सुमारे १६४ वर्षांपूर्वी संपादन करून प्रकाशित केलेल्या मराठी-इंग्रजी शब्दकोशाचे संपादक जेम्स थॉमस मोल्सवर्थ यांची १५० पुण्यतिथी नुकतीच, १३ जुलै रोजी झाली.
त्यानिमित्ताने पुणे येथील विश्वकर्मा विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विभागाने मोल्सवर्थ यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देणाऱ्या एका अभिनव पुस्तिकेचे प्रकाशन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
विश्वकर्मा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्राध्यापक डॉ किरण ठाकूर यांनी संशोधन करून लिहिलेली ही ८४ पानी पुस्तिका मराठी आणि इंग्रजी मध्ये उपलब्ध आहे. विश्वकर्मा प्रकाशनाने पीडीएफ फॉरमॅट मध्ये विनामूल्य डाउनलोड करता येईल. त्यासाठी http://vuccd.com/james-thomas-molesworth-marathi-english-dictionary-project/ ही लिंक दिलेली आहे.
अल्प परिचय
ईस्ट इंडिया कंपनीत नोकरी साठी मोल्सवर्थ वयाच्या सोळाव्या वर्षी भारतात आले तेव्हा त्यांना मराठी भाषेचा गंध देखील नव्हता. ती शिकून महाराष्ट्रातील सहा- सात शास्त्री पंडितांच्या मदतीनं साठ हजार मराठी शब्दांचा कोष त्यांनी संग्रहित आणि संपादित करून १८५७ मध्ये प्रकाशित केला. आता पर्यंत या कोशाच्या दोन सुधारित आणि दहा पुनर्मुद्रित आवृत्या प्रसिद्ध झाल्या आहेत. दुसरी सुधारित आवृत्ती शुभदा सारस्वत प्रकाशनाचे श्री शरद गोगटे यांनी १९७५ मध्ये पुण्याला प्रकाशित केल्या आहेत. आता निराली प्रकाशन वितरक आहेत.
मोल्सवर्थ यांचे आयुष्य आणि त्यांच्या शब्दकोशाची कहाणी मोठी रंजक आहे. सोलापूर, आजारपणामुळे पुणे, बाणकोट किल्ला, मुंबई, दापोली, महाबळेश्वर आणि गुजरात मधले खेडा अशा ठिकाणी मुक्काम करत करत त्यांनी हा कोश पूर्ण केला.
मोल्सवर्थ शास्त्रींना किती अडचणी आल्या असतील याची कल्पना आता करता येत नाही. पुस्तिकेत त्यांच्या योगदानाचे यथार्थ चित्रण केले आहे. ही पुस्तिका प्रकाशित करून डॉ किरण ठाकूर यांनी मोठेच कार्य केले आहे.
मोल्सवर्थ यांचे रेखाचित्र : प्रकाश जोशी
– देवेंद्र भुजबळ. 9869484800
नमस्कार! मोल्सवर्थ यांच्या मराठी-इंग्लीश शब्दकोश लिंकची माहिती मिळाली. धन्यवाद सर! मराठी शब्दांचा संग्रह मिळवण्यासाठी मोल्सवर्थ, (ज्या ठिकाणांची नावे तुम्ही दिलीत,त्या नावांवरून त्यांना आलेल्या अडचणी लक्षात येतात.) यांचे अगदी समर्पक मोजक्या शब्दातील ओळखवर्णन,तुमच्या लेखात नेहमीच उमजते. उपयुक्त व नेहमीच लागणारा शब्दकोश आमच्या पर्यंत पोहचला. धन्यवाद! डॉ. ठाकूर. धन्यवाद! भुजबळ सर.