नवी मुंबई : आपआपल्या समस्यांसाठी विविध ज्येष्ठ नागरिक संघ विविध प्रकारचे उपक्रम आयोजित करीत असतात, ही स्वागतार्ह बाब आहे. पण या उपक्रमांना जोडून ज्येष्ठ नागरिक संघांनी वाचक मंडळ सुरू केले तर राज्यातील वाचन चळवळीला मोठी बळकटी मिळेल आणि ज्येष्ठ नागरिकांना एक बौद्धिक व्यासपीठ उपलब्ध होईल, असे प्रतिपादन न्यूज स्टोरी टुडे चे संपादक तथा निवृत्त माहिती संचालक श्री. देवेंद्र भुजबळ यांनी केले. ते सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाने नुकत्याच आयोजित केलेल्या आनंद मेळाव्यात आणि गुणगौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

श्री. भुजबळ पुढे म्हणाले की, आजच्या घडीला महाराष्ट्रात ११०० ज्येष्ठ नागरिक संघ असून, या सर्व संघांची सदस्य संख्या जवळपास १८ लाख इतकी असल्याने यावरून ज्येष्ठ नागरिकांची शक्ति किती मोठी आहे, याची कल्पना येते. सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाची पूर्णपणे नवीन असलेली कार्यकारिणी अध्यक्ष श्री. मारुती विश्वासराव यांच्या नेतृत्वाखाली एक दिलाने अभिनव उपक्रम राबवित असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
संघाचे अध्यक्ष श्री. मारुती विश्वासराव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, शासनाच्या नागरिकांसाठी असलेल्या योजना, सवलती, कायदे, नियम याबद्दल संघ कार्यालयात लवकरच एक कार्यशाळा घेत आहे. कार्यकारिणी जरी स्वतःहून काही उपक्रम आयोजित करीत असते, तरी सर्व सदस्यांनी त्यांच्या काही कल्पना असल्यास, संघाकडून काही अपेक्षा असल्यास त्या अवश्य सुचवाव्यात असे आवाहनही केले.

संघाचे सचिव श्री. जगदीश एकावडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये संघाच्या कार्याचा आढावा घेतला.
या आनंद मेळ्यात ऑगस्ट महिन्यात असलेल्या ७० सदस्यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. त्याचबरोबर विष्णुदास नाट्यगृहात झालेल्या “खेळ खेळूया मंगळागौरीचा” या स्पर्धेत सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिला ग्रुपला प्रथम पारितोषिक तसेच लोकसत्ता मंगळागौर स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांचा संघाच्यावतीने गुणगौरव करून सत्कार करण्यात आला.

माध्यम प्रतिसाद
ज्येष्ठ नागरिक संघांनी वाचक मंडळ सुरू करावे, ही कल्पना विविध वृत्तपत्रांनी, पोर्टलनी उचलून धरली आहे.
काही वृत्तपत्रांची वृत्ते पुढे देत आहे.



काही जेष्ठ नागरिक संघांनी असे काही उपक्रम सुरू केल्यास त्यांना या वेब पोर्टलवर ठळकपणे प्रसिद्धी देण्यात येईल.
— टीम एन एस टी. ☎️ +919869484800
