बेरटॉल्ट ब्रेष्ट
आपल्या सर्वांच्या आवडीचे आणि मराठी रंगभूमीवर गाजलेले “तीन पैशाचा तमाशा” हे नाटक पु. ल. देशपांडे यांनी ज्या जर्मन नाटकावरून घेतले, त्या नाटकाचे लेखक म्हणजे बेरटॉल्ट ब्रेष्ट.
खरं म्हणजे जॉन गे ह्यांनी इंग्रजीतून लिहीलेल्या १८ व्या शतकातल्या ‘द बेगर्स ऑपेरा’चं त्यांनी १९२८ मध्ये जर्मन भाषेत केलेल्या ‘Die Dreigroschenoper’ म्हणजेच ‘द थ्री पेनी ऑपेरा’ या नाटकाचे पु. ल. देशपांडे यांनी “तीन पैशाचा तमाशा” असे नाव देऊन मराठीत स्वैर रूपांतर केले.
जर्मनीतील आउग्सबर्ग नावाच्या गावात १० फेब्रुवारी १८९८ रोजी बेरटॉल्ट यांचा जन्म झाला. ह्यांचे खरे नाव युजेन किंवा ऑयजेन बेरटॉल्ट फ्रीडरिक ब्रेष्ट. विसाव्या शतकातील हे एक महत्त्वपूर्ण लेखक, प्रभावशाली नाटककार, सृजनशील नाट्यदिग्दर्शक तसेच उत्तम कवी होते. त्यांचे वडील बेर्टोल्ड फ्रीडरिक ब्रेष्ट हे प्रोटेसटेन्ट तर आई सोफी रोमन कॅथलिक होती. शेजारीच राहत असल्याने त्या दोघांनी प्रेमविवाह केला.
मध्यमवर्गीय कुटुंबात वाढत असताना व बाजूलाच आजोळ असल्याने बेरटॉल्ट ब्रेष्टवर आई व आजी (आईची आई) ह्यांचा मोठा प्रभाव होता. त्या दोघींमुळेच त्यांचा बायबल ह्या ख्रिश्चन धार्मिक ग्रंथाचा बालपणीच व्यवस्थित अभ्यास झाला.
बेरटॉल्ट ब्रेष्ट १९२४ पर्यंत जर्मनीमधील बवेरीया नावाच्या प्रदेशात राहिले. म्युनिक मध्ये राहून त्यांनी वैद्यकशास्त्रात पदवी मिळवली. नंतर एक वर्ष त्यांनी सैनिकी इस्पितळात सेवा दिली. म्युनिक मध्ये शिकत असतानाच त्यांना नाट्य क्षेत्राबद्दल रुची निर्माण झाली व त्यात कार्य सुरू झाले.१९२२ मध्ये पहिले “बाल” तर १९२६ मध्ये “ए मॅन इस ए मॅन” हे दुसरे नाटक प्रकाशित झाले. परंतु १९२८ मध्ये आलेले “दि द्राय ग्रोशेनओपर” म्हणजेच आपल्या भाषेत तीन पैशाचा तमाशा आणि १९३० मध्ये “द राईझ ऍन्ड फॉल ऑफ द सिटी ऑफ महागोंनी” ह्या नाटकांमुळे त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली. ही दोन्ही सांगीतिक नाटके त्यांनी कुर्ट वाईल नावाच्या संगीतकाराबरोबर एकत्रितपणे लिहिली आहेत. या दोघांनी एकत्रितपणे अनेक वर्ष काम केले.
ह्याच काळात बेरटॉल्ट ब्रेष्ट यांनी एपिक थिएटर अर्थात महाकाव्य रंगमंच असा सिद्धांत विकसित केला, ज्याचा उल्लेख अजूनही नाट्य क्षेत्रात केला जातो. नाटकीय रंगमंच आणि महाकाव्य रंगमंच या मधील साधारण फरक असा की नाटकीय रंगमंच या प्रकारामध्ये प्रेक्षकांना जे समोर दाखवले जात आहे ते माझेही आहे असे वाटते, पात्रांच्या भावभावना माझ्याच आहेत असा भास होतो. प्रेक्षक पात्राबरोबर इतका समरस होतो की रंगमंचावरील पात्र जर रडले तर प्रेक्षकाच्या डोळ्यात देखील अश्रू येतात. रंगमंचावरील पात्र जर आनंदित झाले तर प्रेक्षक देखील आनंदीत होतात.
याउलट महाकाव्य रंगमंच या प्रकारात रंगमंचावरील पात्रांचा अभिनय पाहून प्रेक्षकाला असे वाटते की मी असे कधीच केले नसते, मी असा कधीच वागलो नसतो, हे अनाकलनीय आहे, हे थांबवा इत्यादी. येथे जर ते पात्र दुःखी असेल तर प्रेक्षकाला आनंद होतो. जर ते पात्र आनंदीत झाले असेल तर प्रेक्षकाला वाईट वाटते.
बेरटॉल्ट ब्रेष्ट यांना नाट्यक्षेत्रातील अजून एका अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेचे श्रेय दिले जाते, “द डिस्टन्सिंग इफेक्ट” ज्याला परकेपणा प्रभाव असे देखील म्हटले जाते. यामध्ये लेखक किंवा दिग्दर्शक वाचकांना किंवा प्रेक्षकांना रंगमंचावर जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवण्यापासून किंवा गृहीत धरण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला जातो. पात्रांमध्ये प्रेक्षकांची भावनिक गुंतवणूक होणार नाही असा येथे प्रयत्न केला जातो. तीन पैशाचा तमाशा हे नाटक ह्या विशिष्ट प्रकारात मोडते. ह्या नाटकाचे कथानक थोडक्यात खालील व्हिडिओ मध्ये पाहू शकता.
त्या नाटकाच्या रंगमंचावरील सादरीकरणातील काही भाग येथे पाहू शकता.
अशा वेगळ्या धाटणीची नाटके बेरटॉल्ट ब्रेष्ट यांनी रंगमंचावर आणली. तोपर्यंत साहित्यक्षेत्रात असे कधीच घडले नव्हते. त्यामुळे यांनी नाट्य या साहित्य प्रकाराला एक प्रकारे कलाटणीच दिली.
त्यांचे विचार मार्क्स वादी असल्याने त्यांच्या नाटकांवर तसाच प्रभाव दिसतो. त्यांनी नाटकात वापरलेल्या प्रभावी तंत्रांबद्दल आणि केलेल्या प्रयोगांबद्दल खालील व्हिडिओ मध्ये अधिक माहिती मिळू शकेल.
१९३० मध्ये त्यांनी अभिनेत्री हेलेन वायगेलशी दुसरा विवाह केला आणि त्यांनी एकत्र बरेच काम केले. १९३३ मध्ये जर्मनीत जेव्हा नाझी पक्षाचे वर्चस्व आले तेव्हा मात्र हे देश सोडून जर्मनी बाहेर गेले. पहिल्यांदा स्कॅनडिनेव्हिया आणि नंतर दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर ते दक्षिण कॅलिफोर्नियात वास्तव्याला होते.

बेरटॉल्ट ब्रेष्ट ह्यांच्या इतर प्रसिद्ध कलाकृती म्हणजे, द मदर करेज अँड हर चिल्ड्रन (१९३९), द लाइफ ऑफ गॅलिलिओ (१९४०), द रेसिस्टीबल राइज ऑफ आर्तुरो युइ (१९४१), द गुड पर्सन ऑफ शेजवान (१९४३), द कुकेशियन चॉक सर्कल (१९४४), मी. पुन्तील अँड हिज मॅन मॅटी (१९४८) इत्यादी.
१९४७ मध्ये ते पुन्हा जर्मनीत पूर्व बर्लिन येथे आले आणि तेव्हाच त्यांनी दोघांनी बर्लिनर एन्साम्बले (Berliner Ensemble) नावाने एक नाटक कंपनी स्थापली. त्याच नावाने बर्लिन मध्ये एक नाट्यगृह देखील आहे.

१४ ऑगस्ट १९५६ ला त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तेव्हा ते ५८ वर्षांचे होते. स्टेफन पार्कर ज्यांनी बेरटॉल्ट ब्रेष्ट ह्यांच्या लेखांचे परीक्षण केले त्यांच्या कथनानुसार आणि काही वैद्यकीय कागद पत्रांवरून असे लक्षात आले आहे की त्यांना लहानपणापासूनच एका विशिष्ट तापामुळे हृदयविकाराचा त्रास होता. ज्यामुळे त्याचं हृदय आकाराने मोठं होतं आणि ठोके जास्त वेगाने व्हायचे. त्यांचा स्वभाव देखील चिडका, त्रागा करून घेणारा आणि अस्वस्थ असा होता. त्यांची व त्यांच्या पत्नीची कबर बर्लिन येथे आहे.

विसाव्या शतकातील साहित्यात त्यांच्या लेखनाने मोठी भर पडली आहे आणि विशेषतः नाट्य क्षेत्रात बदल घडवून आणण्यात तसेच काही नवीन तंत्रांचा पायंडा पाडण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. नाट्य, अभिनय, लेखन, कला, दिग्दर्शन अशा अनेक क्षेत्रांमध्ये रुची असणाऱ्या सर्वांना बेरटॉल्ट ब्रेष्ट यांचा आणि यांच्या कलाकृतींचा अभ्यास करणे महत्त्वाचे आणि उपयोगी ठरणारे आहे.
क्रमशः

— लेखन : प्रा आशी नाईक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800