Wednesday, December 3, 2025
Homeलेखज्ञानेश्वर माऊलींचे परमभक्त : अण्णासाहेब देशमुख

ज्ञानेश्वर माऊलींचे परमभक्त : अण्णासाहेब देशमुख

आषाढी एकादशीनिमित्त विशेष लेख

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे परमभक्त नगर शहरातील हभप मधुकर उर्फ अण्णासाहेब देशमुख. भक्तीचा परमोच्च आनंद घेताना वारी आणि वारकरी सेवेत अण्णासाहेब समरस झाले. आषाढी वारीसाठी पायी निघालेले वारकरी नगर शहरात आले की चहापान, अल्पोपहार, भोजन आणि मुक्कामासाठी दादा चौधरी विद्यालयाजवळील हिमगिरी बंगल्यात पोहोचत. वारकरी न चुकता येथे येत राहिला ते अण्णासाहेबांच्या आपलेपणामुळेच !

अण्णासाहेबांचे कुलदैवत अष्टविनायकामधील मोरगांवचा मयुरेश्वर. अण्णासाहेबांचे वडिल बापूसाहेब यांनी खडीसाखरेच्या चतुर्थीचे व्रत केले. तीच श्रध्दा अण्णासाहेबांच्या अंतरी रूजली. बापूसाहेब देशमुख यांना उत्तर हिंदुस्थानमधील स्वामी प्रकाशानंद यांचा कृपाशिर्वाद नगरमध्ये लाभला. तर आळंदीच्या कन्हैय्या आश्रमामधील आनंदाश्रम स्वामींच्या सान्निध्यात अण्णासाहेबांना साधना करण्याचे भाग्य लाभले. त्यामुळे देशमुख घराण्यात गणेशभक्ती व विठ्ठलभक्तीचा अनोखा संगमच झाला. वारकरी हेच जीवन असे मानून वारकरी सेवेत जीवनभर कार्यरत राहिलेले अण्णासाहेब वारीतील आनंद मिळवत अनेकांना देत राहिले.

संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी असलेल्या आळंदी येथे अण्णासाहेबांनी पहिले प्रवचन करतानाच माऊलींचा समाधी सोहळा श्रोत्यांच्या डोळ्यांसमोर उभा केला. तो पाहून आनंदाश्रम स्वामींच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या इतके ते प्रभावी झाले होते. त्यानंतर अण्णासाहेबांची महाराष्ट्रभर प्रवचने झाली. ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती झालेल्या नेवासा येथील पैस खांब मंदिरातही त्यांनी प्रवचनसेवा केली. प्रवचनांसाठी स्वखर्चाने प्रवास करायचे.

स्वामी आनंदाश्रम

दर एकादशीला सद् गुरू आनंदाश्रम स्वामींपुढे उभे राहून किर्तन सेवा करत असत. ज्येष्ठ वद्य एकादशी, व्दादशी आणि त्रयोदशीला सासवड-जेजुरी मार्गावरील खळद या गावात वारकरी बंधू-भगिनींना दिवस-रात्र अन्नदान करण्याची सेवा अण्णासाहेब करत. शिवाय माऊलींच्या समाधी सोहळ्यास आळंदीत, तुकारामबीजेला देहूमध्ये आणि नाथषष्ठीला पैठणमध्ये अण्णासाहेबांचे अन्नछत्र चाले. लखमापूरमधील गेंदालाल महाराज पालखी सोहळ्यास २८ वर्षे, डोंगरगणच्या जंगलेशास्त्री पालखी सोहळ्यास २६ वर्षे आणि ताहराबादच्या संत महिपती महाराज दिंडी सोहळ्यास १५ वर्षे अन्नदान करण्याची सेवा अण्णासाहेबांनी निरपेक्षपणे केली.

आनंदाश्रम स्वामींच्या आज्ञेवरून अण्णासाहेबांनी पसायदानावर सविस्तर निरूपण केले. या पुस्तकास मोठा प्रतिसाद मिळाला. आवृत्तीमागे आवृत्ती काढाव्या लागल्या. आळंदीतील माऊलींच्या ग्रंथविक्री दालनात गेले एक तप हे पुस्तक वितरण सुरूच आहे. पसायदानाच्या प्रचार व प्रसाराचे कार्य अण्णासाहेबांनी जीवनभर केले. ज्ञानेश्वर माऊलींचा कर्मयोग व गीतेतील १८ व्या अध्यायातील ७८ व्या श्लोकावरचे निरूपण ही अण्णासाहेबांची पुस्तके लोकप्रिय झाली.

आनंदाश्रम स्वामींनी प्रसाद म्हणून दिलेली तुळशीची माळ अण्णासाहेबांच्या गळ्यात अखेरच्या श्वासापर्यत होती. घरातील देवघरामध्ये आनंदाश्रम स्वामींच्या पायामधील पादुकाही आहेत. ज्ञानोबा, तुकोबा, आनंदाश्रम स्वामी आणि पांडुरंग यांनी अण्णासाहेबांना दिलेल्या अनेकविध अनुभूती निळकंठराव देशमुख यांच्याकडून श्रवण करताना देहभान हरपते.

अण्णासाहेबांचे वडिल चिंतामण तथा बापूसाहेब देशमुख यांनी १९१४ साली नगर शहरातील सराफ बाजारात मे.चिंतामण रामचंद्र देशमुख अॅण्ड सन्स नावाची सुरू केलेली सराफी पेढी आजही विश्वासाचं नातं जपत जोमात चालते आहे. अण्णासाहेबांचे सुपुत्र निळकंठ, मुकुंद, अनंत तसेच नातू दिनेश व मयुरेश हे या सराफी पेढीचा कार्यभार घेतला वसा म्हणून जतन करत आहेत.

अण्णासाहेबांनी २५ वर्षे अंबिका आईस फॅक्टरीही चालवली. दररोज ३६ हजार किलो बर्फाचे ते उत्पादन करत होते. साड्या विणण्याचे काम करत असलेल्या कारागिरांना सुत उपलब्ध करून देण्यासाठी अण्णासाहेबांनी ७-८ वर्षे काॅटन यार्न चालवले.
गृहस्थाश्रमाच्या यशस्वीतेनंतर त्यांनी आपले जीवन अध्यात्मासाठी समर्पण केले. वेगळेपणाचे ठसे उमटवत उभ्या केलेल्या आदर्शामुळे अनेक संस्थांनी त्यांनी पुरस्काराने गौरविले. अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या नगर जिल्हा शाखेने जीवन गौरव पुरस्कार देऊन अण्णासाहेबांना सन्मानित केले होते.

वयाच्या ९२ व्या वर्षी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला ११ एप्रिल २०२१ रोजी ते विठ्ठलरूपात विलीन झाले. योग सुखाचे सोहळे ही माऊलींची ओवी नित्य अनुभवलेल्या अण्णासाहेबांचा आदर्श समोर ठेवून जीवन कृतार्थ करू या.

मिलिंद चवडकें

– लेखन : मिलिंद चवंडके
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments