कष्टाळू कामांचे धडे
ग्रामीण जीवन उपभोगताना मला मिळालेली, ती तीन वर्षे खूप काही शिकवून गेली.
गावी स्थिरावलो आणि बाबांनी मोंड गावी शेत जमीन विकत घेतली. पावसाने धो- धो पडायला सुरुवात केली, की आम्ही मामाच्या गावी जाऊन, भाताची लावणी करत असू. गावाकडे शाळेला लावणीची सुट्टी लागत असे. या सुट्टीचा उपयोग, अशीच शेत-कामे शिकण्याची संधी मला मिळण्यात झाला.
त्यादिवशी आई-बाबा व मी तिघांनी न्याहारी करून मोंड गावी दिवस उजाडताच जायला निघालो. तोवर मामाच्या घरून काम करायला माणसं येऊन पोहोचली होती व रोपटी काढून त्याच्या पेंढ्या बांधल्या गेल्या होत्या. डोक्यावर इर्लि (पावसापासून संरक्षण करण्याचे साधन) घेतली.
मी भाताच्या लावणीला सुरुवात केली. जमिनीत दलदल असल्याने पाय अर्ध्यापर्यंत रुतत होते. जणू मऊशार कापसाच्या राशीत उभं राहिल्याचा भास होत होता. भाताची चार पेर घेऊन, त्या दलदलीत टोचायची व त्यावरून हात फिरवायचा. असे करत आम्ही सर्व रांगेने लावत मागे जात होतो. अचानक, मी पेर टोचली आणि हात फिरवला, तेवढ्यात माझ्या हातावर एक लांबलचक साप दिसला. मी ओरडतच हात जोराने झटकला व धावण्याच्या प्रयत्नात, त्या दलदलीत पडले. त्या सापाचा लुसलुशीत स्पर्श, आजही मला आठवला की माझ्या अंगावर शहारे येतात!
दुपारी मामी डोक्यावर, टोपलीतून जेवण घेऊन येत असे. कडधान्यांच्या उसळी, चुलीत भाजलेली सुकी मासळी, गरम-गरम भात, तर कधी कालवे मिसळून हटळाची भाजी. जवळच खडकावर बसून, मोकळ्या रानात हिरव्यागार शेतात, सोबत रंगीबेरंगी उमललेली जंगली फुले व सतत धारेने पडणारा पाऊस, अशा निसर्गाच्या पंक्तीत जेवताना अधिक चार घास खाल्ले जात असत.
संध्याकाळी घरी पोहचेपर्यंत अंधार पडत असे. त्या दिवशी असेच आम्ही घरी यायला निघालो होतो. पायी प्रवास एक तासाचा होत असे. अनुभवाने घाटीवर आलो आणि पूर्ण काळोख झाला. बाबांनी बॅटरी चालु केली.
घाटी संपून पायवाटेला लागलो.
आई पुढे, मी मधे व बाबा मागे. तेवढ्यात अंगात गंजी, कमरेच्या खाली मळकट धोतर व हातात छोटीशी कापडी पिशवी अशी व्यक्ती आमच्याजवळ येताना दिसली. त्याने लगेचच आईला हाक मारली, “काय गो येसू, एवढी रात पडासर खय गेलं होतस ? पान सुपारी तरी दी.” आई एकही शब्द न उच्चारता तशीच पुढे चालत राहिली. आम्हीही तेच केले. नदी पार करून, एकदाचे घर गाठले. न राहून मी शेवटी आईला विचारले,” तू अशी का वागलीस!” तेव्हा तिचे उत्तर ऐकून माझ्या तर तोंडचे पाणीच पळाले. ती म्हणाली,” अगो तो इष्ट होतो (कुणबी जातीतील ओळखीचा माणूस) पण तेका मरून एक-दोन महिने होयत ईले.” असे गावाकडील भूतांचे, देवचाराचे असे बरेच किस्से आईकडून ऐकले होते.
माझा वीरवाडी गाव, कालवा साठी (खडकात नदीत सापडणारे जीव) खूप प्रसिद्ध आहे. फणसाच्या पानावर ठेवून, चुलीत भाजून ही कालवे, खायलाही खूप मस्त लागतात. किंवा तव्यावर कांदा, खोबरे, मसाला, कोकम घालून रसरशीत शिजवून, सुकी कालवा, भाकरीसोबत खाण्यात काही औरच मजा येते.
नदीचे पाणी ओहटले की, पाऊलभर पाण्यात ओणवे राहून खडक शोधून कालवे बोचावी लागतात. भर उन्हात आपला पाठीचा भाग करपून जातो. म्हणूनच गावाकडे माणसे काळवंडतात. हे काम शिकताना, माझ्या गावच्या शेजारील मैत्रिणी ताई, शांती, गया तर चुलत बहिणी बारक्या, भाग्या, लता यांनी खूप सहकार्य केले. माझे भांडे भरून देण्यास यांचीच मदत होत असे. पण त्यांच्यातील ही कला पाहून, मला त्यांचा खूप हेवा वाटत असे.
ओल्या माशाचे बास्केट (टोपलीभर) आणण्यासाठी देवगड बंदरावर जावे लागत असे. बास्केटचा लिलाव पन्नास रुपयांपासून ते अडीचशे पर्यंत होत असे. ‘दोडी’ व ‘शेंगटी’ तर कधी ‘बळे’ असे मासे मिळत असत. मनासारखी बोनी (लिलाव) मिळेपर्यंत संध्याकाळ होऊन जात असे. त्यामुळे साडेपाचची एसटी निघून गेलेली असे. मग मासळीचे पाणी अंगावर सांडत, टोपली डोक्यावर घ्यायची, आणि पायी चालत, ते चार किलोमीटर अंतर कापून रात्री घरी यायचं.
मासळी साफ करून, ती मीठ लावून ठेवायची. सकाळी मासळी खाडीच्या खाऱ्या पाण्यात धुवून, खडकावर पसरून चांगले तीन चार दिवस वाळवून, टोपलीत सुके गवत पसरून, पावसाळी दिवसात खाण्या पुरती भरून, ठेवली जात असे.
दुसऱ्या दिवसापासून, पहाटेच भाकरी व चुलीत भाजलेली सुकी मासळी, रुमालात बांधून, डोक्यावर सुके मासे व ताजी कालवे घेवून, मी बरेचदा आई व माई सोबत विकण्यास, जवळपासच्या गावी डोक्यावर ओझे घेवून जात असू. विकून त्या मोबदल्यात धान्य, कडधान्य, लाल मिरच्या, कोकम, आंबे, काजू व फणस मिळत असे. हाताच्या अंदाजा वर विक्री- व्यवहारांचे धडे, माझ्या ह्या दोन माऊलींकडून मला मिळाले.
पावसा अगोदर लाकूड- फाटा गोळा करण्याचे काम असे. सुट्टीच्या दिवशी माझ्या मैत्रिणींसोबत मी शेण गोळा करायला सडयावर जात असे. चहूकडे नजर टाकत, शोध घ्यायचा. शेण दिसले की पळत सुटायचं नि ते शेण स्वत: च्या टोपलीत टाकायचे. हे काम करताना आमचा पकडा-पकडीचा खेळ होत असे.
जिथे दाट झाडे झुडपे असतील, त्या ठिकाणी मी आई सोबत तर कधी माई सोबत लाडकाची मोळी आणायला जात असे. काम तसे जोखमीचे होते. कोयत्याने लाकडे तोडायची मग मोकळ्या जागी आणून त्याची मोळी बांधायची. झाडाच्या वेली जमिनीवर टाकून त्यावर लाकडे मांडून मोळी घट्ट बांधायची. माझ्या डोक्यावर मोळी ठेवून, आई स्वतः ची मोळी डेवरन्याला (दगडी मनोरा) उभी करत असे. एक पाय पुढे व दुसरा पाय मागे रेटुन, डोके मोळीच्या मध्यात घालून समतोल राखत, मोळी डोक्यावर घेत असे. ताकती सोबत युक्ती महान ठरते, ती अशी!
तात्पर्य!, अशी बरीच अवजड व व्यवहारी कामे, हया दोन माऊलींकडून शिकण्याचे भाग्य मला लाभले. म्हणूनच म्हणतात ना, आई मुलांची पहिली शाळा होय.

– लेखन : वर्षा भाबल
– संपादन : अलका भुजबळ. 9869484800.
जीवन प्रवासाचे तीनही भाग खूपच मनाला भावले
तुझ्या पुढच्या भागाची वाट बघतेय