“अतुल दिवे“
संगीताला ४ हजार वर्ष जुना इतिहास आहे, असे अलीकडेच कुठेतरी वाचले. संगीत क्षेत्र हे अत्यंत समृद्ध, सांस्कृतिक आणि शास्त्रीय परंपरांनी नटलेले आहे. यात हिंदुस्तानी शास्त्रीय गायन, नाट्यसंगीत, भक्तीसंगीत याशिवाय स्थानिक लोकसंगीताचाही समावेश होतो. मराठी- हिंदी गाण्यांचा आपल्या मनावर इतका पगडा असतो की ती गाणी सुरू झाली की आपण स्वतःही गुणगुणतो. ही क्रिया खरंतर नकळतपणे घडते. आपल्या अत्यंत आनंदाच्या आणि दुःखाच्या क्षणी आपल्याला ही गाणी साथ करतात. ही गाणी आपल्याला जवळची वाटतात ते त्यातील शब्दांमुळे हे निश्चितच परंतु त्या गाण्यांना लाभलेले संगीत हेही तितकेच महत्त्वाचे असते!
अनेक संगीतकार आहेत परंतु अत्यंत कमी संगीतकारांना भाग्य लाभतं की ते आकाशवाणी व दूरदर्शनचे मान्यता प्राप्त संगीतकार व गायक होऊ शकतात! अतुल दिवे यांना हे भाग्य लाभले आहे. त्यांनी २०१३ मध्ये ‘तिफन एक किंकाळी’ या चित्रपटाद्वारे संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. त्यानंतर २०१७ मध्ये ‘दंडित’ आणि २०१८ मध्ये ‘पाणी बाणी” यांसारख्या जवळजवळ तीस चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. त्यांच्याशी गप्पा मारण्याआधी मला आवर्जून सांगायला आवडेल की अतुल दिवे यांचे वडील डॉक्टर होते आणि अतुल दिवे स्वतः अत्यंत बुद्धिवान आणि सहज डॉक्टर होऊ शकत होते. परंतु घरच्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी मनाचा कौल मानला आणि जाणीवपूर्वक संगीत क्षेत्राकडे वळले. आपले पदव्युत्तर शिक्षण त्यांनी संगीतातच पूर्ण केले आणि संगीत विशारद झाले. तर
आपल्या संगीताचा शब्दप्रधान गायकीने अत्यंत वेगळा ठसा उमटवणाऱ्या संगीतकार अतुल दिवे यांच्याकडून, आपल्या मनावर मोहिनी घालणाऱ्या संगीतविश्वाची अधिकची माहिती जाणून घेऊया !

प्रा. प्रतिभा सराफ : ‘संगीत’ हा शब्द ऐकल्यावर मनात सर्वप्रथम काय येते ?
जेष्ठ संगीतकार अतुल दिवे : ‘संगीत’ हा शब्द मनामध्ये प्रसन्नता, प्रफुल्लता निर्माण करतो. संगीताची प्रचंड आवड व संगीतावर श्रद्धा असल्यामुळे हा शब्द एखाद्या संगीतकारासाठी किंवा गायकासाठी ‘आध्यात्मिक’ असाच आहे. ती प्रार्थना आहे, ती भक्ती आहे, ती पूजा आहे!
प्रतिभा : संगीताचा तुमच्यावर कसा परिणाम होतो ?
अतुल : संगीताचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष नक्कीच खूप चांगला परिणाम मानवावर, प्राण्यांवर एवढेच काय तर नवीन संशोधनानुसार झाडाफुलांवरसुद्धा होतो, असे दिसून आले आहे.
प्रतिभा : जगात अनेक क्षेत्र उपलब्ध असताना संगीत क्षेत्राकडे वळण्याचं नेमकं कारण काय?
अतुल : माझ्या मते संगीतक्षेत्रात किंवा लिखाण क्षेत्रात म्हणजे वाङ्मयीन क्षेत्रात एखादी व्यक्ती येते तर ती भाग्यवान असते. ते सगळं विधीलिखित असतं. कारण मी माझ्या आयुष्यामध्ये असे अनेक जण बघितले की जे मोठ्यमोठ्या हुद्द्यांवर समाजामध्ये काम करतात… कोणी अधिकारी आहेत तर कुणी उद्योगपती आहेत पण त्यांची संगीतावर नितांत श्रद्धा आहे. ते उत्तम गाणं गातात किंवा लिहितात. त्यांचे क्षेत्र भलेही दुसरे कोणते असो पण त्यांची ‘संगीताने निवड केलेली आहे’, असं मी म्हणेन! मला असं वाटतं की संगीत आपण निवडत नसून आपल्याला संगीत निवडत असतं आणि जे १००% संगीतात आहेत ते खरंच भाग्यवान म्हणायला हरकत नाही.
प्रतिभा: ‘संगीत आणि आयुष्य’ याचं वर्णन कसं कराल?
अतुल: संगीत हे स्वतः अत्यंत श्रेष्ठ आहे. जगाच्या निर्मितीबरोबर संगीताची निर्मिती झालेली आहे. संगीत हे पृथ्वीतलावर सुरुवातीपासूनच आहे. सात स्वर हे आधीपासून विश्वात आहेत. माणूस जेव्हा जन्माला आला आणि तो बोलू लागला किंवा गुणगुणू लागला अगदी तेव्हापासून संगीत असल्याची उदाहरणं आहेत. नंतर हळूहळू शब्द आले. लोकसंगीत आलं, शास्त्रीय संगीताला माणसाच्या जीवनाचा संगीत हा अविभाज्य घटक झाला. आपल्या घरातील कुठलंही कार्य असो, जन्मापासून मृत्यूपर्यंत वा दिवाळीपासून दसऱ्यापर्यंत सगळ्या ठिकाणी संगीत आहेच! कुठलंही कार्य संगीताशिवाय पूर्ण होऊ शकत
नाही. खरं पाहिलं तर माणसाचं पूर्ण जीवन हे संगीतमय झालेलं आहे. एखाद्या माणसाला गाण्याची आवड जरी नसेल तरी एखाद्या कार्यामध्ये संगीत असावं, असं त्याला वाटत असतं. संगीत हे व्यावसायिक जरी झालेलं असेल, ते माणसाने स्वतःच्या व्यवसायाचा भाग जरी केलं असेल तरी मुळामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये संगीत असल्याशिवाय हे होऊच शकत नाही म्हणून जीवन आणि संगीत हे परस्परासाठी अत्यंत पूरक अशी गोष्ट आहे, असं मला वाटतं.
प्रतिभा : जेव्हा तुम्ही गाणी ऐकता तेव्हाच तुमच्याच मनामध्ये चाल सुचते का ? तुमची संगीत देण्याची प्रक्रिया काय आहे ?
अतुल : प्रत्येक संगीतकाराची संगीत देण्याची पद्धत वेगळी असते. माझी चाल सुचण्याची प्रक्रिया ही शब्द समोर आल्यानंतर सुरू होते. शब्दप्रधान गायकी किंवा शब्दानुसार एखाद्या गाण्याला चाल लावावी त्यानंतर शक्यतो कुठला गायक आपलं गाणं गाणार आहे, त्याचा जॉनर काय आहे, त्याच्या गळ्याची ताकद किती आहे, आपण लावलेली चाल ही त्या गायकाला पेलू शकते का किंवा तो गायक पेलवू शकतो का ? हे संगीतकाराला बघणं गरजेचं आहे आणि त्यामुळे ती चाल प्रसिद्ध होते. चाल लावताना अनेक गोष्टी डोक्यामध्ये विचार करत असतात. कधी उत्स्फूर्त चाल सुचते तर कधी शब्दांनुसार एखादा राग डोळ्यासमोर येतो आणि या रागात चाल बांधायला पाहिजे, असे वाटते. बरेचदा तो राग सोडून दुसऱ्याच रागामध्ये कधीकधी गाणं पूर्ण होतं. बरेचदा मिश्र रागांमध्येसुद्धा गाणी तयार होतात. चालीबरोबरच त्याला ‘रिदम’ कसा असावा, हे सगळं गाणं पूर्ण होईपर्यंत डोक्यात चालू असतं.

प्रतिभा : शब्दप्रधान गायकीला आपण महत्त्व देता परंतु एखादे संगीत देऊन आपण गाणं लिहून घेतलं आहे का? ते गाणं तुम्हाला आणि कवीला आवडलं आहे का? उदाहरण जाणून घ्यायला नक्की आवडेल.
अतुल: कधी केलं नाही आणि याच्यावर माझा फार विश्वास नाही. क्वचित कधीतरी असं होऊ शकतं परंतु त्यासाठी समोरचा लिहिणारा कवी किंवा गीतकार त्यालाही संगीताचं, चालीचं, ठेक्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे त्याशिवाय हे होणं शक्य नाही. मला तर शब्द समोर आल्यानंतरच चाल लावायला जास्त आवडतं कारण विना शब्दांची एखादी ट्यून ही फक्त ट्यूनच असणार… शब्द आल्यानंतर त्याला खरं साजेसं रूप येतं, असं मला वाटतं.
प्रतिभा : तुमच्या संगीतासाठी प्रेरणा कुठून मिळते ?
अतुल : मला रोजच्या जगण्यातून संगीतासाठी प्रेरणा मिळत असते ! माणसाच्या आयुष्यातील सुखदुःख, प्रेम -वेदना, जाणिवा या सगळ्यांमध्ये संगीत भरलेले आहे आणि याचा आपण रोज अनुभव घेत असतो. हे अविरत आहे जोपर्यंत आपले सगळे अवयव ऐकणे, वाचणे, बघणे, विचार करणे हे आहे तोपर्यंत प्रेरणा चालू राहणार!
खरं म्हणजे शरीरातला रिदम किंवा लय हे आपल्याला प्रेरणा देत असते.
प्रतिभा : तुम्ही तुमच्या संगीतातून कोणत्या भावना व्यक्त करू इच्छिता? ‘संगीत आणि भावना’ यांचं घट्ट नातं आहे, असे आपण मानता का? एखादे उदाहरण द्या.
अतुल: संगीत क्षेत्रातल्या प्रत्येक माणसाला भावना असल्याशिवाय तो उत्तम कलाकृती निर्माण करूच शकत नाही कारण हा सगळा भावनेचा खेळ आहे. साज हा निर्जीव जरी असला तरी त्यातून निघणारा आवाज हा मात्र सजीव आहे आणि तो आपोआप निघू शकत नाही. त्याच्यासाठी त्याला छेडणारा कुणीतरी असावा लागतो. तो निपुण असेल तरच त्यातून उत्तम सुर निघतील. एखादे वाद्य असो किंवा तुमचा गळा असो, भावनेत कारुण्य असतं. भावनेत आनंद असतो. भावनेत दुःख असतं. हे सगळं संगीतातून निघत असतं. गाण्यातून निघत असते त्यामुळे भावनेचा आणि गाण्याचा खूप जवळचा संबंध आहे, असं मला वाटतं.

प्रतिभा : तुमचं संगीत ऐकल्यावर लोकांना काय वाटायला हवं असं तुम्हाला वाटतं ?
अतुल : लोकांनी दर्जेदार संगीत ऐकावं. दर्जेदार गायकांना ऐकावं. शक्यतो नवनवीन कलाकृती ऐकाव्यात. आपले कान, आपली रसिकता ही अजून अजून वाढवावी. त्याचा दर्जा वाढवावा. गाणं झाल्यानंतर गाणं आवडलं असेल तर त्या गायकाशी संवाद साधावा. त्याचं कौतुक करावं. कुठलाही गायक गात असताना, एक दुसऱ्याशी त्यांची तुलना करू नये. त्यांची तुलना न करता त्यांच्या कलेचा मनमुराद आस्वाद घ्यावा.
प्रतिभा : तुमच्या प्रवासातील सर्वात मोठा संघर्ष काय होता ?
अतुल : मी माझ्या सांगीतिक प्रवासामध्ये अत्यंत मोठा संघर्ष केलेला आहे आणि तो अनेक वर्ष केलेला आहे. संघर्ष दोन प्रकारचा असतो एक तर आपण त्याला रोजीरोटीचं साधन केलं तर स्थिरस्थावर होण्यासाठीचा एक संघर्ष आणि दुसरी गोष्ट संगीतामध्ये जसजशी निपुणता मिळत जाते तसतशा आपल्या जबाबदाऱ्या वाढत जातात आणि मग स्वतःला सिद्ध करण्यासाठीची धडपड. असा दोन प्रकारचा संघर्ष आहे. मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी फार जास्त संघर्ष करावा लागला नाही. मला खूप चांगल्या संध्या मिळत गेल्या परंतु उपजीविकेसाठी संगीत निवडल्यानंतर सुरुवातीचा काही काळ हा खूप संघर्षमय होता. परंतु गाणं, संगीत सोबत असल्यामुळे त्याचं कधी वाईट वाटलं नाही. अगदी हसत हसत आनंदाने ते दिवस निघून गेले परंतु एकेकाळी एक वेळचं जेवणसुद्धा मिळत नव्हतं ही गोष्ट तितकीच खरी किंवा थोडं मोठं झाल्यानंतर आई आजारी असताना तिच्या इलाजाचे पैसे संपल्यावर माझी वाद्य विकून मी दवाखान्याची बिल भरली या अस्वस्थ घटनेचे व्रण अजूनही मनावर आहेत.
प्रतिभा : ‘गझल’ हा प्रकार तुम्हाला सर्वात जास्त आवडतो. अनेक गझलांना तुम्ही उत्तम संगीत दिलेले आहे. तसे गाणी सुद्धा वृत्तात लिहिली जातात आणि ज्याला उत्तम संगीत देता येते. मग गाण्यात आणि गझलमध्ये तुम्हाला कोणता फरक जाणवतो आणि गझल का जवळची वाटते ?
अतुल : खरं पाहिलं तर मला कविता, गाणी हे सगळंच आवडतं. उत्तम लिहिलेलं, उत्तम शब्दात असलेलं मला आवडतंच परंतु गझलही मला आवडू लागली याचं कारण कळलंच नाही. जसं माणूस त्याच्या आयुष्यात कधीतरी कुणावर प्रेम करतो ते प्रेम आपोआप होत असतं कारण त्या व्यक्तीचे काही गुण हे तुम्हाला नकळतपणे आवडलेले असतात. तसं माझं गजलेचं झालेलं आहे. गझल मला कळू लागली आणि ती मला आवडू लागली. विशेष म्हणजे शेवटच्या ओळीमध्ये पहिल्या ओळींचा अर्थ लपलेला आहे. म्हणजे रदीफ आणि काफीयाने वरील शब्द आपल्या डोक्यावर पेलवलेले असतात. अत्यंत समर्थपणे ते उभे असतात आणि गझलची नजाकत, गझलचे शेर, गझलेचा भावार्थ हा खरोखर मनाला स्पर्श करून जाणारा आहे. उर्दू किंवा मराठी अशा अनेक रचना वाचताना मला असं वाटतं की जीवनाचा सगळा सार याच्यात आहे.

प्रतिभा : खूपच सामान्य प्रश्न आहे पण तरीही मला विचारावासा वाटतो जर तुम्ही संगीत क्षेत्राकडे वळला नसता तर कोणत्या क्षेत्रात करिअर केलं असतं ? का ?
अतुल : मी प्रशासकीय सेवेत असतो. एखादा अधिकारी असतो आणि समाजासाठी काम केलं असतं.
प्रतिभा : तुमचा पुढचा प्रकल्प काय आहे ?
मी संगीतबद्ध केलेले दोन चित्रपट आता येत आहेत तसेच गझलचे तीन अल्बम रिलीज होत आहेत त्यात एक मराठी अल्बम असून दोन हिंदी अल्बम आहेत.
प्रतिभा : इतर संगीतकारांच्या आणि तुमच्या संगीताच्या प्रकारात काही वेगळेपण आहे का ? उदाहरण द्या.
अतुल : नक्कीच वेगळेपण आहे कारण की प्रत्येक संगीतकार हा आपली एक शैली घेऊन गाण्यांना चाल देत असतो. त्याचीही प्रतिभा असते. त्यांनी जर एखाद्या संगीतकाराच्या संगीताची नक्कल करण्याचा प्रयत्न केला तर ते परिपूर्ण होऊ शकत नाही. त्याच्यात कुठे ना कुठे अपूर्णता असते. पण जेव्हा एखादा संगीतकार स्वतःची शैली घेऊन काम करत असेल तर ते साधं असेल किंवा अवघड असेल परंतु ते संपूर्ण असतं हे नक्की.
प्रतिभा : संगीत क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना आपण कोणता संदेश द्याल?
अतुल : आधी संगीताचं ज्ञान भरपूर घेणं गरजेचं आहे. संगीत हे जरी उत्स्फूर्तपणे आपल्याकडे येत असेल, आपल्याला ती देवाची देणगी
जरी वाटत. असेल तरीही त्याच्यासाठी मेहनत करणं गरजेचं आहे. संगीताचं व्यवस्थित शिक्षण घेणं गरजेचं आहे. त्या घेतलेल्या शिक्षणामध्ये स्वतःचे विचार, आपले दिसले पाहिजेत. सतत चांगल्या गाण्याचा शोध घेतला पाहिजे. संगितावर अपार श्रद्धा असणं गरजेचं आहे ते फक्त प्रसिद्ध होण्याचं माध्यम किंवा स्टेजवर मिरवण्याचं माध्यम नसून ते स्वतःच्या अंतरंगामध्ये बसवणं गरजेचं आहे. उत्तम रियाज, उत्तम विचार चांगल्या गुरूंच्या सानिध्यामध्ये शिक्षण या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. त्याच्यानंतर खूप जास्त निरीक्षण करण्याची गरज आहे.

प्रतिभा : असा कोणता प्रश्न मी तुम्हाला विचारावा, ज्याचे तुम्हाला उत्तर द्यायला आवडेल ?
अतुल: आताच्या संगीताचं बदलत स्वरूप आणि जुनं संगीताबद्दल मला मत व्यक्त करायला आवडेल.
संगीतासाठीसुद्धा प्रत्येक काळ हा चांगला आणि वाईट असतो. इतक्या वर्षांच्या अनुभवातून असं जाणवलं आहे की दर पाच वर्षांनी संगीत देणाऱ्यांमध्ये किंवा गाणाऱ्यांमध्ये बरेचसे बदल घडतात. कधीकधी उत्तम दर्जाचं संगीत या काळातसुद्धा निर्माण होते. जुन्या काळामध्ये ऐशी टक्के संगीत हे दर्जेदार असायचं पण आता थोडंसं त्याच्या उलट झालेलं आहे. वीस ते तीस टक्केच संगीत श्रवणीय व चांगलं निर्माण होतंय. आजकाल नवनिर्मितीपेक्षा नकलेला फार महत्त्व दिले जातंय. एखादं गाणं चाललं की तशाच धाटणीची गाणी निर्माण करण्याचा संगीतकारांचा कल दिसतो. त्यापेक्षा काहीतरी नवीन देता आलं पाहिजे, असं मला वाटतं.संगीत श्रवणीय असावं. आजही लोकसंगीत अत्यंत श्रवणीय आहे . त्याचा आनंद जास्तीत जास्त घेता आला पाहिजे !
हे सगळे वाचून आपल्याला अतुल दिवे यांचे नाव निश्चितपणे कुठेतरी वाचल्याची आठवण झाली असेल कारण ‘स्वामिनी’, ‘बंदी शाळा’, ‘कालचक्र’ इ. नव्वदहून अधिक लोकप्रिय मालिकांच्या शीर्षकगीतांना संगीत दिले आहे. त्यांनी गायलेली ‘गर्जा महाराष्ट्र’, ‘शिर्डी मे उतरी दिव्य ज्योती’ आणि ‘माझा शनिदेव पहा हाकेला धावतो’ यांसारखी गाणी आपण इथून ऐकू शकाल.
‘खयाल-ए-गझल’ यांसारख्या कार्यक्रमांद्वारे गझलचे लाईव्ह सादरीकरण करतात, ते मात्र पाहण्याची संधी चुकवू नका. गायनाबरोबर अतिशय उत्कृष्ट आणि अभ्यासपूर्ण असे निवेदनाचेही गुण त्यांच्याकडे आहेत, हे आपल्याला अशा कार्यक्रमातून जाणून घेता येईल ! या कार्यक्रमात त्यांच्या बरोबरीने गाणाऱ्या वैशाली कुर्तडीकर, अंजली भालेराव, स्वाती कुलकर्णी इ. त्यांच्या शिष्यांनासुद्धा ऐकता येईल. ‘स्वरसाक्षी प्रोडक्शन’ ची निर्मिती करून त्यांनी आत्तापर्यंत 3000 च्यावर कार्यक्रम केलेले आहेतच, ज्याचा आलेख वाढताच राहणार आहे.शेवटी संगीत केवळ चर्चेचा विषय नाही तर त्याची अनुभूती घेण्याचा विषय आहे ! म्हणूनच मी त्यांच्या यूट्यूब ची लिंक 👇खाली देत आहे.
https://youtube.com/@atuldive?si=yfGx9Z9RP8Cn4qNy

— लेखन : प्रा. प्रतिभा सराफ. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
