Friday, March 6, 2026
Homeयशकथाजिचं तिचं आकाश : 21

जिचं तिचं आकाश : 21

“श्वेता बापट”

आपल्या समाजात काही जणी खूप चाकोरीबध्द जीवन जगत असतात. नोकरी, घर, नातेवाईक, थोडी मित्र मंडळी.. तर काही जणी,सतत आव्हानं स्वीकारत असतात, नवनवीन क्षेत्रात संधी मिळत असेल, तर ती घेत असतात. एकेक अनुभव, नवीन शिक्षण घेऊन त्या पुढे पुढे जात असतातं. शिक्षण आणि अनुभव कधीच फुकट जात नाही. श्वेता बापटला अशा सर्व अनुभवाचा निश्चितच फायदा झाला आहे.

श्वेता मूळची जोशी, आईवडील गिरगांवकर ! १९७८ साली तिच्या जन्मानंतर ते कायमस्वरूपी पार्लेकर झाले. घरात मराठमोळं वातावरण आणि आजोळ गुजराती असल्याने दोन्ही संस्कृतीत जडण घडण झाली. आई लग्न होऊन आली तेव्हा तिला मराठीचा एकही शब्द येत नव्हता. पण आपल्या मुलांवर मराठी भाषा व संस्कृतीचे उत्तम संस्कार झालेच पाहिजेत, हे तिने ठरवलं होतं. श्वेता एकत्र कुटुंबात वाढली, त्यामुळे आजी, आजोबा, आत्या, काका, भावंडं अशा सर्वांनीच त्यांची ही इच्छा पूर्ण केली.
आजोळी, बा (आजी), दादाजी (आजोबा), मावशी मामा आणि सर्वात महत्वाची पणजी (आईची आजी) तिला लाभली आणि आपोआपच तिला मराठी, गुजराती ह्या दोन्ही भाषा उत्तम अवगत झाल्या. शाळेमुळे इंग्रजी आणि हिंदीवरही उत्तम प्रभुत्व आले. जीवनात प्रत्येक ठिकाणी ह्या भाषा संपन्नतेचा तिला खूप लाभ झाला.अशा मोठ्या कुटुंबात राहिल्याने, अनेक माणसांचं लाभलेलं प्रेम, तिला व्यवस्थापनात प्रवासात पदोपदी साथ देतं.

श्वेताला घरात शिकवलेली काही सर्वात महत्वाची सूत्र म्हणजे – माणसं आणि वेळ जपा, शिकणं कधीही थांबवू नका, कुठच्याही कामाला कमी लेखू नका आणि कुठच्याही परिस्थितीला न घाबरता धिटाईने सामोरे जा. ही सूत्रे श्वेताच्या जीवनाचा आणि कर्तृत्वाचा मूलाधार आहेत.

श्वेता सांगत, “पार्लेकर असल्याने शिक्षण पार्ले टिळक इंग्लिश माध्यम शाळा आणि साठये कॉलेज. मग आहार शास्त्रात पदवी प्राप्त केली. पण पुढचं शिक्षण सुरु करायच्या आत मी सौ.श्वेता श्रीनिकेत बापट झाले आणि लग्न होऊन पार्ल्यातच माझ्या दुसऱ्या घरी आले. पुढे शिकायचं हे ठरलं होतं.”

मग तो प्रवास नवीन नाती आणि घरचं सांभाळून कसा करायचा याचा श्वेताने विचार केला. हे पक्कं होत की फिटनेस अँड वेलनेस ह्या क्षेत्रात काम करायचंय, त्यामुळे त्याला लागणाऱ्या उच्च शिक्षणाची सुरुवात केली. फिटनेस ट्रेनर सर्टिफिकेशन, योग टीचर्स ट्रैनिंग, स्पोर्ट्स सायन्सेस सर्टिफिकेशन, स्पोर्ट्स न्युट्रीशनिस्ट च्या परीक्षा असा प्रवास सुरु झाला. ह्याच बरोबर श्वेता हळूहळू कामही करायला लागली. ज्वेलरी डिझाईनयनिंग, शैक्षणिक पोर्टल्सचे मार्केटिंग, फार्मा इंडस्ट्री मध्ये एक छोटे स्टिंट, वगैरे वगैरे. कुठलेही नवीन काम आणि संधी तिने नाकारली नाही.

श्वेता जसं शिक्षण घेत गेली तसतसं पुढे कामाचं स्वरूप बदलत गेलं. न्युट्रिशनिस्ट, लेक्चरर, ट्रेनर, परीक्षक, कोर्से कोऑर्डिनेटर, योग शिक्षक असे बरेच वेगवेगळे रोल्स तिला मिळत गेले. हे सर्व काम क्रीडा क्षेत्राशी आणि फिटनेस शी निगडीत होते, त्यामुळे वर्ल्ड क्रिकेट अकादमी, क्रिकेट कोचिंग क्लीनिकल्स, तळवलकर्स सारख्या नामांकित फिटनेस अकादमी, एस एन डी टी महाविद्यालय, दादर कॅटरिंग कॉलेज अशा अनेक नामांकित संस्थांशी श्वेता जोडली गेली.

मग २००४ साली अंधेरीला THE CLUB व २०१० साली एशियन हार्ट इन्स्टिटयूट मधे वरीष्ठ उपाध्यक्ष म्हणून तिने कामे सांभाळली. इथून हॉस्पिटॅलिटी अँड वेलनेस चा प्रवास सुरु झाला. माणसांचं आणि अनुभवांचं विश्व अधिकच विस्तारलं. ह्या संस्थांमध्ये कंपनी सेटअप, टीम मैनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट, विविध खेळांच्या राज्यस्तरीय प्रतियोगिता आयोजित करणे, सेलेब्रिटीस व मीडिया इन्टेरॅक्शन, विषयानुसार मासिकांमध्ये शैक्षणिक लेख लिहिणे, ह्या सगळ्या गोष्टींच्या संशोधनासाठी करावा लागणारा प्रवास असा खूप छान आणि भरपूर अनुभव श्वेताने मिळवला.

ह्या सगळ्यात तिला स्पा, सॅलॉन आणि कॅास्मॅटीक सर्जिकल युनिट सेटअप ऑपरेट करायची एक अनोखी संधी मिळाली. येथे श्वेताने मेडिकल विश्वात प्रवेश केला. ह्यासाठी लागणारं प्रशिक्षण अतिशय प्रतिष्ठित डॉक्टर्सकडून मिळालं आणि परदेशात जाऊन तिने स्पा मॅनेजमेंट सर्टिफिकेशन केलं. नशिबाने ज्या क्षेत्रात संधी मिळत होती असे व्यवसाय त्याच काळात आपल्या देशात उदयास येत होते, त्यामुळे खूप तिला काही शिकता आलं आणि उत्तम काम करून पुढे फॉऊंडिंग मेंबर्स म्हणून मार्गदर्शन करता आलं. ह्याचं उदाहरण म्हणजे भारत सरकारने स्पा थेरपीस्ट्सना, इतर देशांप्रमाणे, ऑर्गनाईस्ड शिक्षण मिळावे म्हणून, भारतातल्या ४ स्पा एक्सपर्टस ची निवड करून त्यांना कोर्स डेव्हलोपमेंट आणि सिलॅबस डिझाईनची जबाबदारी श्वेतावर सोपवली. “माझं भाग्य थोर, की त्या ४ एक्सपर्ट्समध्ये माझी निवड झाली.” असंच ती म्हणते.ह्या कालावधीत तिने स्वतःची वेलनेस मॅनॅजमेन्ट कंपनी थाटली. रिलायन्स साठी जामनगर ला स्पा सलोन, देशातल्या अनेक प्रतिष्ठित मान्यवरांसाठी वैयत्तिक स्पा सलोन, कमर्शियल स्पा आणि सर्जिकल कॅास्मॅटीक क्लिनिक्स सेटअप, त्याला लागणारी रिकरुटमेंट्स, साधनं आणि प्रॉडक्ट्सच काम, ह्या सर्व प्रकारच्या सेटअप्सच ॲाडिटींगचं, ब्रॅण्ड्स चं मार्केटिंग असं चौफेर काम यशस्वी रित्या केलं. ह्याच बरोबर FICCI सारख्या संस्थेच्या कॉन्फेरंसमधे सब्जेक्ट मॅटर एक्स्पर्ट व पॅनलिस्ट, वूमन’स ग्रुप्स साठी मोटिवेशनल स्पीकर, स्मॉल स्केल इंडट्रीस साठी सेटअप गाईड, ग्रूमिंग एक्स्पर्ट असेही रोल्स केले .

कालांतराने घरातील जबाबदारी वाढली. अजूनही घरात दोनतीन पिढ्यांच्या गोतावळ्यात श्वेता व्यस्त होती. त्यामुळे हे दिसत होतं की, आता कामाचं स्वरूप बदलावं लागणार आहे. कुटुंबाला जास्त वेळ देण्याची गरज आहे. अशा वेळी देवच जणू तिच्या पाठीशी उभा राहिला. Celebrity talent and business management.. हे काम समोर आलं आणि ती मॅन मॅनेजमेंटच्या होमपिच वर परत आले. प्रिया बापट, उमेश कामत, सुप्रिया पिळगावकर, श्रिया पिळगावकर, सिद्धार्थ मेनन, तन्वी आझमी, सचिन कुंडलकर अशा अनेक कलाकारांसोबत आजही ही घोडदौड सुरु आहे.

गुलाबजाम ह्या मराठी फिल्म साठी फूड डिझायनर म्हणून तिने काम केलं. हा एक वेगळाच अनुभव होता, ज्याने तिला फिल्ममेकिंगचे कंगोरे शिकवले. त्यातूनच पुढे फिल्म अँड कन्टेन्ट क्रिएशनच्या निर्मितीसाठी, आपल्या बालमित्रा सोबत “थर्ड एस एंटरटेनमेंट” ह्या नावाने प्रॉडक्शन कंपनी सुरु केली. २०२३ साली आलेला मराठी चित्रपट “फुलराणी” हा त्यांचा पहिला चित्रपट.

श्वेता हे काम करायला लागली तेव्हा सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया मिळाल्या. फुलराणी थिएटर्स मध्ये प्रक्षेपित झाला तेव्हाचा एक किस्सा ती सांगते, “आमच्या एका खूप वयस्कर काकांनी मला फोन केला. माझी अपेक्षा होती कि ते म्हणतील, “कुठे ह्या सिनेमाच्या क्षेत्रात पडलीस”. पण घडलं वेगळंच. ते म्हणाले “तुझ कौतुक आहे की, एक अनोखं क्षेत्र निवडलंस, आणि तेही एक उद्योजिका म्हणून. ते म्हणाले सर्व क्षेत्रांप्रमाणे ह्या कामातही अनेक प्रकारची माणसं भेटतील. कोणी तुझ्याशी वाईट वागलं, तर त्याला शत्रू मानू नकोस आणि दूर लोटू नकोस. कारण व्यवसायात कधीकधी हीच लोकं तुझ काम करून जातील. सगळ्यांशी ओळखून आणि मान राखून वाग.” अशी कौतुकाची थाप आणि असा पाठिंबा आजवर मिळत गेला म्हणूनच श्वेताला विविध क्षेत्रात ठामपणे कारकीर्द करता आली.

श्वेताला २०२३ साली लोकमान्य सेवासंघ तर्फे, फुलराणी चित्रपटाची सह निर्माती म्हणून “पार्लेकरांचा अभिमान” असा सन्मान माननीय देवेंद्रजी फडणवीस ह्यांच्या हस्ते, आमदार पराग अळवणी आणि माजी खासदार पूनम महाजन ह्यांच्या सन्माननीय उपस्थितीत गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर, पार्लेश्वर देवासमोर देण्यात आला. २०२४ साली, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, अर्चना व विनीत गोरे ह्यांनी “कर्तृत्वआभा कौतुक पुरस्कारा” साठी तिची निवड करून सन्मानित केलं.

ह्या सगळ्या प्रवासात तिचा जीवनसाथी श्रीनिकेत, तिचा हात धरून खंबीरपणे उभा आहे. त्याच्या स्वतःच्या प्रिंटिंग व्यवसायात तो अतिशय व्यग्र असतो. आज २७ वर्ष त्याने अतिशय यशस्वीपणे हा व्यवसाय छान फुलवलाय. दोघेही ह्या मताचे आहोत की करू ते लहानस्वरूपी असले तरी चालेल पण ते उत्तम दर्ज्याचेच असलं पाहिजे. श्रीनिकेत जबरदस्त खवैय्या असल्याने, हाच चोखंदळपणा, श्वेताला स्वयंपाकात पण सांभाळावा लागतो. सर्व प्रकारचे पदार्थ, ती घरी बनवते आणि सर्व आप्त जनांना गोळा करून आनंदाने खाऊही घालते. तिची अशी इच्छा असते की तिचे डायनिंग टेबल, कायम वेगवेगळ्या पदार्थांनी, आप्तेष्ट, मित्रपरिवारानी आनंदाने भरलेले असावे. घर सतत हसरे असावे.

श्वेता भरतनाट्यम विशारद आहे. तसेच शास्त्रीय संगीताच्या २ परीक्षा दिल्या आहेत. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय भाषेतला चांगला कन्टेन्ट (फिल्म्स, डॅाक्युमेंटरिज) बघणे, जंगल सफारी करणे, संगीत व नृत्य क्षेत्रात नवीन आविष्कार अनुभवणे असे तिचे अनेक छंद आहेत. घरच्या ज्येष्ठांमुळे जेरीयाट्रिक मॅनेजमेंट ह्या विषयात तिला चांगला अनुभव मिळाला. त्यामुळे अनेक नातेवाईक व मित्र मंडळी ह्या संबंधित मार्गदर्शन घ्यायला, विश्वासाने तिच्याकडे येतात. डॉक्टर्स, हॉस्पिटल्स आदीना सर्व प्रकारच्या मेडिकल इमर्जन्सीसाठी लागेल ती मदत ती मदत करते. पुढे येणाऱ्या संधींसाठी ती नेहमीच तयार आहे. तिला शिक्षण क्षेत्र, सिनियर सिटिझन्स साठी मेडिकल विषय, लहान मुलांसाठी संस्कार वर्ग, ते इव्हेंट मॅनेजमेंट आणि बरच काही करायचं आहे. ”श्वेताच्या एका काकांनी तिला पत्र पाठवलं होतं. त्यातला मजकूर तंतोतंत मला पटतो. त्यांनी लिहीलं आहे..
“तुझ्या मित्र परिवारामध्ये मध्ये २ वर्षे ते ८० + वर्षे हा वयोगट आहे. शास्त्रीय संगीत ते पाश्चात्य रॅप तूं मन लावून बारकाईने ऐकू शकतेस. चांगल्या गोष्टींचं मनापासून भरभरून कौतुक करूं शकतेस. अडचणीच्या अवघड परिस्थितीत आवश्यक ती मदत झपाट्याने करून, श्रेय न घेता पुढे जातेस !
घरातल्या अल्प शिक्षित मदतनीसांना प्रोत्साहन देऊन प्रगती करायला लावतेस. कुणी निंदा, कुणी वंदा, हसऱ्या चेहर्याने मदत करणं, हा माझा धंदा – अशा तत्वावर तुझी जीवन प्रणाली आहे.”
अगदी खरं आहे. श्वेता अशीच वेगवेगळ्या क्षेत्रात भरारी घेत राहो यासाठी तिला खूप शुभेच्छा !

— लेखन : चित्रा मेहेंदळे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Pranita Khandkar on संगती रंग : ४
पुरुदत्त रत्नाकर on संगती रंग : ४
Vedvati Kulkarni on झेप : 14
Swati Naik on अभंग : ओढ
मृदुला राजे on ऋतुराज वसंत