Saturday, October 18, 2025
Homeलेखजीवन प्रवास - भाग १०

जीवन प्रवास – भाग १०

कल्पवृक्ष साक्ष

देवांना अर्पण केले जाणारे फळ म्हणजे श्रीफळ ! कल्पतरूला आपल्या धर्मात खूप महत्व आहे. माडाचा प्रत्येक अवयव उपयोगात येणारा आहे. अर्थात गुणसंपन्न ! त्या तरूचे गुण आमच्यात रूजावे, अशी मनी सुप्त इच्छा ठेवून, हया वृक्षासोबत आमच्या नव्या पर्वाला, आम्ही सुरुवात केली होती.

“कसोटी” ही यशाची किल्ली असते. हे आम्हाला चांगलेच उमजू लागले होते. आयुष्याच्या वाटेवर, आमच्या समोर येणाऱ्या अनेक परीक्षा पार करावयाच्या होत्या. कावळा आणि चिमणीच्या गोष्टीतील, घरा प्रमाणे, शेणाचे का मेणाचे ? भांडवल पाहता, त्यावेळी शेणाचे घर बांधणे, शक्य होणार होते. बँक बचतही तशी आमच्या खात्यात पुरेशी नव्हती.

सन १९८५ ला नोकरी पर्मनंट झाल्यामुळे, पगारातून महिना ३०० रुपये जीपीएफ फंडात जमा होत होते. त्यातील काही रक्कम उचलून, घरबांधणीचा प्रारंभ करण्याचे आम्ही ठरवले. तेवढ्या रकमेत पक्के घर होणे कठीण होते. इथून तिथून मजुरी खर्चाचा व लागणाऱ्या मालाचा आढावा घेत होतो. कठीण पेच होता. मी मागील भागात म्हटले होते, ‘घर पाहावे बांधून !’ संसार हा एक सर्कशीतील उंच दोरीवरचा, जीवावर बेतणारा खेळ आहे. (खास करून प्रेमविवाह करणाऱ्यांसाठी.) जो न डगमगता तोल सावरतो, तो हया खेळात नक्कीच जिंकतो.

ह्या प्रसंगी धावून आलेले यांचे धाकटे मामा (वसंत मणचेकर), ह्यांचे व मामांचे नाते म्हणजे मैत्रीचे ! त्यांना विसरणे शक्य नाही. दहा बाय अठरा च्या जागेवर घराचे काम सुरू केले होते. ही जागा खाडीचा भाग असल्यामुळे दलदल होती. दोन-तीन ट्रक दगड मातीचे, पाया भरणी करणे गरजेचे होते. भरणी जागेवर आणून टाकण्यासाठी मजुरी खर्च नक्कीच वाढणार होता. तेव्हा माझ्या बहिणींनी व आम्ही दोघे, तसेच माझ्या भाचाचे मित्र, मिळून हे काम तडीस नेले होते. स्वतःच्या घराची उत्सुकता मनी असल्याने, आमच्यात जणू बळ निर्माण झाले होते.

घर बांधणारा गवंडी व त्याचे दोन सहकारी, सोबत यांचे मामा व हे स्वतः कामाला लागले होते. घराची उभारणी होत असताना, घडलेला प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर येतो. घराच्या बाहेर ओटा व पायऱ्या घेण्यावरून, समोरील चाळीतील रहिवाशांनी आमच्यावर आक्षेप आणला होता. जमिनीच्या क्षेत्रावरून मोजमाप करताना बाजूच्या खोलीतील मिलिट्री रिटायर्ड श्री. फडतरे यांनी तर भांडणातून जीव मेटाकुटीला आणला होता. माझ्या बहिणी व ह्यांचे मामा, त्या सर्वांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. आम्हा दोघांना त्यातले मर्म कळत होते, पण भांडण सुरात बोलणे, जमत नव्हते. शेवटी जेवढे क्षेत्र ,त्यातच आम्ही भिंती उभारल्या होत्या. पुढे एक फुटाच्या पायऱ्या सरळ न घेता तिरप्या घेतल्या होत्या. घराच्या छताची उतरण आम्हाला मागच्या बाजूस घेण्यास लावली होती.

सारे त्यांच्या मनासारखे केले होते. मग मात्र रागाचा उद्रेक व्हावा त्याप्रमाणे, माझ्या मुखातून शब्द निसटले. “जाऊ द्या, झालं ना त्यांच्या मनाप्रमाणे, आपल्याला कुठे इथेच आयुष्यभर राहायचे आहे ! आज ना उद्या आपण कुठेतरी पुढे निघून गेलेले असू.” त्या दिवसापासून हे वाक्य माझ्या डोक्यात घर करून राहिले होते. कारण निसटलेले शब्द, कधी तरी ते पूर्ण करावे लागणार होते. आणि हीच आयुष्याच्या पुढच्या यशाची, आणखीन एक कसोटी होती. म्हणूनच म्हणतात, वैऱ्याचे घर असावे शेजारी ! तेव्हा तो माणूस दुखावतो व त्याच्यातून त्याला, जोमाने पुढे जाण्याची स्फूर्ती मिळते.

अर्ध्या पक्क्या सिमेंटच्या भिंती व त्यावर पत्रा अशा घराच्या भिंती उभ्या राहिल्या. कमी किमतीत रिसेल कौले छताला टाकली होती. घर तयार झाले होते. चांगला शुभ दिन ठरवून आम्ही स्वतःच्या घरात सन १९९०-९१ मध्ये प्रवेश केला होता. कधी कधी सततच्या जोरदार पावसाने कौले पाझरून, पाण्याचे ओघळ घरात पडत असत. त्या खाली बादली वा टोप ठेवून, मुलांचे वर्ग घेत असू. अश्या स्थितीत क्लासच्या मुलांनी कधीही तक्रार केली नाही. खरंच, हे त्यांचे मोठेपण होते.

नवीन जागेचा पायगुण असावा, आमच्या क्लासला चांगलीच प्रसिद्धी मिळत होती. आजूबाजूच्या नगरातील मुलेही आमच्या क्लासला येऊ लागली होती. दरवाज्यात चपलांचा ढीग अधिक वाढू लागला होता. असं म्हणतात, ज्याच्या दारात चपला भरभरून दिसतात, त्या घरात लक्ष्मीची पावले अवतरतात ! मी हे कुठेतरी वाचले होते. खरंच माझ्या घरात लक्ष्मीचा वास होऊ लागला होता.

सोनाली मोठी होत होती. तिचे वाढदिवस खूप छान क्लासच्या मुलांसमवेत साजरे होत होते. बहिणीच्या मुलांचे मित्र ही आमच्या स्वभावाशी मिसळून गेले होते. परिचय वाढत होता. चाळीतील शेजारी हमरीतुमरी विसरून आमच्याशी एकरुप झाले होते. ओळखी वाढू लागल्या होत्या. ह्यांच्या नेतृत्वाखाली “नवतरुण मित्र मंडळाची” स्थापना झाली होती. बाजूलाच असलेले पटांगण सुशोभित करण्यासाठी मंडळाने पुढाकार घेतला होता. बाजूने झाडे लावली गेली होती. बसण्यास बेंच लावण्यात आला होता. मैदानाला नगरसेवकांच्या मदतीने तर कधी आजूबाजूच्या रहिवाशांनी मिळून आर्थिक मदत करत, मैदानाला मातीची भरणी व सिमेंट कोबा करून, सुशोभित केले होते.

पटांगणात ह्यांच्या हस्ते लावलेले माडाचे झाड, आमच्या संसारा सोबतीने वाढू लागले होते. हे न चुकता, नियमित त्या रोपास पाणी देत असत. कल्पतरू व आमचे नवजीवन एकमेकात गुंफून, उभारी घेत जणू फूलू लागले होते. हा कल्पतरू माझ्या जीवन प्रवासाला साक्ष म्हणून, आजही भरघोस नारळांनी भरून उभा आहे.

माझ्या कल्पक बुद्धीत नवनवीन उपक्रम घोळत असत. नळाची व शौचालयाची सोय, सार्वजनिक स्थितीत होती. आमच्या चाळीतील शेजाऱ्यांना सोबत घेवून, पंधरा जणात नळ घेण्याचे सुचवले. हापशी रुपी नळाचे काम मान्य होत, तडीस गेले होते. घरापासून नळ तसा लांबच होता. नळाचे खजिनदार व चिटणीस ही दोन्ही पदे, ह्यांच्या खांद्यावर दिली होती. सामाजिक कार्याचा भारही वाढत होता. कुणाचे अर्ज लिहून देणे, आलेली कार्यालयीन पत्रे वाचून त्याचा अर्थ समजावून सांगणे, शालेय माहिती देणे, अशी बरीच मदत हे सर्वांना आनंदाने करत असत.

ह्यांच्या गैरहजेरीत मलाही ही कामे करून देण्याची संधी मिळत असे. आमच्यातील सहकार्याची भावना व विश्वासाची पारख, नगराच्या आजूबाजूस पसरली होती. नवरत्नात ओळखली जाणारी माझी एमटीएनएल कंपनी, प्रतिष्ठेच्या शिखरावर होती.त्यावेळी माझ्या घरी आलेला लँडलाईन टेलिफोन, म्हणजे माझ्या आयुष्याला लाभलेली पहिली प्रतिष्ठा होती.

माझ्या एमटीएनएल चे महत्व साऱ्यांना कळावे व माझ्या फोनचा गरजेला उपयोग व्हावा, हया निश्चयाने, आम्ही आजूबाजूस सर्वांना टेलिफोन नंबर दिला होता. इतरांचे बरेच फोन येत असत. आम्ही सुद्धा त्यांना निरोप देत असू तर कधी स्वतः जावून बोलावत असू. आमच्यातील माणूसपणा व परोपकारी वृत्ती, जीवनी प्रकट करण्याची संधी प्राप्त करून दिली, ती माझ्या एमटीएनएलच्या (२४११०३५०) टेलिफोनने !

एव्हाना क्लासचा पसारा विस्तारला होता. क्लासमध्ये वेगवेगळे बदल करणे गरजेचे होते. त्या वर्षी क्लासचा पहिला कार्यक्रम आखला होता. ह्यांच्या एका मित्राची डी जे सिस्टिम होती. मुलांसाठी क्लासच्या मुलांनीच, नृत्य सादरीकरण कार्यक्रम करण्याचे ठरविले होते. नगरातील पहिला नावीन्यपूर्ण कार्यक्रम होणार होता. पालक व मुले, एकूण सर्व नगरच खुश होते. हया कार्यक्रमात सोनालीने (माझी मुलगी) “ये चीज बडी मस्त मस्त” हया गाण्यावर नृत्य, केले होते. आजही आठवले की आमच्या क्लासची ती छोटी छोटी सीमा, अक्का, शीतल, भालचंद्र, विकास, विशाल (सर्वांची नावे आठवत नाहीत) अशी मुले डोळ्या समोरून तरळून जातात.

सन १९९१, सोनालीला शाळेत प्रवेश मिळवून घेण्याचे वर्ष होते. शाळा इंग्रजी माध्यम असावी, पण आम्हाला डोनेशन व फी बाबतीत परवडेल, अश्या शाळेच्या शोधात आम्ही होतो. सिताराम प्रकाश हायस्कूल, वडाळा ही शाळा आम्ही निवडली होती. खर्चाची बाजू वाढू लागली होती. त्यातच घरात लागणारे फर्निचर, आम्ही त्यावेळी सेकंड हॅन्ड किंमतीत विकत घेतले होते. त्या वेळेला आमच्यासाठी ते खूप प्रिय होते.

त्याच दरम्यान, सन १९९३ मधे हिंदू-मुस्लीम असे द्वंद्व सुरू झाले होते. आमचे नगर पूर्ण हिंदू वासियांचे होते. आजूबाजूची दोन-तीन नगरे हिंदूंनीच वसलेली होती. पण संगमनगर हे नगर मुस्लिम वासियांचे होते. हिंदूंची घरे अगदी फार कमी होती. रात्रीच्या वेळी होणारे ते हल्ले आठवले की, आजही अंगावर सरसरून काटा येतो. प्रत्येक रात्र जोखमीची वाटत असे.

आमचे घर कच्चे असल्याकारणाने, रात्री मुलीला समोरील (पक्के घर) शेजार्‍यांकडे झोपवत असू. चाळीतील सर्व पुरुष मंडळी ड्यूटी लावून, तयारीनिशी आलटून-पालटून पहारा देत असत. अशाच एका रात्री, लांबून घरावर दगडफेक झाली होती. मोठमोठ्या आरोळ्या येत होत्या. चाळीतील लहान मुले व स्त्रिया घाबरून गेले होते. आणि अशाच वेळी पुरुषांचे गट बनवून नगरवासीयांनी स्व: सुरक्षा कवच तयार केले होते. हया घटनेत यांनी स्वतःला पूर्ण वाहून घेतले होते.

अशा वेळेला आम्ही स्त्रीयांनी एक युक्ती लढवली होती. बादलीभर पाण्यात मिरची पावडर मिक्स करून ठेवली होती. वेळ आलीच तर आपण या गोष्टीचा वापर करून स्वतःचे संरक्षण करू शकतो. जाती वादातून निर्माण झालेले महा भयंकर प्रसंग जीव घेण्यापर्यंत जात होते. जीवघेणे तुफान हळूहळू निवळू लागले होते. जनजीवन पुन्हा स्थिर होत होते. माणसाला माणसातली माणुसकी कळू लागली होती. पुन्हा सर्व नगरवासीय एकरूप झाले होते.

पुन्हा जीवनाची गाडी रुळावर येताच, कष्टाच्या चाकांनी वेग धरला होता. अशातच ह्यांनी पदवीचे शेवटचे वर्ष पूर्ण करण्याचे ठरविले होते. दादरला क्लास लावून दृढ निश्चयाचे बळ लावून, १९९३ मध्ये बीकॉम पदवी मिळवली होती. आता नोकरीसाठी अर्जांची सुरुवात झाली होती. पोलीस भरती पासून ते एअर इंडिया पर्यंत अर्ज केले होते. लेखणी परीक्षेत पास होऊनही कुठेतरी एखादी त्रुटी दाखवून अर्ज फेटाळले जात होते. तेव्हा जर आर्थिक बाजू भक्कम असती आणि त्याची जोड लागली असती तर नोकरी नक्कीच पदरात पडली असती. पण नेमकी हीच आमची बाजू कमकुवत होती. अनेक मुलाखती देऊनही नकार घंटाच मिळत होती. त्यामुळे ह्यांची बरीच चिडचिड होऊ लागली होती. त्यामुळे आमच्यात हलक्या हलक्या विजा चमकू लागल्या होत्या.

संसार रुपी जहाज, तुफानी वादळात, समुद्राच्या लाटांवर, प्रवासास निघाले होते. जर त्यावेळी त्या जहाजाला, एखादे जरी छिद्र पडले असते तर, त्यात पाणी आत शिरून ते डगमगले असते. पण तसे होऊ नये, म्हणून वादांना टोकापर्यंत न जाण्याची खबरदारी आम्ही दोघेही समजून घेत होतो. कारण आम्ही एक मताने एकीच्या बळाने लोटलेले जहाज, तीरापर्यंत पोहोचविण्याचे कर्तव्यही आमचे दोघांचे होते.

घर उभे करून, मैदानात लावलेले नारळाचे झाड, आमच्या प्रेमात वाढत होते.जसे नारळांनी झाड भरले तसे आमचे घरही सुखांनी भरत होते.

वर्षा भाबल.

लेखन : सौ. वर्षा महेंद्र भाबल.
संपादन : अलका भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. आजही सन 1993 च्या जातीय दंगलीची आठवण झाली की फार वेदना होतात. वर्षा भाबल यांनी सुंदर लेखन केले आहे. पुढील भाग कधी वाचायला मिळतो असे वाटत असते.
    🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

ॲड.श्रध्दा बापूसाईनाथ राऊळ. आरवली.. on माणसांच्या गर्दीतूनी या…!!
संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप