एक पाऊल पुढे
सूर्याच्या उगवण्याने, जशी सृष्टी प्रकाशित होते, त्याप्रमाणे आमच्या क्लासचा विस्तार, रोज नवीन विद्यार्थी प्रवेशाने दिवसेंदिवस विस्तारु लागला होता. पुन्हा एकदा जागेचा तुटवडा भासू लागला होता. दरम्यान, कधी काळी आमच्याशी वैर धरून भांडणारे आमचे शेजारी, मिलिट्री रिटायर्ड श्री.फडतरे यांनी स्वतःहून, स्वतःची खोली क्लास साठी, चार तास वापरण्यास आम्हाला दिली होती. अखेर आमच्या स्वभाव गुणांची ओळख पटल्याचा हा आम्हाला मिळालेला दाखला होता.
सन १९९०-९१ दरम्यान माझ्या बाबांचे आजारपण आम्ही अगदी जवळून पाहिले होते. कणखर व खंबीरपणे आयुष्यभर राबलेले, माझे बाबा ह्या आजारात हतबल झाले होते. त्यांच्या निवृत्ती नंतर त्यांना ग्रासून टाकणारा हा सर्वात मोठा आजार होता. ह्या आधी आम्ही त्यांना कधी, महाभंयकर आजारात पाहिले नव्हते. त्यांना होणारा कंबरेचा त्रास व कधी तरी हलका दम्याचा त्रास होत असे ,पण त्यावेळी ते न डगमगता स्वतः आपली काळजी घेत असत.
वनस्पतींच्या पानांचे व मुळांचे बरेच ज्ञान त्यांना अवगत होते. कावीळ ह्या रोगावर दोन प्रकारच्या वनस्पतींची पाने आणून, ती पाने वरवंट्यावर वाटून त्यांचे वेगवेगळे दोन गोळे तयार करीत असत. बरेच लोक त्यावेळी हे बाबांनी बनवलेले औषध घेण्यासाठी येत असत. तसेच डोळ्यात ‘फूल पडणे’ ह्या आजारावर एका शिंपल्यांचे कवच आणून त्याची बारीक पूड करून त्याला वस्त्र गाळ करत असत व त्याचे थेंब डोळ्यात टाकत असत. असे उपचार करून, बऱ्याच लोकांना त्यांनी बरे केले होते. जणू माझे बाबा, झाडपाल्याचा वापर करून औषधे तयार करणारे, घरगुती वैद्य होते. पण ह्या उपचाराच्या मोबदल्यात त्यांनी कधीही कुणाकडून काहीही घेतले नव्हते. कारण त्यांचे एक ब्रीद वाक्य होते की , “मोबदलो घेवन केलेलो उपचार गुण देयत नाय. माणुसकी ठेवन उदार मनान आपला ज्ञान दुसऱ्याक बरा करूक वापरूक होया. तेच्यातच आपणाक समाधान मिळता.” पण उपचार करून घेणाऱ्या व्यक्तींना असे करून घेणे मनाविरूद्ध वाटत असे. त्यामुळे त्या व्यक्ती एक श्रीफळ बाबांच्या हाती देत असत.
बाबांचा दुसरा गुण मला आजही आठवतो. सकाळी उठून देवाची सर्व भांडी, कोकम- चिंच लावून साफ करत असत, सूर्य वर येण्यापूर्वीच देवाची पूजा करत असत. देवाला श्रध्देने नमस्कार करून, कामावर वेळेत पोहचत असत. पण ते कधी देव देवतांच्या आहारी गेले नाहीत. ते नेहमी म्हणत, ‘देव मानावा पण त्येच्यात गुंतून जायचा नाय.’ त्यांचे नेहमी एक ठाम मत होते की, देवामुळे आपले बरे वाईट घडत नसते. ते आपल्या कर्माने घडत असते. आपले कर्म चांगले तर आपले आयुष्य सुंदर होते. हे उत्तम गुण मी माझ्या बाबांकडून शिकले.
शेवटी असा आजार आला की, ते खूप चिडचिडे झाले, कारण त्यांचे सर्व संगोपन इस्पितळात आम्ही चारही भावंडे व आई करत असू. आणि ही गोष्ट त्यांना आवडत नव्हती. ते रागाने म्हणतही, “एवढा माजा तुमका करूक लागता, त्यापेक्षा माका मराण कित्या येयत नाय !’
आणि तो दिवस आलाच! बाबा आम्हाला सोडून दूर गेले होते. दुर्दैव म्हणजे त्या दिवसाला त्यांचे शेवटचे दर्शन माझ्या पतींना लाभले नाही. मनात उगाचच शंका येत राहिली, आमच्यावरील बाबांचा राग शेवटपर्यंत गेला नव्हता की काय ?
आईला ह्या धक्क्यातून सावरायला बरेच महिने गेले होते. ती सहसा घराबाहेर पडत नव्हती. त्यामुळे माझ्या बहिणी स्वतःच्या मुलांना व माझ्या मुलीला घेऊन, आईच्या घरी भांडुपला एखादा दिवस राहून येत असत. तेवढाच तिला दुःखातून विरंगुळा मिळत असे.
आमचे रोजचे जीवन अतिशय व्यस्त झाले होते. त्यामुळे आईकडे माझे जाणे होतच नसे. नोकरी व क्लास अश्या व्यस्त कामाने मुलीला शाळेत ने-आण करणेही जमत नसे. वेळ वाचावा म्हणून, उपयोगात येणारी साइकल, पहिले वाहन आम्ही खरेदी केले होते. त्यामुळे मुलीलाही शाळेत सोडणे व आणणे शक्य होत असे.
आयुष्यातील ह्या पाच- सहा वर्षात गावाकडील समाज व आप्तेष्ट ह्यांची आम्हाला ओळखच नव्हती. त्यामुळे कुणाचे येणे वा आमचे जाणे हे समीकरणच नव्हते. त्याच दरम्यान आज्याला (माझा भाऊ) बीपीटी वसाहतीत वडाळ्याला रूम मिळाली होती. त्याचे कुटुंब व आई तेथे राहण्यास आले होते. आई जवळ आल्यामुळे आम्हा मुलींना खूपच आनंद झाला होता. एकूण काय ! आम्ही चारही भावंडे एकाच विभागात (वडाळा) असल्याने आमचे एकमेकांतील नाते पुन्हा एकदा घट्ट झाले होते. अधून मधून आईसुद्धा आम्हा मुलींकडे दोन-चार दिवस येऊन राहत असे. आमच्या सर्व मुलांना आजीचा सहवास मिळू लागला होता. म्हणतात ना ! ‘आजी म्हणजे नातवंडाचा एक सॉफ्ट कॉर्नर असतो.’
क्लासच्या जागेचा तुटवडा दूर करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा घराच्या कामात हात टाकला होता. घराच्या आतूनच लाकडी शिडी टाकून, घराची उंची वाढवून, प्लायवुडचा माळा टाकला होता. जेमतेम आम्ही पूर्णपणे उभे राहू, एवढी उंची घेतली होती. कारण त्यावेळी बीएमसी परवानगी शिवाय वरचा मजला होत नसे, त्यामुळे हे काम दिसण्यात येऊ नये म्हणून, खोलीच्या आतूनच हे काम करून घेतले होते. आता क्लासला ऐसपैस जागा तयार झाली होती. ह्यांचे वर्ग माळ्यावर होत असत. माझे वर्ग मी खालीच घेत असे.
क्लासच्या व्यस्त जीवनी, एक रविवार यांनी स्वतःसाठी राखून घेतला होता. पूर्ण दिवस क्रिकेटचे सामने खेळून, अधांतरी कोलमडून पडलेल्या स्वप्नाला, जोपासण्याच्या प्रयत्नात हे असत. क्रिकेट खेळाचे उत्कृष्ट ज्ञानभंडार असल्याने, ह्यांच्या खेळीला नेहमीच, प्रशंसाची थाप मिळत असे. उत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून, ह्यांची ओळख खूपच पसरली होती. त्यामुळे आता आमचा मित्र परिवार मात्र वाढू लागला होता. यांच्या स्पष्ट वक्तव्यामुळे आमची कथाही हळूहळू दूरवर पसरत होती.
एव्हाना, माझ्या माहेरा कडील बऱ्याच व्यक्ती, ह्यांना ओळखू लागल्या होत्या. क्रिकेट प्रेमी व क्रिकेट खेळाडू असे ह्यांचे, अगदी जवळचे मित्र, छबीलदास शाळेत एकाच बाकावर बसणारे रमाकांत मणचेकर, बालपणापासूनचा वर्गमित्र, प्रदीप मणचेकर एकाच राशीत बांधलेले, जनार्दन बैयकर खेळा सोबत माईकचे बादशाहा, नाना कुबल (आज ते हया जगात नाहीत), रमा भाबल, रामजी मौर्या, दत्ता पोसम, दशरथ माळगावकर (हे तर सोबत मोठे झाले.) बबन सारंग म्हणजे ध्येयवादी व्यक्ती, अपयश पचवून यशाला गाठणारा दानशूर, विलास मोरे, कांता जुवाटकर, मनोज सरपोळे, दीपक बांदकर, दिलीप मणचेकर, सगळे अगदी एकमेकांना जिवाभावाने जपत असत. छोट्या-मोठ्या प्रसंगांना, एकमेकांना धीराने हातात हात देत असत. हया मित्र परिवारातील ह्यांचे सारे मित्र, त्यावेळी आमच्या सारखेच, आयुष्याच्या चढ-उताराचे धडे घेत होते. आजही ही साखळी जशी होती, तशीच आहे.
माझ्याही मनी काही संकल्पना रेंगाळत होत्या. चाळीतील सर्व महिलांना एकत्र घेऊन, सर्व अनूमते मी ‘शिवनेरी महिला फंड’ सुरू केला होता. महिना शंभर रुपये वर्गणी जमा करून, बारा महिन्यांनी एकूण मुद्दलीवर येणाऱ्या व्याजाच्या पैशात, मी फंडातील महिला सभासदांचा ‘हळदी कुंकू’ कार्यक्रम साजरा करण्यास सुरुवात केली होती. हळूहळू ही कल्पक योजना सगळीकडे पसरली होती. आमच्या फंडात नगरातील अनेक महिलांनी भाग घेतला होता. फंड रक्कम वाढली होती.
अडी-अडचणीला फंडातील महिला सभासदांची आर्थिक गरज, कमी व्याज दर लावून भागत होती. महिलांची संख्याही वाढली होती. त्यामुळे चाळीत थाटला जाणारा कार्यक्रम, आम्ही पटांगणात घेऊ लागलो होतो. महिलांना घरा बाहेर पडून, स्पर्धा निमित्ताने स्व:ताचे कलागुण दाखवण्यास संधी मिळाली होती. माझ्या मनात असलेली कल्पना, मला हया महिलांच्या सहकार्यातून, साकारण्यासाठी संधी लाभली होती. महिला एकजुटीचा प्रभाव, आमच्या वस्तीत ऊद्द्भवणाऱ्या समस्यांवेळी, उपयोगात येवू लागला होता.
आमच्या क्लासचे हळदीकुंकू समारंभ व गेट-टुगेदर या निमित्ताने, मुलांसाठी आखलेल्या स्पर्धा, डान्स, एकपात्री नाट्य, रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, असे सादरीकरण होत असे. मुलांमधील बूजरेपणा नाहीसा व्हावा व त्यांच्यातील कलागुण, त्यांच्या पालकांना उमजावेत, हा हेतू ठेवून, अश्या कार्यक्रमांना आम्ही प्रोत्साहन देत होतो.
मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे उत्साहाची जणू परभणी असते. गणेशोत्सव जस-जसा जवळ येऊ लागतो, तसा मुंबईकरांच्या शरीरात उत्साहाची लाट, जोमाने संचारु लागते. चैत्यन्याने बहरलेली, तना मनात सदा अवतरणारा, विघ्नहर्ता बाप्पा येणार ! हया फक्त कल्पनेने मुंबईकर आनंदाने, तयारीला लागलेला असतो. या उत्सवातील लाईट- डेकोरेशन, नवीन कल्पकतेने केलेले असते. वेगवेगळे विषय घेऊन, रचनात्मक दृष्ये सजवली जातात, हे पहाण्यात एक वेगळीच मजा असते. त्यासाठी ‘गणपती पाहायला’ हया विशेषणात, लहान-थोर माणसे, रात्री जेवणानंतर निघत असतात. गणपती पाहणे, हा कार्यक्रम आटपून पहाटे तीन-चार वाजेपर्यंत घरी परततात. पायी प्रवासाने, झगमगीत मुंबई न्याहळत, बाप्पाचे दर्शन घेणे, खूपच विलोभनीय असते. सार्वजनिक मंडळांनी भव्यदिव्य उभारलेली, मंडपातील ऐतिहासिक दृष्ये पहाताना, मन भारावून जाते. गणपती पाहण्याचा अवसर, माझ्या मुलीला बहिणीसोबत मिळत असे.
क्रिकेट वेडा जीव ह्यांना काही स्वस्थ बसू देत नव्हता. गाबीत समाज बांधवांनी भरवलेले क्रिकेट सामने खेळण्यास, ह्यांना त्यावर्षी गावी जायचे होते. ऑफिसला रजा घेवून, क्लास सांभाळणे गरजेचे होते. अभिमानाची गोष्ट म्हणजे, त्यावर्षी ह्यांनी माझ्या माहेरी वीरवाडी येथे, सुंदर खेळी केली होती. तिथे ह्यांना पुरस्कारही मिळाले होते. आजूबाजूच्या गावातही त्यांचे सामने झाले होते. क्रिकेट खेळ लहानपणापासून त्यांच्या अंगी मुरलेला होता. लहान असताना घराचा आधार म्हणजे, ह्यांचे वडील गेल्याने, क्रिकेट प्रशिक्षणात ह्यांचा खंड पडला होता. पण ह्यांनी आपला सराव नित्यनेमाने चालू ठेवला होता. आजही वयाच्या चौपन्न वर्षीही ह्यांचा खेळ चांगलाच आहे. हे आजही त्याच उमेदीने व उत्साहाने खेळत आहेत.
सन १९९०-९१ पासून शिवशंकर नगर, वडाळा येथे आम्ही सोनाली क्लासेसचे विस्तीर्ण जाळे पसरवले होते. मुलांच्या नवनवीन कलागुणांना उभारी देऊन, त्यांना नगरवासीयां समोर सादर केले होते. होळी उत्सवाच्या निमित्ताने नगरवासियांच्या मनी सार्वजनिक उत्सवाची जाणीव करून दिली होती. झोपडपट्टी मध्ये उद्भवणाऱ्या छोट्या-मोठ्या अडचणी, नगरसेवकांच्या नजरेत आणून दिल्या होत्या. ते सोडविण्यासाठी पाठपुरावा करत राहिलो होतो.
“प्रयत्नांती परमेश्वर” हे धोरण ठेवून, सर्व नगरवासियांना एकत्रित आणले होते. कधी ना कधी येथील रहिवाशांचे कुचंबित जगणे संपेल ह्या आशेच्या किरणावर सतत पाठपुरावा करत राहिलो आणि आजही करत आहोत.

– लेखन : सौ. वर्षा महेंद्र भाबल.
– संपादन : अलका भुजबळ 9869484800