जलदानाचे पुण्य करावे
मुखी शब्दांना हवी गोडी ।
कुटुंबासाठी झटणारा जो
ओढ त्याच्या येण्याला जोडी ।।१।।
स्वार्थ परमार्थ दोन बाजू
स्वार्थाला जरा दूर करावे ।
स्नेहबंधनाच्या नात्यामध्ये
द्वेषभावनेला स्थान नसावे ।।२।।
घर असावे सदा भरलेले
वय झालेले पान ही असावे ।
मान त्यांना त्यांचा देऊनी
दुराव्याला स्थान नसावे ।।३।।
अर्थ असावा मर्यादेतला
हाव त्याची कधी नसावी ।
माणूस म्हणून जगताना
माणुसकीची साथ जपावी ।।४।।
मतभेद असले जरी कितीही
परस्परांना समजून घ्यावे ।
मनभेद टाळून कधी कधी
आनंदी क्षण जगून रहावे ।।५।।
आयुष्य भरपूर असावे
हसण्यात आनंद शोधावा ।
चेहरा मुखवट्याचा असताना
वेदनेला कधी थारा नसावा ।।६।।

– रचना : अरुण पुराणिक. पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800