डॅा. विद्या देवधर
आजच्या महिला दिनाचे औचित्य साधून आपण जगात अनेक क्षेत्रात भरारी मारणाऱ्या महिलांची ओळख करून देणारे, “जिचे तिचे आकाश…..” हे सदर आजपासून आपण सुरू करीत आहोत. दर शनिवारी ते प्रसिद्ध होत जाईल. आपल्या
पोर्टल च्या लेखिका चित्रा मेहेंदळे याच हे सदर लिहिणार आहेत. “अमेरिकेतील नवदुर्गा” ही त्यांची गेल्या नवरात्रीतील लेखमाला चांगलीच लोकप्रिय ठरली होती. तशीच ही लेख माला देखील आपल्याला नक्कीच आवडेल, नवी प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास वाटतो.
— संपादक
लहानपणी शाळेत असतांना अनेकांना निबंध लिहायला आवडायचा. वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला आवडायचा. स्काउट मध्ये जायला आवडायचं … पण त्याचे रूपांतर इतक्या मोठ्या प्रमाणात, मोठेपणी झालेले असे मी एकमेव उदाहरण पाहिलं .. ते म्हणजे डॅा. विद्या देवधर ह्या माझ्या मैत्रिणीचे !
खरंतर हे लिहीतांना विद्याचा उल्लेख मी बहुवचनी करायला हवा आहे. पण ती माझी शाळेपासूनची वर्ग मैत्रिण आहे. तिचा हा सर्व प्रवास आम्हा मैत्रिणींचा वेळोवेळी कळत होता. त्यामुळे मी तिचा उल्लेख एकेरी करत आहे.
आई वडिलांची ७/८ पुस्तकं होती, आजी ओव्या, गाणी लिहायची, ८० व्या वर्षी आजीने आत्मचरित्र लिहीले होते.. पण म्हणून विद्याला लिहावेसे वाटले असे नव्हते ! तिचा मूळ पिंडच अभ्यासिकेचा ! १९७६ साली तिने पहिला लेख लिहीला जो लोकप्रभात छापून आला होता .. विषय होता …” स्वामी विवेकानंदांचा स्त्री विषयक दृष्टीकोन ! “तिचे पहिले पुस्तक माननीय अटलबिहारी यांच्या हस्ते प्रकाशित झाले होते व त्याचा विषय होता “स्त्री लिखित कादंबरी प्रेरणा व प्रवृत्ती !”
आईवडिल संशोधक, लेखक, समाजाला वाहून घेतलेले… त्यामुळे समाजाचे ऋण आपल्यावर आहे आणि आपल्यामध्ये जी कला आहे, गुण आहेत त्याचा समाजासाठी उपयोग करून घ्यायचा हे तिच्या मनावर बिंबले होते. म्हणूनच तिने अभ्यास करून, समाजासाठी लिहीण्याचा मार्ग निवडला.
त्यासाठी तिने किती अभ्यास करावा ? अजूनही तिचा अभ्यास चालूच आहे………
डॉक्टर विद्या देवधर … मुळची मुंबईची, पार्ल्याची..आता मुक्काम हैद्राबाद…

तिने एम. ए., एम. फिल., पीएच.डी., केले रा.ब. माढेकर सुवर्णपदक 1988 मध्ये तिला मिळाले. पोस्ट डॉक्टरेट रिसर्च तिने केला. तिला यूजीसी फेलोशिप 2003 ते 8 मध्ये मिळाली. त्यासाठी “कृष्णामृतनट” या हस्तलिखिताचे संपादन केले .२३००० ओव्यांचे हे १७५३ मध्ये लिहीलेले प्रचंड मोठे हस्तलिखित होते. त्यामध्ये कृष्णाच्या लिला, गीता, एकनाथी भागवत आहे. ते हस्तलिखित तिने आधी १०/१२ वह्यांमधे उतरवून घेतले.नंतर त्यातले काव्य, सामाजिक परिस्थिती, भाषा , उर्दू शब्दांचा उपयोग यावर एक एक प्रकरण लिहीले. २०१२ मध्ये तिने आनंदाचे आवारू हा ग्रंथ प्रकाशित केला. श्रीमत भागवत, कथा काव्य आणि तत्वज्ञान ह्या ग्रंथात आहे.
विद्याला लोकसभा फेलोशिप 2016 ते 18 मध्ये मिळाली. त्या काळात ती सतत दोन वर्ष दिल्लीला जात होती. ”कानून निर्माणमें महिलाओंका योगदान” हा ग्रंथ तिने लिहिला. त्या काळात लोकसभेच्या ग्रंथालयात आणि लोकसभेत जाण्याची संधी तिला मिळाली.

तिची स्वतंत्र आठ पुस्तक आहेत. स्त्री साहित्य सामाजिक जाणीव, श्रीमद्भागवत – कथा काव्य आणि तत्त्वज्ञान, श्रीमद्भागवत कथा, दीपस्तंभ लेखसंग्रह, तेज तपस्वीनी हा चित्रपट , निर्मिती कथा, असं अनेक लेखन…..
कानून निर्माण में महिलाओं का योगदान स्वतंत्र ग्रंथ आहे.
फेब्रुवारी २०२५ मध्ये NBT तर्फे कायदे निर्मितीत स्त्रियांचे योगदान प्रसिध्द झाले.
नोव्हेंबर 2024 .एक नवीन शॉर्ट फिल्म तिने केली. संकल्पना, लेखन, निवेदन तिचेच! “नारायणी नमोस्तुते” महिला कोश परिचय त्यात आहे..
अनुवादीत पुस्तक….
1 भारतीयांची विदेशी यात्रा 2 राणीमा गाईदिन्ल्यू
अभ्यासपूर्ण लेख 250 हून अधिक आहेत.
1988 पासून विविध सार्वजनिक क्षेत्रात ती पदाधिकारी म्हणून कार्यरत आहे. मराठी साहित्य परिषद तेलंगण राज्याची ती अध्यक्ष आहे. संवादू द्विमासिकाची ९ वर्ष संस्थापक, संपादक आहे.
पंचधारा- संपादक मंडळ सदस्य 1988 पासून प्रमुख संपादक आहे. २०१६ पासून १८५७ चे स्वातंत्र्यसमर आणि अनेक कार्यक्रमांचे लेखन, दोन मालिकांसाठी लेखन तिने केले आहे. तेज तपस्वीनी चित्रपट निर्मिती व पटकथा लेखन, चार लघुपट निर्मिती व लेखन.असे विपुल लेखन तिने केले आहे.
प्रमुख संपादक-
1) मधुघट
2) मराठीतील स्त्रियांचे साहित्य,
3) भारतीय भाषातील स्त्रियांचे साहित्य दोन खंड,
4) समाज सुधारक आणि विचारवंत यांचे स्त्री साहित्यातील योगदान, 5)अखिल भारतीय महिला चरित्रकोश
6) अनेक संस्थांच्या विशेष अंकांसाठी अतिथी संपादक 7) सहसंपादक-सेतू माधवराव पगडी समग्र साहित्य सहा मराठी व दोन इंग्रजी खंड १२००० पृष्ठांचे संपादन आणि पुनर्मुद्रण दीड वर्षात केले.
8) ना.गो. नांदापूरकर समग्र साहित्य दोन खंड
अखिल भारतीय महिला चरित्र कोश प्रकल्प प्रमुख. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ सदस्य 2003 पासून…यादी खूपच मोठी आहे.
भारतातील विविध संस्था, विद्यापीठे यामध्ये उत्तम वक्ता म्हणून विद्याने नाव लौकिक मिळवला आहे. हैदराबाद मधील अनेक संस्थांकडून प्रसंगी सन्मान, सत्कार आणि जीवन गौरव पुरस्कार तिला मिळाले आहेत.

सध्या….स्त्रीवाद आणि भारतीय विचार परंपरा, पाश्चात्य स्त्रीवाद – अब्राहम विचार, जेंडर सेनसटाईजेशन इन वेदिक पिरियड, जेंडर रियलिजेशन इन मॉडर्न इरा, भारतीय परंपरा मे नारी , भारतीय इतिहास में महिला, सावित्रीच्या भगिनी या आणि अशा प्राचीन अर्वाचीन आणि सद्यकालीन महिलांचे संबंधित अभ्यास विषय यावर लेखन आणि हिंदी इंग्रजी मराठीतून व्याख्याने व शोध प्रबंध सादर करणे चालू आहे. महिला चरित्रकोश प्रथम खंड, इसवीसन पूर्व कालातील भारतीय महिला प्रकाशित महिला चरित्रकोश, द्वितीय खंड इसवी सन एक ते 800 1800 यामधील यासाठी 600 महिलांची माहिती संकलित तिनं केली आहे. हे काम प्रचंड मोठं आणि भारतातील अनेक अप्रकाशित महिलांना समाजासमोर आणणारे आहे. ते आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
पंचधारा- अनेक विशेष अंक प्रकाशन आणि मराठी साहित्य परिषद ग्रंथ प्रकाशन.
मुली कस्तुरी व करिष्मा आणि मिस्टर श्री. अजित यांचे तिला संपूर्ण सहकार्य आहे. आई सुशीला महाजन यांचे मार्गदर्शन तिला वेळोवेळी उपयोगी पडते.
विद्या एक तर स्टेजवर तरी असते किंवा विमानांत तरी असते, स्वतः चे सत्कार स्विकारत असते किंवा अध्यक्ष, प्रमुख पाहुणी म्हणून दुसऱ्यांना देत असते. घरी असते, तेव्हा एकतर ओट्याशी असते नाहीतर टेबलाशी लिहीत असते. आणीबाणी मध्ये ती तुरूंगात होती, कॅालेजात, समिती वर्गावर ती शिक्षिका होती, दिल्लीतल्या पथसंचालनात, सर्वात पुढे ध्वज घेऊन घोड्यावर होती, १९९० मध्ये हैद्राबाद रेडिओ वर ती मराठी कार्यक्रमांचे नियोजन, निवेदन, करायची, रमोजी सिटीमध्ये “हॅलो इंडिया “नावाचा कार्यक्रम करायची. हे सर्व ऐकतांना आम्ही मैत्रिणी तिची पाठ थोपटतो, आमची पण कॅालर टाईट करतो.
समितीच्या संस्थापक लक्ष्मीबाई केळकर उर्फ वंदनीय मावशींची शताब्दी होती त्या निमित्त दोन तासाची “तेजतपस्विनी“ ही टेली फिल्म तिने निर्मिली. प्रथम ईटीव्हीवर दाखवली.पुढे झी हिंदी, सह्याद्री व लोकसभा टी..व्ही वर आली. त्यानंतर मुलाखतींवर आधारित 3CD बनवल्या तसेच नागपूरला 2005 मध्ये 10000 सेविकांचे तीन दिवसांचे एकत्रीकरण झाले होते. त्याचे पंचेचाळीस तासांचे चित्रीकरण होते त्यावरून एक तासाची सीडी बनवली. 2015 मध्ये तिच्या आईवर पस्तीस मिनिटाची “समर्था सुशिला” ही एक फिल्म केली. कारण तिच्या आईचे व्यक्तिमत्व ही तितकेच प्रेरणादायी आणि कर्तृत्ववान आहे.
1990 पासून दोन हजार पर्यंत ती सर्वो स्टॅबिलायझर मार्केटिंग करत होती. तिचीच स्वतःची कंपनी सुरू केली. हे काम पुन्हा इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातले होते पण ते तंत्र तिने थोडेसे समजून घेतले. त्यामुळे चांगले मार्केटिंग करू शकली. त्याकाळात या क्षेत्रात स्वतःचे वाहन घेऊन जाणारी मार्केटिंग करणारी एखादीच होती.
अशी वेगळ्या वाटेने जाणारी, स्वतः चे आकाश स्वतः निर्माण करून त्यात आनंदाने विहार करणारी माझी मैत्रिण डॅा. विद्या देवधर! तिला अशाच अनेक गगन भरारीं साठी अनेक शुभेच्छा !

— लेखन : चित्रा मेहेंदळे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
सुरेख,सुंदर अवलोकन विद्याताईच्या कार्याचा आढावा व समग्र आवाका अतिशय प्रेरक आहे…विद्याताई व अलकाताई दोघींचे अभिनंदन 🙏🏻
उत्तम लेख 👌👌👌👌
विद्या देवधर यांच्या कार्याचा समग्र आढावा घेणारा लेख… दोघी मैत्रिणींचे कौतुक ….. जिचे तिचे आकाश … खरोखर सार्थ नाव आहे …