प्रवास दूरचा असो की जवळचा, त्याच्या आठवणी मात्र मनाला प्रफुल्लित करुन जातात. बालपणी बैल गाडीतून केलेला प्रवास आज ही मनाला सुखावून जातो. पण आजच्या प्रगत दळणवळणाच्या युगात वेगाने धावणाऱ्या अत्याधुनिक सुविधा सुलभ झाल्याने प्रवासाची मजा द्विगुणित झाली आहे. विरंगुळा, छंद, मौजमस्ती, आवड याची छान सांगड घालता येते.
प्रवास हा केवळ प्रवास नसतो, तो एक अनुभव असतो. निसर्ग रम्य ठिकाणं आपल्याला सदैव खुणावित असतात. तर तीर्थक्षेत्रांची ओढ मात्र न्यारीच असते. वैविध्याने नटलेल्या या भारतीय संस्कृतीत तीर्थक्षेत्रांना अनन्यसाधारण महत्व आहे.ही तीर्थक्षेत्र अतिशय प्राचीन असून त्यांना एक इतिहास आणि भूगोल ही आहे.
आम्ही काही मैत्रीणी मिळून उज्जैन, ओंकारेश्वर, महेश्वर आणि इंदौर या मध्य प्रदेशातील ऐतिहासिक स्थळांना नुकत्याच भेटी दिल्या. हा संपूर्ण अनुभव बरंच काही देऊन आणि शिकवून गेला. उज्जैन मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी ! शिवाय शिक्षण, संशोधन, मनोरंजन आणि औद्योगिक दृष्ट्या सधन आणि प्राचीन शहर मानले जाते. क्षिप्रा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर, भौगोलिक आणि खगोलशास्त्रीय दृष्टीनेही विशेष महत्त्वाचे आहे.
उज्जैन “महाकाल की नगरी” या नावाने ही ओळखली जाते. प्राचीन काळात “अवंती नगर” अशी ही तिची ओळख आहे. राजकुमारी अवंतिका या नावावरुन तिला अवंतीनगर म्हंटले जात असे. राजा विक्रमादित्याचे हे नगर होते असे ही इतिहास सांगतो. मंगल ग्रहाच्या उत्पत्तीचे हे ठिकाण असल्याचे मत्स्य पुराणात उल्लेख असून सांदिपनी आश्रमाच्या बाजूलाच त्याचे मंदीर ही उभे आहे. महर्षि सांदिपनी ऋषींचा आश्रम ही तेथे स्थित आहे. त्या आश्रमात पाऊल ठेवताच श्रीकृष्णाच्या बाललिलांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. बलराम,कृष्ण आणि सुदामा या तिघांनी महर्षि सांदिपनी यांच्याकडून घेतलेले शाश्वत ज्ञान आजही आपल्याला भूरळ घालते. राजा असो अथवा रंक असो, गुरुकुलात सारे समान असतात. आश्रमाचे नियम सर्वांना पाळावे लागतात. प्रत्येक शिष्याला जंगलात जाऊन लाकडे फोडून आणणे, जमीन सारवणे, पाणी भरणे ही कामे करावी लागत.
कृष्ण सुदामा यांची अमर मैत्री इथेच रुजली. दोघे ही एके दिवशी लाकडे आणण्यासाठी जंगलात जातात. जातांना गुरुमातेने भूक लागली तर दोघे ही मिळून खा ! म्हणून भाजलेले चणे दिलेले असतात. थंडीचे दिवस असतात, दोघांनाही भूक लागते. दोघे वेगवेगळ्या झाडावर चढून फांद्या तोडत असतात. चण्याची पुरचुंडी सुदामा जवळ असते. भूकेपोटी तो चणे तोंडात टाकत असतो. कृष्णालाही भूक लागलेली असते. तो सुदामाला विचारतो, अरे सुदामा ! कशाचा आवाज येतोय ? सुदामा म्हणतो, अरे ! थंडीने माझे दात कडकड वाजत आहेत ! कृष्ण समजायचे ते समजतो.सुदामा ज्ञानाने प्रख्यात पंडीत, विद्वान म्हणून नावारुपाला येतो परंतु शेवटपर्यंत दरिद्री नारायण म्हणूनच राहतो. हा प्रसंग बोध घेण्यासारखा आहे. त्या आश्रमात पाऊल ठेवताच या कथांना उजाळा मिळाला.

उज्जैनमध्ये अशी एक वंदता आहे, की आधी श्री कालभैरव मंदिराचे दर्शन घेऊन मगच महाकालेश्वराचे दर्शन घ्यावे. देव दानवांचा संघर्ष तसा पुरातन आहे. हा संघर्ष आज ही संपलेला नाही. महाकाल, कालभैरव अशा अनेक असुरांचा गट ऋषीमुनींना त्रास देत होता तेव्हा ऋषी मुनींनी भगवान शंकराला साकडे घातले तेव्हा भगवान शंकराने त्यांचा नि:पात केला. अशी आख्यायिका सांगितली जाते की, महाकालने श्री शंकराला पिंडीत स्थान देण्याची विनंती केली.भगवान शंकराने एक अट घातली, “तुला माझ्यात सामावून घेईन, पण दररोज नुकत्याच अग्नी दिलेल्या नराचे भस्म आणून भस्मारती करावी लागेल.” तेव्हा पासून वैकुंठधाम मधून अघोरी बाबा भस्म आणल्यानंतरच पहाटे चार ते सहापर्यंत ही भस्मारती चालते.
भस्मारतीच्या वेळी साक्षात भगवान शंकर निर्गुण निराकार रुपात असल्याने महिलांना आत प्रवेश दिला जाऊ नये अशी ही वंदता आहे.
प्रसन्न, मंगल मांगल्य, सुरक्षा, शांती आणि उच्च कोटीचे आध्यात्मिक महत्व या स्थानाला आहे. शिवाची ही शाश्वत शक्ती अनुभवण्यासाठी भाविक भक्तांची इथे प्रचंड गर्दी असते. संपूर्ण परिसर पावित्र्य आणि मांगल्याने भारावलेले असते. या मंदिराच्या परिसरात असूरांचे पुतळे उभे करुन एक चैतन्यदायी वातावरण निर्माण केले आहे.
श्री कालभैरव महाकालेश्वर आणि उज्जैन नगरीचा रक्षक या नात्याने त्याकडे पाहिले जाते. क्षिप्रा नदीवरील रामघाट प्रसिध्द असून भाविक भक्त श्रध्देने स्नान करतात.
राम घाटावर होणारी आरती विलोभनीय असते. विशेष म्हणजे संपूर्ण उज्जैन शहरात जितकी मंदीरं आहेत त्यासर्वांची आरती एकाच वेळी सुरु होते. दोन भव्य दीपस्तंभ असून तेलाचे दिवे लावले जातात. ते विलोभनीय दृश्य भाविक आपल्या नेत्रात साठवून घेण्यासाठी गर्दी करतात.

दुसऱ्या दिवशी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म गावी महेश्वरला रवाना झालो. मध्य प्रदेशात खरगोण जिल्ह्यात नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे ऐतिहासिक आणि पवित्र शहर मानले जाते.एका स्त्री शक्तीच्या कर्तृत्वाची झलक इथे पाहायला मिळते. या शहराला स्वतःच एक सौंदर्य लाभले आहे. तसेच ते महेश्वरी साडीसाठी प्रसिध्द आहे.
भगवान शंकराच्या कृपेचा वरदान लेवून आलेली अहिल्याबाईने अठराव्या शतकात जवळ जवळ 67 वर्ष लोकाभिमुख राज्यकारभार केला.तिच्या कर्तृत्वाची झलक तिथे ठायी ठायी पाहावयास मिळते. सामान्य रयतेसाठी नर्मदेच्या किनाऱ्यावर अहिल्याबाईंनी घाट तर बांधलेच पण सुबक कारागिरींनी युक्त अशी कल्पक मंदीरे ही उभी केली. अध्यात्माबरोबरच रयतेच्या हाताला काम मिळावे, कुशल कारागिरी शिकता यावी यासाठी त्या काळात गुजरात मधून कपडे विणणाऱ्या कारागिरांना आणून हातमागावरचे उत्पादन सुरु केले आणि स्थानिकांना रोजगार मिळवून दिला. यातून अहिल्याबाईंना किती दूरदृष्टी होती हेच दिसून येते. आज एकविसाव्या शतकात ही इथे विणलेल्या साड्यांना देशात तर मागणी आहेच परंतु विदेशातही या मालाला प्रचंड उठाव आहे. तिने बांधलेला किल्ला पंच पहाडावर असून तिचे प्रतिबिंब नर्मदेच्या पात्रात पडते. आदि शंकराचार्य आणि पंडीत मंडन मिश्र यांची शास्त्रोक्त चर्चा किंवा खंडणमंडण इथेच झाल्याचे सांगितले जाते.

पुराणातल्या आख्यायिका मोठ्या मजेशीर असतात. त्यांना वास्तवात उतरविण्याचे कार्य या राजेरजवाड्यांनी केल्याचे दिसून येते. सहस्त्र बाहू असणारा राजा राजराजेश्वर यांचे मंदीरही इथेच आहे. या राजा बद्दल असे सांगितले जाते की, याने नर्मदेशी अर्थात नर्मदा नदीशी विवाह करण्याचा संकल्प केला. नर्मदा ही त्याच्याशी विवाह वेदीवर चढण्यास तयार झाली. परंतु तिने राजाला एक अट घातली, “राजा मी तुझ्याशी लग्न करेन, पण तुला माझा प्रवाह उलटा दिशेला प्रवाहित करावा लागेल.” राजा सहज तयार झाला.त्याला सहस्त्र बाहू होते ना ! आणि नर्मदेत उतरुन आपल्या सहस्त्र बाहूंनी तिला अडवून उलट्या दिशेला प्रवाह वळविण्याचा प्रयत्न करु लागला परंतु त्याला ते साध्य झाले नाही. शेवटी ती नर्मदा आहे. अशा त्या सहस्त्रार्जुन राजराजेश्वराचे तिथे मंदीर आहे.

रस्त्यामध्ये एक स्वयंभू गणेश मंदीर आहे. आपण सहसा गणेशाच्या दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी या त्याच्या दोन बायकांना पाहायची सवय आहे. पण इथे मात्र रिद्धी सिद्धी ऐवजी शुभ लाभ ह्या त्याच्या दोन मुलांसह या मंदिरात गणेश बाप्पा विराजमान आहेत.
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग ! बारा ज्योतिर्लिंगांपैकी चवथे ज्योतिर्लिंग अशी ख्याती आहे. मध्य प्रदेशात खंडवा जिल्ह्यात नर्मदा तटावर मंधाता द्विपवर हे ज्योतिर्लिंग स्थित आहे. हे द्विप ओंकाराच्या आकाराचे असून भगवान शिव आणि ममलेश्वर यांच्या रुपात एकवटले आहे. ओंकारेश्वर स्वयंभू असून ममलेश्वर पार्थिव रुपात एकवटले आहेत. ओंकारेश्वर मंदीर म्हणजे वास्तुकलेचा एक उत्कृष्ठ नमुना असून आध्यात्मिक दृष्ट्या महत्वपूर्ण मानले जाते. दोन्ही मंदीराच्यामध्ये नर्मदा वाहत असल्याने त्या ठिकाणाला एक पावित्र्य प्राप्त झाले आहे.
श्री ममलेश्वर नर्मदेच्या दक्षिण तटावर असून 270 फूट लांबीचा एक झुलता पूल असून लोक जा ये तिथूनच करीत असतात. या पुलामुळे तिच्या सौंदर्यात विशेष भर पडली आहे. नर्मदा परिक्रमाला इथूनच सुरुवात होते.
प्रत्येक ज्योतिर्लिंगाला एक विशेष पोराणिक कथा सांगितल्या जातात. तेथील राजा मांधाताने कठोर तपश्चर्या केली होती. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी ज्योतिर्लिंगाच्या रुपात राजाला दर्शन दिले. म्हणून हे शिवलिंग स्वयंभू मानले जाते. राजाला वरदान देताना भगवान शंकराने माझा निवास इथे सदैव असेल असे ही वचन दिले. अशी वदंता आहे की, शंकर पार्वती तिन्ही लोक फिरुन रात्री इथेच निद्रा घेतात ! असे ही म्हटले जाते की, ओंकारेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर ममलेश्वराचे दर्शन घ्यावे तरच पूर्ण ज्योतिर्लिंग दर्शन घेतल्याचे फळ मिळते. कारण शंकराचे पूर्ण अस्तित्व या दोन ही तटावर असल्याने भाविक भक्तांची दोन्ही ठिकाणी गर्दी असते. नर्मदा ही भगवान शंकराची कन्या असून तिने ही आपला प्रवाह सदैव तुझ्या सान्निध्यात असू देत अशी आराधना केल्याने ती अखंडपणे प्रवाहीत असून तिच्या दोन्ही किनाऱ्यावर ही मंदीरे आहेत.
मध्यप्रदेशची वाणिज्य आणि औद्योगिक राजधानी असलेल्या इंदौर नगरीत आलो. माळवा पठारावर स्थित असे हे शहर स्वच्छ, प्रसिद्ध आणि ऐतिहासिक शहर म्हणून ख्यातनाम आहे. अहिल्याबाई होळकरांची कर्मभूमी ! अथक, अविरत प्रयत्नातूनच एखादे राज्य, संस्थान भव्यदिव्य रुपात उभे राहू शकते, हे पदोपदी जाणवते. सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर स्थित हे शहर आपल्या जिवंत खानपान साठी प्रसिद्ध आहे. प्रथम आमचे पाय तिकडेच वळले, यात शंकाच नाही.

ऐतिहासिक वास्तुकला आणि आधुनिक जीवन शैलीचे एक सुंदर, अनोखे मिलन इथे पाहावयास मिळते. पॅलेस, लालबाग, सराफा बाजार, केंद्रीय संग्रहालय, पातालपानी झरना, अन्नपूर्णा मंदीर, वन्यजीव अभयारण्य,छपन्न भोग असे वैविध्याने नटलेले हे शहर आहे.दाल बाफला, जलेबी, भुट्टे का कीस, कचोरी, खोपरा पॅटीस, पाणीपुरी, मालपुवा, गराडू हे खाऊ गल्लीतले फेमस पदार्थ !
संत ज्ञानदेव आपल्या हरिपाठात म्हणतात.
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी
तेणे मुक्ती चारी साधियेल्या
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा
पुण्याची गणना कोण करी…..
संसाराच्या धबडग्यात पिचून गेलेल्या माणसाला संत ज्ञानदेव क्षणभरासाठी का असेना देवाच्या दारी थांब ! त्याच्या चरणांवर नतमस्तक हो ! तुझ्या मनाला शांती मिळेल ! मुखाने हरिनामाचा जप केल्यास जे काही पुण्य पदरी पडेल त्याची गीणतीच करता येणार नाही, हे ही बजावून सांगतात. किती अर्थपूर्ण आहेत. या ओळी ! प्रत्येक माणसाला माहित आहे देव देवळात, मूर्तीत, तीर्थक्षेत्री किंवा मंदिरात ही नाही. तो आपल्यात, माणसात आहे तरी किती ही गर्दी असो, देव कोसो मैल दूर असो, बर्फाच्छादित डोंगरात लपलेला असो किंवा गुहेत, दरीत जिथे कुठे असेल तिथे त्याचा मागोवा घेत त्याच्या चरणी लीन होण्यास जातच असतो. गर्दीत नीट दर्शन होणार नाही, फसवाफसवी होते, मनासारखी पूजा ही करता येत नाही आणि करायचीच म्हंटले तर मधले जे दलाल पूर्वापार चालत आलेले आहेत, आजही त्यांच्या मार्फतच जावे लागते. आपली लूट होते आहे हे ही त्याला कळत असते तरी ही तो तिथे जातो .नतमस्तक होतो. पूर्वीही देव श्रीमंतांचा, पैसेवाल्यांचा, मोठमोठ्या वरिष्ठांचा होता, आज ही तो त्यांचाच आहे. तरी ही सामान्य जीव भक्तीपोटी, श्रध्देपोटी जातच असतो. पोटाला चिमटा घेऊन चार पैसे मागे टाकतो आणि गावातल्या लोकांसोबत, जसं असेल तसे आनंदाने स्वीकारुन तीर्थयात्रा करीत असतो. त्याची कुठली ही तक्रार नसते.
ना तो देवा बरोबर भांडतो ना ग्रुप लिडरशी ! जिथे जागा मिळेल तिथे बसून समोर येईल तो प्रसाद मानून समाधानाने चार घास खातो आणि पुढच्या प्रवासाला निघतो.
मनात प्रश्न येतो, खरंच ! माणसाला फक्त देवदर्शन हवं असतं का ? देव दर्शनाने त्याच्या सगळ्या चिंता, विवंचना मिटणार असतात का ? त्याची संकटं दूर होणार असतात का ? चिंता, विवंचना, संकटे दूर होतील किंवा नाही हे त्यालाही माहित नसते. पण त्याला हे माहित असते की देव दर्शनाच्या निमित्ताने थोड्या काळासाठी का असेना मला यापासून सुटका मिळणार आहे. चार माणसांच्या संगतीत मला मिळालेला आनंद गप्पागोष्टी, मनसोक्त फिरणं, वेगळा प्रदेश, तिथली माणसं, त्यांची भाषा, संस्कृती, खानपान, मनुष्य स्वभाव, पेहराव, निसर्ग सौंदर्य, देवादिकांच्या गोष्टी, किती समृध्द अनुभव असतो नाही का ? मला वाटतं यासाठी माणूस कदाचित भटकंती करीत असावा ! हे सारं अनुभवण्यासाठी आपल्याकडे फक्त दृष्टी
असावी लागते. अशांनाच एखाद्याच्या डोळ्यातलं खरं कारुण्य नजरेस पडत असते.
माणसाला नेमकं काय हवं असतं ? याचं कोडं अद्याप सुटलेलं नाहीय पण सुख, शांती, समाधान आणि प्रज्ञा हवी असते. प्रज्ञेतच मुक्ती दडलेली आहे. म्हणून माणसाचा हा शोध अविरत चालू आहे.

— लेखन : डॉ. प्रभा वाडकर. लातूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
