“आमच्या वेळेस नव्हते हा असे काही”, प्रत्येक पिढीचा हा आवडता डायलॉग.
पिढीगणिक एकूण एक गोष्ट बदलत जाते, नव्याचे सर्व जुने होऊन जाते, पण हा डायलॉग मात्र कधीही न बदलणारा आहे.
प्रत्येक पिढी स्वतःला मधली पिढी समजत असते, जी नवीन आणि जुन्या पिढीमध्ये भरडली जात असते आणि सर्वात जास्त सहनशीलता याच पिढीकडे असते असे मानणारी असते. काळानुरूप नेहमीच नंबर बदलत असतो आणि निसर्गाचे चक्र मात्र अव्याहतपणे चालूच असते नव्याकडून जून्याकडे वाटचाल करण्याचे.
आजच्या या आधुनिक जगात आपल्याला सर्वत्र आधुनिकतेचे वारे अगदी वेगाने वाहताना पाहायला मिळतात. आजची युवा पिढी ही अगदी सक्षमपणे वाटचाल करताना दिसत आहे. शिक्षणाने परिपूर्ण होत असणाऱ्या या पिढीला नवनवीन क्षेत्राची दारे खुली होऊन त्यांचे अनुभव विश्व अगदी समृद्ध होताना पाहायला मिळत आहे आणि मिळेल त्या संधीचा योग्य उपयोग करून घेऊन किंबहुना त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारीही या वर्गात पाहायला मिळत आहे.
फक्त आपलाच देश नव्हे तर परदेशात जाऊनही ही पिढी चमकदारपणे कामगिरी करताना जगाच्या इतिहासात नोंद होत आहे.
पालकांना देखील आपल्या मुलांचे यश, कौतुक पाहून त्यांच्या मानाही अभिमानाने उंचावत आहेत. त्यांच्याबद्दलचे प्रेम हृदयात मावेनासे होत आहे, समाजात मिळणारा मान सन्मान, आणि कौतुकाच्या नजरांनी त्यांची मने भरून येत आहे, पण त्याचबरोबर आपण इतके भावनाप्रधान होत असताना आजची पिढी एवढी भावनाशून्य का होत आहे? याचे कोडे मात्र उलगडेनासे होत आहे.
हल्लीची मुले इतकी निर्विकारपणे एखाद्या गोष्टीकडे कशी काय पाहू शकतात? हेच त्यांना कळेनासे होत आहे. कधीकधी आपणच चूक वागतोय की बरोबरच या गोष्टीनेच ती साशंक होत आहेत.
पालकांना जिकडे गोतावळा प्रिय, तिथे आजचा युवावर्ग अगदी अलिप्तपणे राहायला शिकतोय. उगाचच कोणत्याही गोष्टींत लुडबुड करण्याची सवय, किंबहुना विचारल्याशिवाय आपली मते प्रकट करणे, कोणालाही अनाहुत सल्ला देणे, या गोष्टींपासून कटाक्षाने स्वतःला दूर ठेवतोय, आणि नेमका याच स्वभावाचा फरक दोन पिढीमध्ये ठळकपणे जाणवताना दिसतोय.
ज्येष्ठ पिढी अनुभवाच्या आधारावर स्वतःला श्रेष्ठ ठरवू पाहत आहे तर युवा पिढी शिक्षणाच्या, आधुनिकतेच्या जोरावर कुठेही स्वतःला कमी लेखत नाही, किंबहुना युग परिवर्तनाचा संदेश देतानाच दिसत आहे. जो तो आपापल्या जागी योग्य आहे आणि पिढ्यानपिढ्या हे असेच चालत राहणार आहे. अनुभव आणि कर्तृत्व यांची लढत अशीच जुंपत राहणार आहे आणि प्रत्येक पिढी “आमच्या वेळेला नव्हते हा असे काही” असेच पुढच्या पिढीला सांगत राहणार आहे.

-लेखन : मानसी लाड.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.