेखित सोहळ्याप्रसंगी मला खास मुलाखत देताना सांगितलं. कासार मध्यवर्ती मंडळाचे माजी अध्यक्ष श्रीकांतनाना ईटकर, कासार समाजाचे अध्वर्यु नेते व कासार विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष (स्व.) प्रभाकरराव मांगुळकर, माजलगावे (स्व.) प्रभाकरराव डोळ सर हेही या अलौकिक क्षणांचे साक्षीदार होते.

सूर्य, चंद्र आणि बृहस्पती असा एकत्रित योग आल्यानंतर भारतात जेथे कुंभमेळ्यांचं आयोजन होतं, त्या क्षेत्री ‘शाही स्नान’ करण्याचा मानही महामंडलेश्वर श्री श्री 1008 प.पू. स्वामी विष्णुचैतन्यतीर्थजी महास्वामींना आहे, हे आणखी विशेष ! बारा वर्षांतून एकदा देशात हा कुंभमेळा होतो. हरिद्वार, इलाहाबाद, नाशिक, उज्जैनचे कुंभमेळे महास्वामींजींनी आपल्या विद्वत्तापूर्ण अभ्यासाने व अमोघ वाणीने गाजविले आहेत. त्यांची व्याख्याने ऐकण्यासाठी भारताबरोबरच नेपाळ, ब्रम्हदेश, श्रीलंका इ. देशांतूनही साधक येत असतात. 1991 मध्ये अयोध्येत उमा भारती यांच्या समवेत महास्वामीजींनी कारसेवाही केली होती. राजमाता विजयाराजे सिंदीया, डाॅ. धरमसिंह, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, एच्. के. एल्. भगत, स्वामी चिन्मयानंद, उमा भारती, साक्षी महाराज आदी अनेक दिग्गजांचे महास्वामीजींच्या आश्रमात येणे- जाणे होते व आहे !

राजकारणात योग्य व्यक्तींनी भाग घेतला पाहिजे. फारसे कळत नसलेले लोकही या क्षेत्रात मोक्याची पदे बळकावून बसले आहेत, हे महास्वामीजींचे परखड मत आहे. 1988 मध्ये त्यांनी नवी दिल्लीत विशाल हिंदू धर्म संमेलनही आयोजिले होते. काश्मीरच्या महाराजांनी त्या संमेलनाचे उद्घाटन केले होते. दिल्ली, अहमदाबादमध्ये तर स्वामीजींची प्रवचने होतातच, पण आता बंगळुरु, चेन्नई, केरळ मध्येही दौरे करुन महास्वामीजींनी दक्षिण दिग्विजयास प्रारंभ केला आहे. पश्चिम बंगालात कोलकाता येथेही मध्यंतरी त्यांची प्रवचने गाजली होती.

कासार समाजासारख्या संख्येने अगदी मूठभर असलेल्या समाजात एका खेड्यात जन्मलेल्या श्री श्री 1008 प.पू. स्वामी विष्णुचैतन्यतीर्थ महास्वामीजींनी जवळपास अनेक राज्यांत आपली स्पष्ट पदचिन्हे उमटविली आहेत. 2001 साली त्यांना इलाहाबादमध्ये श्री श्री 1008 महामंडलेश्वर पदवीने गौरविण्यात आले. त्यामुळे त्यांना कुंभमेळ्याच्या प्रसंगी ‘शाही स्नान’ करण्याचा आणि छत्र चामरे मिरविण्याचा मान मिळाला. धर्मप्रचाराचा विशेषाधिकारही प्राप्त झाला. मूर्धा अभिषिक्त संतांनाच छत्र चामरे वापरण्याचा अधिकार मिळत असतो.

महास्वामीजी मिरजगावी येताना दिल्लीहून विमानाने पुण्याला उतरले. तेथून चार-पाच वाहनांनी शिष्यांसह त्यांचे मिरजगाव येथे आगमन झाले होते. तेथे कुलस्वामिनी श्री कालिका मातेच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना त्यांच्या शुभहस्ते झाली. पूजा, अभिषेक आदी विधीनंतर 71 ब्रम्हवृंदांना प्रासादिक भोजन, अगदी चौरंगांवर ताटे मांडून व रांगोळी सजवून, सन्मानपूर्वक देण्यात आले. महास्वामीजींच्या ॠषिकेश येथील मुख्य आश्रमाच्या वतीने सर्व ब्रम्हवृंदांच्या ताटाखाली प्रत्येकी 500 रु.च्या नोटा ठेवून भक्तिभावाने दक्षिणा देण्यात आली होती. आज देशात महास्वामीजींचे महानगरांमध्ये मोठमोठे भव्य आश्रम आणि हजारो अनुयायी आहेत.

श्री श्री 1008 प.पू. स्वामी विष्णुचैतन्यतीर्थजी महास्वामी यांना कासार समाजातील ‘चैतन्य रसाचा प्रवाहो’ असेच म्हटले पाहिजे !!

जयप्रकाश दगडे.

— लेखन : जयप्रकाश दगडे. ज्येष्ठ पत्रकार, लातूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं