Tuesday, February 17, 2026
Homeयशकथाझेप :12

झेप :12

“अनिल शाह”

मी 1982- 83 साली नगर येथे असताना, कॉलेज करून दैनिक समाचार साठी उपसंपादक कम वार्ताहर म्हणुन काम करायचो. त्यामुळे विविध कार्यक्रमांना, पत्रकार परिषदांना हजर राहण्याची संधी मला मिळत असे. बरेचसे पत्रकार आणि काही मोजकेच छायाचित्रकारही साहजिकच अशा वेळी उपस्थित राहात असत. त्या छायाचित्रकारांपैकी एक म्हणजे अनिल शाह हा होय. कदाचित समवयस्क असल्याने म्हणा किंवा कुणाशी मैत्री जुळायला काही कारण लागतेच असे नाही, त्यामुळे म्हणा, आमची तेव्हा जुळलेली मैत्री आजतागायत कायम आहे. अतिशय गोरापान, कुरळे केस, स्मार्ट, बॅडमिंटन खेळाडू असलेल्या अनिलचे वैशिष्टय़ म्हणजे, त्याच्या घरात छायाचित्रणाचा वारसा लाभलेला असतानाही त्याने स्वतःची कल्पकता, धाडसी वृत्ती, अष्टावधानी राहुन केलेली आणि करीत असलेली वृत्तपत्र छायाचित्रकारिता त्याला विविध स्पर्धांमध्ये पहिल्या क्रमांकाचे 27 पुरस्कार मिळवून गेली. मान सन्मान किती झाले, याची तर काही मोजदादच नाही.

पत्रकारितेतील एक पुरस्कार स्विकारताना…

अनिलला छायाचित्रणाचा वारसा लाभला तो त्याचे आजोबा गुलाबचंदजी शाह यांच्याकडून. ते नगरचे सर्वांत जुने जाणते, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार होते. १९२० मध्ये त्यांनी छायाचित्रणाला सुरुवात केली. उद्यम मासिकात त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध होत असत. पंडित जवाहरलाल नेहरू नगर येथे १९३७ मध्ये आले असताना जाहीर सभेतील त्यांच्या भाषणाचे छायाचित्र प्लेट कॅमेरा एक्सपोज पद्धतीने काढून ते सभा संपण्याच्या आत त्यांनी पंडितजींना व्यासपीठावर नेऊन दिले. ते पाहून पंडितजींनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारून छायाचित्राचा मागे सही करून ते परत दिले.
अवतार मेहेरबाबा यांची गुलाबचंदजीनी काढलेली छायाचित्रे देश विदेशात अनेक घरांत आजही मोठ्या श्रद्धेने विराजमान आहेत.

गुलाबचंदजी हे केवळ उत्कृष्ट छायाचित्रकारच नव्हते तर प्रखर देशभक्त होते. स्वातंत्र्यवीर सावरकर नगर येथे आले असताना, त्यांची छायाचित्रे गुलाबचंदजी आणि त्यांचे पुत्र तथा अनिलचे वडील विनोद शाह यांनी काढली होती. ती वृत्तपत्रात प्रसिद्धही झाली. पोलिस त्या छायाचित्रांची निगेटिव्ह ताब्यात घेण्यासाठी येतील ही शक्यता लक्षात घेऊन गुलाबचंदजी यांनी त्या निगेटिव्ह अशा ठिकाणी ठेवल्या की, पूर्ण स्टुडिओ आणि घराची झडती घेऊनही पोलिसांना त्या सापडल्या नाहीत.

उत्कृष्ट छायाचित्रण आणि देशभक्तीचा हा वारसा अनिलचे वडिल विनोदभाई यांनी पुढे नेला. छायाचित्रण करण्याबरोबरच ते दूरदर्शनच्या बातम्या आणि अन्य कार्यक्रमांसाठीही छायाचित्रण करीत असत. अनिलचे वडिल बंधू प्रमोद, दिपक हे देखील छायाचित्रण करीत असत.

आपल्या वडिलांबद्दल बोलताना अनिलने सांगितले, “तो कॉलेज मध्ये असताना एकदा तीन मित्र सायकल वरुन ट्रिपल सीट चालले होते, म्हणुन वाहतुक पोलिसांनी आम्हाला अडवले. त्यावर मी जेष्ठ पत्रकार विनोद शाह यांचा मुलगा आहे, असे सांगून हुज्जत घालू लागलो. शेवटी ते वाहतुक पोलिस आम्हाला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तिथेही तेच सांगितल्यावर त्या पोलीस अधिकाऱ्याने वडलांना फोन करून सर्व वस्तुस्थिती सांगितली. सर्व काही ऐकल्यावर मुलाची रदबदली न करता, नियमांनुसार कारवाई करा, असे वडीलांनी त्या पोलीस अधिकाऱ्याला सांगितले. शेवटी त्या तिघांनीही दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात येऊन समज देऊन सोडून देण्यात आले.” या प्रकारातून अनिल चांगलाच धडा शिकला. पुढे त्याने कधीच घराण्याची किंवा स्वतः वृत्तपत्र छायाचित्रकार असल्याची मिजास केली नाही, स्वतःच्या आणि घराण्याच्या नावाला बट्टा लागेल असे कधीच वागला नाही.

घरात छायाचित्रणाचा इतका समृद्ध वारसा असताना देखील मुळात अनिलला छायाचित्रकार बनायचेच नव्हते. दादा चौधरी विद्यालयातून जुनी अकरावी केल्यानंतर त्याने नगर कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. तिथे त्याला बॅडमिंटनची गोडी लागली. अल्पावधीतच तो उत्कृष्ट खेळू लागला. त्यामुळे त्याला बॅडमिंटनच्या बहुतेक स्पर्धांमध्ये कॉलेजचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत गेली.

असे सर्व, अनिलच्या मनाप्रमाणे चालू असताना, एक दिवस स्टुडिओत बसायला कुणी नव्हते, म्हणुन अनिलला थांबावे लागले. त्याच वेळी शाह कुटुंबियांचे एक ख्रिश्चन मित्र आले. त्यांना त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या स्वागत समारंभाची छायाचित्रे काढून हवी होती. आता छायाचित्रे काढण्यासाठी कुणी नाहिये, असे सांगून अनिलने त्यांना परत पाठविण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनी शाह कुटुंबियांव्यतिरिक्त आम्ही इतर कुणाकडूनही छायाचित्रे काढून घेत नाही, असे सांगून कुणीच नाही तर, तू चल अशी गळ अनिलला घातली. तो पर्यंत कधी छायाचित्रे काढणाच्या भानगडीत तो पडला नहता. पण येताजाता घरच्यांचे काम मात्र पहात होता. शेवटी ते कौटुंबिक मित्र असल्यामुळे अनिल नाईलाजानेच त्यांच्या बरोबर गेला. तिथे गेल्यावर त्याने पाहिले की, मुलीच्या बाजूने दुसरा एक प्रथितयश छायाचित्रकार आलेला होता आणि तो विविध पोझ घ्यायला लाऊन छायाचित्रे काढत होता. अनिलने मात्र अशी कृत्रिम छायाचित्रे घेण्याचे टाळून सहज प्रसंगांची, विविध भावमुद्रा असलेली छायाचित्रे टिपली.

घरी आल्यावर भावाने छायाचित्रे डेव्हलपकरेपर्यंत अनिलच्या जिवात जीव नव्हता, कारण त्याकाळी प्रत्यक्ष प्रिंट काढून हातात येईपर्यंत छायाचित्र कसे निघाले आहे हे कळत नसे. पण विशेष म्हणजे सर्व छायाचित्रे छान, प्रसंगानुरूप निघाली होती. त्यावेळी छायाचित्रे कोणत्या आकारात काढायची आहे हे ठरविण्यासाठी “प्रिंट कॉपी” काढल्या जात असे. सर्वच छायाचित्रे आवडल्याने संबंधित ग्राहकाने सर्वच छायाचित्रे मोठ्या आकारात बनवून घेतली. तो अल्बम पाहून मुलाकडच्यांनीही त्यांच्यासाठी दुसरा अल्बम बनवून घेतला. अशा प्रकारे पहिल्याच कामाने अनिलचे नाव झाले आणि कळत नकळत तो विविध कार्यक्रमांच्या छायाचित्रणात आणि त्याच बरोबर वृत्त छायाचित्रणात गुंतत गेला. दैनिक केसरी, सायं दैनिक समाचार, सकाळ, विशाल सह्याद्री ह्या वृत्तपत्रांमध्ये त्याची छायाचित्रे प्रसिद्ध होऊ लागली. प्रत्येक छायाचित्राचे मानधन म्हणुन तेव्हा 20 ते 25 रुपये मिळत. पण त्या पैशांपेक्षा आपण काढलेली छायाचित्रे हजारो लोक पाहतात, याचा अनिल ला अधिक आनंद होत असे.

अनिल हा नगर जिल्ह्य़ातील चांगल्या, वाईट घटनांचा गेल्या पन्नास वर्षांतील साक्षीदार आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एका दंगलीचे छायाचित्रण करताना, दंगलखोरांनी त्याच्या हातातील कॅमेरा ओढून घेण्याचा प्रयत्न केला. पण गडबडीत त्यांच्या हातात पूर्ण कॅमेरा न येता फ्लॅशगनच आली आणि ती घेऊन ते पळून गेले. पण जीवाची पर्वा न करता, अनिल ने दंगलीची छायाचित्रे काढून ती वृत्तपत्रांना पाठवून दिली दुसर्‍या दिवशी, ती छायाचित्रे प्रसिद्ध झाली. त्यामुळे पोलिसांना ती छायाचित्रे पाहून दंगलखोरांना अटक करण्यास मदत झाली.

नगर जिल्ह्य़ात 1972 साली पडलेल्या भीषण दुष्काळाची अनिलने इतकी दाहक छायाचित्रे काढली होती की, ती जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविली. त्यामुळे नगर जिल्हा “दुष्काळी जिल्हा” म्हणुन जाहीर होण्यास मोठा हातभार लागला आणि जिल्ह्याला आवश्यक ते सहाय्य मिळू शकले. त्यात आपला खारीचा वाटा होता, याचे अनिलला खूप समाधान मिळाले.

एकदा नगर येथे मुसळधार वादळी पाऊस झाला. तशाही स्थितीत तो निर्मलनगर येथे गेला. तिथे पत्रे उडून गेलेल्या एका घराच्या भिंतीवर चढून त्याने त्या घरांच्या आतील बाजूची अत्यंत बोलकी छायाचित्रे घेतली. वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले ती छायाचित्रे पाहून नगर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अनिल राठोड यांनी आपद्ग्रस्तांना तातडीने मदत दिली.

आतापर्यंत नगर जिल्ह्यात आलेल्या सर्व राष्ट्रपतींची पंतप्रधानांची, लष्करप्रमुख, मुख्यमंत्र्यांची, अति महत्वाच्या व्यक्तींची, त्यांच्या कार्यक्रमांची जवळून छायाचित्रे काढण्याची संधी अनिलला वृतपत्राच्या माध्यमातुन मिळाली आहे. अनेक प्रसंग त्याने उस्फूर्तपणे टिपले आहेत. अशा छायाचित्रांनी त्याला केवळ नावच मिळवून दिले नाही तर त्याबरोबर रोख रक्कमांसह पारितोषिके मिळवून दिली आहेत.

पुरस्कार प्राप्त एक छायाचित्र….

1995 च्या विधानसभा निवडणुकीत डोक्यावर धनुष्यबाण कोरलेल्या शिवसैनिकांच्या अनिलने काढलेल्या छायाचित्रास
“लोकप्रभा”तर्फे आयोजित ‘विधानसभा निवडणूक 95’ या विषयावरील राज्य पातळीवरील खुल्या छायाचित्र स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

एका विधान सभेच्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरची दिशा बदलावी यासाठी हेलिकॉप्टरला दोरखंड बांधुन धक्का मारणाऱ्या पोलिसांचे छायाचित्र अनिलने काढले. या छायाचित्रामुळे खूप खळबळ माजली. नगर तरुण भारत ने हे छायाचित्र छापले व त्याखाली “साहेबाचं राज्य किती नकली, हवेवर तरंगणारं हेलिकॉप्टर देखील ढकली” असे कॅप्शन देऊन प्रसिद्ध केले. या छायाचित्राच्या आधारे जनता दलाने पवारांवर आचारसंहिता भंगाचा खटला भरला होता. मुंबई मराठी पत्रकार संघाचा 1995 सालचा उत्कृष्ट वृतपत्र छायाचित्राचा पुरस्कारही विधानसभेचे तत्कालिन सभापती जयंतराव टिळक यांच्याहस्ते त्याला प्रदान करण्यात आला होता.

नगर जिल्ह्य़ातील दोन मातब्बर राजकीय नेत्यांचा निवडणूक खटला देशभरात गाजला होता. त्यापैकी एका नेत्याच्या कार्यक्रमांच्या छायाचित्रांचे काम अनिलने घेतले होते. ती मूळ छायाचित्रे मिळावीत म्हणून प्रतिस्पर्धी नेत्याने सर्व प्रकारचे प्रयत्न केले होते. परंतु शाह परिवाराने त्यांच्या व्यावसायिक नीतिमत्तेत कोणतीही तडजोड केली नाही. शेवटी त्या नेत्याला वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली छायाचित्रे जमवून ती न्यायालयात सादर करावी लागली.

जॉर्ज फर्नाडिस संरक्षणमंत्री असताना ते नगर येथे लष्कराच्या एका कार्यक्रमासाठी रेल्वेने आले होते. ते रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडत असताना पाऊस पडत होता. म्हणुन ते भिजू नये यासाठी काही लष्करी अधिकार्‍यांनी त्यांच्या डोक्यावर छत्री धरली. अनिल ने नेमका तोच क्षण टिपला आणि “संरक्षणमंत्र्यांना पावसापासून संरक्षण” या जेष्ठ पत्रकार सतिश कुलकर्णी यांनी दिलेल्या समर्पक ओळींसह ते छायाचित्र इंडियन एक्स्प्रेस, लोकसत्ता वृत्तपत्रांच्या सर्व आवृत्यांनवर पहिल्या पानावर झळकले.

एकदा एक वानर चक्क नगरच्या एका सलुन मध्ये घुसले. ते पाहून सर्व जण भीतीने तिथून पळून गेले. अनिलने मात्र न भिता, त्या सलुन मध्ये घुसून, माणसासारखे आरश्यात पाहणाऱ्या वानराचे छायाचित्र टिपले.

थंडीच्या दिवसात एकदा एका कोळ्याच्या मोठ्या जाळ्यावर पडलेले दवबिंदू अनिलने असे काही टिपले की जणू काही ते मोतीच आहेत ! अनिलचे ते इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने त्यांच्या सर्व आवृत्त्यांमध्ये पहिल्या पानावर छापले.

अनिलने काढलेली अशी काही छायाचित्रे Better Photography या प्रसिद्ध छायाचित्रण मासिकात प्रसिद्ध झाली आहेत. तर काही छायाचित्रे त्यांच्या प्रदर्शनातही लावण्यात आली आहेत.

सलून मध्ये माणसाची नक्कल करणारे वानर ! पुरस्कार विजेते एक छायाचित्र…

अनिल ने केसरी वृतपत्रानंतर सकाळ वृत्तपत्रासाठी 15 वर्षे छायाचित्रण केले. त्यानंतर तो अनेक वर्षे लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस ग्रुपसाठी काम करत आहे. तसेच काही महत्चाच्या प्रसंगाची छायाचित्रे असोसिएट प्रेस, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या
वृत्त संस्थांनीही त्याच्याकडून मागुन घेतली आहेत आणि अजूनही घेत असतात. शिर्डी येथे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणार्‍या अनेक महत्वाच्या व्यक्तींची छायाचित्रे अनिलने काढली आहेत.

काश्मीर मध्ये सामाजिक जाणिवेतून काम करणार्‍या पुणे येथील सरहद संस्थेने राज्यातील निवडक पत्रकारांचा एक दौरा काश्मीर मध्ये नेला होता. त्या दौऱ्यात लोकसत्ता तर्फे सहभागी होण्याची संधी अनिलला मिळाली होती. तेथील एकूण सामाजिक परिस्थिती, वातावरण, संस्कृती, सौंदर्य व डोळ्यासमोर घडलेल्या बॉम्बस्फोटांची छायाचित्रे टिपून भारतातील विविध वृतपत्रांना त्याने तिथुन प्रसिध्दीसाठी पाठविली होती.

परिस्थिती,जबाबदारीची जाणीव. बक्षीस प्राप्त छायाचित्र

साप्ताहिक सह्याद्रीचा मी विशेष प्रतिनिधी म्हणून काम करीत असताना घराला दारे, कड्या, कुलपे नसलेल्या शनी शिंगणापूर वर मी मुखपृष्ठ कथा लिहित होतो. त्यासाठी आम्ही दोघेही दोन दिवस त्याच्या स्कूटरने आणि तिसर्‍या दिवशी तत्कालिन जिल्हा माहिती अधिकारी, श्री ब उ कोतवाल यांच्या समवेत त्यांच्या शासकीय गाडीने गेलो होतो. फेब्रुवारी 1986 मध्ये प्रसिद्ध झालेली ही मुखपृष्ठ कथा खूपच गाजली. योगायोगाने त्याच आठवड्यात मी मुंबई दूरदर्शन केंद्रात सहायक निर्माता म्हणून रुजू झालो. यथावकाश “मुलखावेगळे गाव” ह्या कार्यक्रमाचे निर्माते, राम खाकाळ यांना त्यांच्या कार्यक्रमासाठी मी शनी शिंगणापूरचे नाव सुचवून मी लिहिलेली मुखपृष्ठ कथा त्यांना वाचायला दिली. त्यांना आणि इतरही वरीष्ठ अधिकार्‍यांना तो विषय आवडल्याने शनी शिंगणापूर वर पहिला दूरदर्शन माहिती पट तयार झाला. या माहितीपटासाठी तत्कालीन खासदार यरावंतराव गडाख, शनी शिंगणापूरचे मुख्य विश्वस्त कै. बाबुराव बानकर यांची मुलाखत घेण्याची संधी अनिलला मिळाली होती.

आई, वडील.आजी. समवेत शाह परिवार ५ जण भाऊ

वडील विनोदजी, बंधु प्रमोद, दिपक, उदय, यांचे मार्गदर्शन व अमेरिकेत व्यवसायाच्या निमिताने स्थायिक असलेला छोटा भाऊ सुनिल ज्याने पुण्यात असताना ‘तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या काळातील कृष्णा खोरे महामंडळाच्या राज्यातील सर्व पाटबंधारे प्रकल्पाचे मोठ्या जबाबदारीच्या छायाचित्रणाचे काम मिळवले होते. ते काम वडील विनोद शाह यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व भावंडानी यशस्वीपणे केले. यामध्ये भाऊ दिपकचा मोलाचा वाटा होता. त्याच्या हवाई छायाचित्रांचे संपूर्ण देशात कौतुक झाले होते. अजुनही अनेक पाटबंधारे खात्याच्या विश्रामगृहांमध्ये, कार्यालयांमध्ये भव्य आकाराची ही छायाचित्रे लावण्यात आल्याचे आपणास दिसून येईल.

नगर च्या भाजपा कार्यालयाचे भुमिपुजन लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी त्या प्रसंगाचे छायाचित्र तात्काळ काढून अनिलने त्यावर त्यांची सही घेतली होती.

आजवरच्या वाटचालीत सकाळचे नगर प्रमुख कै.अशोक चांदेकर, समाचार चे मालक-संपादक कै. जनुभाऊ काणे, आकाशवाणीचे प्रसिद्ध वृत्त निवेदक कै. गोपाळराव मिरीकर, जेष्ठ पत्रकार सर्वश्री कै. श्रीपादराव मिरीकर, लोकसत्ताचे नगर प्रतिनिधी कै. महेंद्र कुलकर्णी, महादेव कुलकर्णी, रामदास नेहूलकर. भूषण देशमुख, राजु इनामदार आदींकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळाले. तर नगर जिल्हा माहिती कार्यालयाने अनेक ठिकाणी जाण्यायेण्याची, अति महत्त्वाच्या व्यक्तींची, त्यांच्या कार्यक्रमांची छायाचित्रे काढण्याची संधी दिली, सतत त्यांच्याबरोबर फिरताना विविध क्षण कॅमेऱ्यात टिपता आल्याने अनुभव संपन्नता वाढीस लागली याचा अनिल आवर्जून उल्लेख करतो.

हे छायाचित्र पाहून दैनिक सामनाने अग्रलेख लिहिला होता.

छायाचित्रण कलेच्या ज्ञानाबरोबरच प्रसंगानुरुप छायाचित्रण करणे, नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे, सातत्याने दक्ष राहणे, प्रसंगावधान, चांगला जनसंपर्क, गांभीर्य, नम्रता हे गुण यशस्वी वृत छायाचित्रणासाठी आवश्यक असल्याचे अनिलचे मत केवळ छायाचित्रकारांनीच नाही तर, ज्याच्या ज्याच्या हाती छायाचित्रे काढता येतात असा मोबाईल असतो अशा सर्व आबाल वृद्धांनी लक्षात ठेवावे असे आहे.

मुंबईत व्हिडिओकॉन कंपनी आयोजित कार्यक्रमात

कितीही आव्हानात्मक परिस्थितीत अनिल छायाचित्र काढायला जात असताना, त्याच्या पत्नीने सौ मयुरीने त्याला कधीच रोखले नाही. ती नेहमीच त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी रहात आली आहे.

“यश”चे यश…

तसेच आपल्या घराचा छायाचित्रणाचा वारसा, व्यवसाय मुलगा यश याने पुढे चालवावा, असा दुराग्रह या दोघांनीही धरला नाही. त्यामुळे यश आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन खेळाडू म्हणून उदयास आला असून स्वतः बरोबर तो घराण्याचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करीत आहे. या तिघांनाही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments