प्रासंगिक कसोट्या
आम्हा दोघांसाठी १९८८ हे वर्ष आनंददायी होते. पण आमच्या दोघांच्याही कुटुंबियांसाठी ते वर्ष, काळ्या डोहात कोसळल्यासारखे वाटले असेल. दोन्ही घरांना आयुष्यभराचा मान, मर्यादा, इज्जत, सुखशांती व मनी रंगवलेली स्वप्ने, एका क्षणात उद्ध्वस्त झाल्याचे दु: ख, सर्वांना वाटले असेल. २१ जानेवारी, हा दिवस आमच्या कुटुंबीयांना फार वाईट दिवस होता. आम्ही असं करायला नको होतं ना ? आयुष्यातील मोठी चूक आम्ही केली होती, असे आजही आम्हाला राहून- राहून वाटतं.
असं म्हणतात, “घर पाहावं बांधून नि लग्न पाहावं करून” दोन्ही गोष्टी जोखमीच्या असतात. यातलं एक काम आम्ही उरकलं होतं. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने व मानलेल्या आई-वडिलांच्या आशीर्वादात, मानलेल्या भावाच्या कान पिळणिने व दोघांच्या मित्र-परिवाराच्या उपस्थितीत, आम्ही विवाह करून नव्या आयुष्याकडे वळलो होतो. ‘ना वरात, ना हनीमून, ‘विवाह विधी आटोपून, मित्र परिवाराचा निरोप घेत, आम्ही दोघं काळ्या-पिवळ्या टॅक्सीत बसलो.
मनात हळूच विचारांनी डोकावले !’ तुम्हाला हवे होते ते तुम्ही मिळवले खरे ! पण दोन्ही कुटुंबातील, आपल्या रक्ताच्या माणसांना हरवणार आहात. ‘थोडीशी निराशेत गेल्याने, दादर स्टेशन केव्हा आले, कळलेच नव्हते. प्रथमच आम्ही पश्चिम रेल्वेचा प्रवास करणार होतो. गर्दी पाहून तर, मी पुरती घाबरून गेले होते. विरार ट्रेनमध्ये, रेटारेटीच्या डब्यात शिरून वसईपर्यंतच्या,(सोबत नवे आयुष्य घेवून) प्रवासास सुरुवात झाली होती.
वसईतील फादरवाडी, रस्त्याला लागूनच होती, पण पाडयातील घरे, काहीशी पुढे आत दिसत होती. आजूबाजूला हिरवीगार झाडे झुडुपे दिसत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूने भरपूर मोठी झाडे होती. छान गावाचे सौंदर्य, पुन्हा मला मिळाल्याचा आनंद झाला होता. सौ.वासंती देशपांडे, माझ्या कार्यालयातील सिनियर मॅडम होत्या. देशपांडे उभयतांनी, आमच्या लग्नातील विधी, मोठ्या मनाने माझे आई-बाबा होवून, केले होते. वसईला त्यांचा छानसा बंगला होता. आमच्या डोक्यावर कुठलेच छप्पर नाही, असे त्या उभयतांस कळल्यावर, त्यांनी आम्हाला, त्यांच्या बंगल्यावर येण्याची हक्काने ताकीद दिली होती. सौ.देशपांडे उभयतांचे आशीर्वाद व पाठबळ आम्ही कधीच विसरू शकणार नाही.
संसार थाटण्यासाठी, शेणाने सारवलेली जमिन मातीच्या भिंती व छताला सिमेंट पत्रा. एक छोटीशी खिडकी, घरात येता-जाता डोके खाली वाकवून शिरता येईल, असा दरवाजा, असे गावठी घर, शंभर रुपयात भाड्याने मॅडमने मिळवून दिले होते. ‘सुखसोयी पेक्षा गरजेला’ त्यावेळी फार महत्व होते. उपयोगात येणारी चार भांडी, हे सारं सौ. देशपांडे मॅडमनी उपलब्ध करून दिले होते.
संसाराला आवश्यक असणाऱ्या वस्तूंची, त्यांनी लिहून दिलेली यादी आजही माझ्या डोळ्यासमोर येते. ती अशी- एक स्टीलची परात, दोन डबे, स्टोव्ह, ॲल्युमिनियमचे एकात-एक असे तीन टोप, तूर डाळ- तीन किलो, तांदूळ- पाच किलो, साखर, चहा पावडर, मसाले, मीठ वगैरे… अशा खरेदीतून आमच्या संसाराला सुरुवात झाली होती. दादर ते वसई व वसई ते फादरवाडी असा आयुष्य प्रवास आमचा सुरू झाला होता.
त्यावेळी यांचे (माझे पती महेंद्र) एस.वाय.बी.कॉम.चे वर्ष संपत आले होते. वयाने लहान असूनही, मी यांना ‘अहो’ असेच म्हणत असे. मला मिळालेले संस्कार, माझ्या आई-वडिलांची महती होती.
ट्रेनच्या चेंगराचेंगरीचा अनुभव, आम्ही प्रथमच घेत होतो. प्रवासाने चांगली दमछाक होत होती. घरी पोहोचल्यावर डाळ-भात व एखादी सोपी भाजी, हा आमचा रोजचा आहार झाला होता.
लग्नानंतर दोन-तीन दिवसात, ‘हे’ त्यांच्या घरी गेले होते. केलेल्या कृत्याला माफी मिळेल व आम्हा दोघांना घरात प्रवेश मिळेल ! अशी आशा होती. पण व्यर्थ ! सासूबाईंनी तर ‘न’ चा पाढा गिरवला होता व त्याची शिक्षा म्हणून काहीसे धपाटेही यांना सासू कडून मिळाले होते. पण यांनी सुद्धा आपला हट्ट न सोडता, काही दिवसांनी मलाही अॅन्टॉप हिलच्या घरी घेऊन गेले होते. पण सुनेचे स्वागत न होता, सासूबाईंनी मौन धारण केले होते. कडक शब्दात आम्हाला उत्तर मिळाले होते, “तुजा तू बग, माजा मी बगीन.” झालं ! आता मात्र स्वता:च्या हिमतीवर उभे राहून, स्वतःचे घर थाटणे हा पर्याय आम्ही मनी पक्का केला.
“मुलीचे माहेर प्रत्येक मुलीला शेवटी मोठा आधार असतो.” महिन्याभरातच माझा भाचा मला भेटण्यासाठी माझ्या कार्यालयात (प्रभादेवी एक्स्चेंज) येथे आला होता.(त्यात सुद्धा एक हेतू लपलेला होता.) सगळी विचारपूस करून “मी लवकरच तुझ्या घरी वसईला येतो.” असे सांगून त्याने निरोप घेतला होता. त्याच्याशी बोलून माहेरचे भेटल्यासारखे वाटले होते. मनावरचे थोडेसे ओझे कमी झाल्यासारखं वाटलं होतं.
बहिणीचाही निरोप मिळाला होता, की एकदा माझ्याकडे येऊन जा. माझी माणसं मला परत मिळाल्याचा आनंद झाला होता. तिच्या घरी गेल्यावर, आई-बाबांची खुशाली मिळाली होती. मी निघून गेल्यानंतर, ‘आईने अंथरूण धरले होते.’ हे ऐकून, आम्हा दोघांना अपराधीपणाची जाणीव झाली होती. जिने मला लहानाची मोठी करताना, तळहातावरच्या फोडा प्रमाणे जपले, तिचा मी विश्वासघात केला होता. पश्चातापाची लाज काळजाला भिडली होती.
“नवा संसार नवे आयुष्य!” फार खडतर असते.मित्रांनो ! रोजच्या प्रवासाने माझी प्रकृती कृश होत होती. त्यावेळी माझा पगार जेमतेम बाराशे रुपये पर्यंत येत असे. त्यामुळे चैन-विलासाचे आयुष्य जगणे कठीण होते. त्यांची परीक्षा तोंडावर आली होती. परीक्षा संपली, की तेही कुठे मिळेल तिथे, पार्ट- टाइम जॉब करणार होते. कारण आमच्या समोर पैसे जमा करणे, हे मोठे उद्दिष्ट होते.
“पिल्लू अवकाशात कितीही उंच उडाले, तरी घारीची नजर आपल्या पिल्लांवरच असते.” आईच्या सांगण्यावरून माझ्या बहिणीने, भाच्याला माझ्याकडे वसईला धाडले होते. (आता तो ह्या जगात नाही.) पहिल्यांदाच, आमच्या घरी आलेला पहिला पाहुणा ! खूप आनंद झाला होता. त्याच्यासाठी चिकन व भात केला होता. मजेची गोष्ट म्हणजे, मी चिकन हा प्रकार पहिल्यांदाच केला होता. नेमकं ते चिकन कच्चे राहिले होते. पाहुण्याच्या निमित्ताने स्वयंपाकाचा पहिला धडा मी शिकले होते.
काही महिन्यातच, आमच्या प्रेमाचे प्रतीक, माझ्या उदरात वाढत आहे, याची चाहूल मला लागली होती. बहिणीला ही बातमी कळताच तिने, आम्हाला तिच्या घरी येऊन राहण्यास सांगितले. ह्या अवघडल्या स्थितीत, माझी प्रकृती पाहता, रेल्वे प्रवास मला झेपणार नव्हता. त्यामुळे शेवटी एकमती निर्णय आम्ही दोघांनी मिळून घेतला.
एप्रिल १९८८ मध्ये, माझ्या बहिणीकडे आम्ही राहायला आलो. मायेच्या सावलीत विसावल्याचा आनंद मिळाला होता. नव्या आयुष्याला नवी पालवी फुटली. कार्यालय पर्यंतचा प्रवास तसा कमी झाला होता. ‘ह्यांची’ परीक्षाही उरकली होती. बहिणीची तीन मुले, तिचे पती व आम्ही दोघं. कुटुंब वाढलं होतं. त्यात भावोजींची कंपनी बंद पडली होती. तीन मुले तशी लहानच. मग बहिणीनेही, मोजे कंपनीत काम सुरू केले होते. कसाबसा महिना जात असे, पण शेवटच्या आठवड्यात पैशाची खूप ओढाताण होत असे. तेव्हा “हे” मनाला मुरुड घालून, जवळच्या मित्राकडून शंभर- दोनशे रुपये उसणे आणत असत. कारण कधी-कधी कामावर जाण्यासाठी, बसच्या तिकिटासाठी सुद्धा आमच्यापाशी पैसे शिल्लक नसत. घरातही मुलांच्या खाण्याची ओढाताण होत असे. गरीबी काय असते ? ते मला तांदुळाची पेज करून खाताना, चांगले कळले होते.
माझ्या गरोदर पणाचे सात महिने उलटून गेले होते, आणि अचानक आमच्यावर, संकटाचा एक नवीन डोंगर कोसळला होता. दिवसेंदिवस यांची पोटदुखी वाढू लागली होती. अनेक उपचार करूनही बरे वाटत नव्हते. काही दिवसातच त्यांच्या पोटाला सूज आली होती. मग मात्र कसलाही विचार न करता फंडातून, व्याजाने पैसे घेतले व त्यांना शारदाश्रम येथे, “देसाई हॉस्पिटल” नामक खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी नगरातील त्यांच्या जवळील, मित्रांनी पैसे गोळा करून, मला दिले होते. तसेच ह्यांच्या विनायक मामाने आठशे रुपये व वसंत मामाने हजार रुपये पाठविले होते. ही मदत म्हणजे माझ्या पतीला मिळालेले जीवनदान ठरले होते. देवाने प्रसन्न होऊन दिलेला जणू प्रसाद होता.
पावसाचे दिवस होते. आज हे औषध, तर उद्या दुसरे. इस्पितळ ते घर, माझ्या फेऱ्या पळतच होत असत. माझ्या पोटात बाळ आहे ह्याचेही मला भान राहिले नव्हते. “देव तारी त्याला कोण मारी !” त्याचीच कृपा.
डॉ. कागल, जणू आम्हाला देवच भेटला होता ! डॉक्टरांनी केलेली मदत मला आजही आठवते. आमची कहाणी ऐकल्यानंतर व माझी अवस्था पाहून, इस्पितळ बिल त्यांनी कमी करून, दहा हजारावर आणले. माझ्या पतीची, ऑपरेशन करताना घेतलेली काळजी, कौतुकास्पद होती. शिवाय माझ्या कार्यालयीन मैत्रिणींनी दिलेली धीराची साथ, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात आठवणीत राहील. त्यावेळी ही बिलाची रक्कम आमच्यासाठी खूप मोठी होती.
माझी प्रसूती जवळ आली होती. ४ डिसेंबर १९८८ हा दिवस उजाडला. प्रसूतीनंतर “स्त्रीचा पुनर्जन्म होतो.” असे म्हणतात, ते मला यावेळी कळले होते. गोंडस कन्या रत्नाच्या आगमनाने आम्हाला खूप आनंद झाला. बाबाचे वय होते बावीस व आईचे वय होते पंचवीस.
तीन दिवसात वाडीया इस्पितळातून मला घरी सोडणार होते. प्रसूतीनंतरचे औषध- गोळ्या मला हवी होती. अशा वेळेस नेमके आमच्या गाठीला काही शिल्लक नव्हती. नर्स पूर्ण एक दिवस विचारून वैतागली होती. पण मला औषधे काही मिळाली नव्हती. पैशांची सोय व्हावी म्हणून, मी ह्यांना वंदना सावंत, नावाच्या माझ्या मैत्रिणीस भेटायला सांगितले होते. तिच्या घरी ‘हे’ भेटले. पण पैसे मागण्यास त्यांचे मन काही धजावले नाही. शेवटी लग्नात केलेले, एका सरीचे एक तोळ्याचे मंगळसूत्र, सोनाराकडे गहाण ठेवले व तीन हजार रुपयांची सोय केली. त्यानंतर माझी रवानगी घरी झाली. “पहिली बेटी धनाची पेटी”. असे म्हणतात ! कदाचित लक्ष्मीच्या पावलांची चाहूल माझ्या संसाराला मिळाली होती.
“आई ही अखंडित माया असते.” राग रोष विसरून, मला व माझ्या मुलीस, पाहण्यासाठी ती घरी आली. मला मिळालेले क्षमस्वचे दान होते. घडलेल्या प्रसंगाला मागे टाकून पुढे जाण्यासाठी, आम्हाला मिळालेला, तिचा तो आशीर्वाद होता.
अगदी हलक्या फुलक्या सोहळ्यात मुलीचं बारसं झालं होतं. माझी आई त्या दिवशी उत्साहात दिसत होती. असे म्हणतात “नवीन बाळाच्या येण्याने दुरावलेली दरी जोडली जाते.” माझी आई मला मिळाली होती. माझ्या संसाराची सोबतीण “परात” खणा- नारळानी भरून गेली होती. माझ्या संसाराची सोबतीण “परात” खूप खुश वाटत होती. आजही माझी “परात” माझ्या वैभवशाली घरात, मला आनंदात सोबत देत आहे.

– लेखन : सौ.वर्षा महेंद्र भाबल.
– संपादन : अलका भुजबळ. 9869484800.
दोन्ही घरच्या मंडळींच्या विरोधात जाऊन प्रेम विवाह केल्यामुळे आप्त स्वकियांचा रोष पत्कारावा लागला. आलेल्या संकटावर मात करून आपण आपला संसार फुलवीला. त्याबद्दल तुम्हा दोघां उभयतांना सलाम. आपल्या हलाकीच्या परिस्थितीत सिनियर्स, मित्र, मैत्रिणी, यांनी मोलाचे सहकार्य केले त्यांचे आभार. वर्षा भाबल यांनी त्यांच्या जीवन प्रवासाचे वर्णन इतक्या सुंदर पद्धतीने लिहिले आहे की जणू काही आपल्या डोळ्यांसमोर घटना घडत आहेत असे वाटते.
🙏धन्यवाद
दृश्य डोळ्या समोर अगदी उभ राहील.