महिला दिनानिमित्त सिनिअर सिटीझन क्लब, ठाणे – नाॅर्थ, या जेष्ठ नागरिक संघात नुकतीच ठाण्यातील रिक्षाचालक पाच महिलांची मुलाखत शुभदा केळकर यांनी घेतली.
ठाण्यातील एकूण ७० महिला रिक्षा चालकांचे प्रतिनिधित्व करत मनिषा शेंगदाणे, सुवर्णा साळुंखे, सुनिता डे, सुलभा उपेकर,
शालिनी गुरव या पाच महिला रिक्षाचालकांनी त्यांना सुरवातीला आलेले भलेबुरे अनुभव सर्वांशी शेअर केले आणि आपली व्यथा आणि कथा सांगितली.
रिक्षा चालवण्याला घरुन सुरवातीला बराच विरोध झाला तरीही ठामपणे मैत्रिणीसोबत रिक्षा प्रशिक्षण घेऊन संसाराला हातभार लावण्याचे स्वप्न साकार झाल्याचा आनंद प्रत्येकीच्या चेहऱ्यावर दिसला.
मनिषा शेंगदाणे यांचे शिक्षण बीए.बीएड. असून काही काळ त्यांनी काँन्टक्ट बेसिसवर विद्यादानाचेही काम केले आहे. तर सुवर्णा साळुंखे यांना त्यांच्या मिस्टरांनीच रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण दिले. रात्री दहानंतर त्या रिक्षाचे प्रशिक्षण घेत असत असेही त्या म्हणाल्या. एकदा रिक्षा चालवताना पूर्ण दिवस घरी काँन्टक्ट झाला नाही तेव्हा भाऊ, आई शोधत होते असेही त्यांनी हसत सांगितले.
या रिक्षाचालक महिलांच्या प्रश्नावर “अबोलीची फुले” हे पुस्तक ही साधना जोशी यांनी प्रकाशित केले आहे. प्रत्येक प्रश्नाला चोख उत्तर देत असताना जेष्ठ नागरिक रसिकतेने दाद, आणि कौतुक करत प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करत होते.
सुलभा उपेकर म्हणाल्या की डिलिव्हरी होईपर्यंत नऊ महिने, नऊ दिवस त्यांनी रिक्षा चालवली. हे ऐकून त्या सर्वांच्या कर्तव्यनिष्ठतेला सलाम करावा वाटला. घर, संसार, मुलं, त्यांच्या शाळा सांभाळून त्या दिवसभर रात्री नऊ पर्यत रिक्षा चालवतात हे ऐकून स्त्री सामर्थ्य, चिकाटी आणि व्यवस्थापनासह कामाचा आनंद घेणाऱ्या या महिलांबद्दल सर्वांच्या मनात आदर निर्माण झाला.
शेंगदाणे ताई म्हणाल्या, आदरणीय राजन विचारे साहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती विचारे वहिनी यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. प्रोत्साहन दिले. बचतगट सुरु करुन दिला. २५ जणींना प्रशिक्षण आणि रिक्षा मिळवून दिल्या, बँक आँफ बडोदाचे सव्वादोन लाखाचे कर्ज मिळवून दिले एवढेच नाही तर ठाणे महानगरपालिकेने ५५ हजार रु. सबसिडी दिली असे सांगितले.
आज ठाण्यात ७० महिला रिक्षाचालक आहेत. किंबहूना ठाण्यात प्रथम महिला रिक्षा चालकांनी रिक्षा चालवायला सुरुवात केली त्यामुळे गिनीज बुक आँफ रेकॉर्ड मधे याची नोंद झाली आहे असे त्यांनी अभिमानाने सांगितले.
या प्रवासात काही वाईट अनुभव आले का ? या प्रश्नाला उत्तर देताना ठाणे हा आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे इथे कुणीही त्रास देण्याचा प्रयत्न ही करणार नाही असे सुलभा उपेकर म्हणाल्या. रिक्षा चालवताना येणाऱ्या विविध प्रसंगाचा त्यांनी उल्लेख केला. सुरवातीला रस्ते माहिती नव्हते तेव्हा ग्राहकांनी त्यांना इच्छित जागेपर्यत वाट दाखवली त्यामुळे गुगल मँपची गरज भासली नाही आणि आता गेले सात वर्षे रिक्षा चालवत असल्याने ठाण्यातील रस्ते माहिती झाले आहेत असेही उपेकर यांनी सांगितले.
शाळेसाठी रिक्षेस परवानगी मिळत नाही पण विचारेसाहेब आता टँक्सी मिळवून देणार आहेत आणि २४ जणीनी फोरव्हिलरचे सद्या ट्रेनिंग घेण्यास सुरवात झाली आहे असेही त्या म्हणाल्या.
जेष्ठ नागरिक संघातील स्त्रीपुरूषांनी भरलेला निळकंठ व्यायामशाळेचा संपूर्ण भरगच्च हाँल टाळ्यांच्या गडगडाटाने दुमदुमतच, हसत खेळत ही मुलाखत सफल संपूर्ण झाली.
दुसऱ्या सत्रात “सीता” या विषयावर साधना योगेश जोशी यांचे व्याख्यान झाले. वाल्मिकी रामायणाचा आधार घेत सीतेच्या जन्मापासून राम राजाभिषेकापर्यत सीतेच्या विविध गुणवैशिष्ट्ये, राज्यकारभार, कैकयी, मंदोदरीशी झालेला सीतेचा वार्तालाप इ.अनेक दृष्टिकोनातून सीतेचे व्यक्तीमत्व त्यांनी उलगडत सर्व रसिक जेष्ठांना मंत्रमुग्ध केले.
मध्यवर्ती जेष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रकाश दिघे, जेष्ठ नागरिक संघटना ठाणे नाँर्थचे अध्यक्ष श्री.सुरेश गुप्ते, आणि पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
सौ.माधुरी जोशी यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमास सुरुवात झाली तर स्वागत गीत सौ.सुनिता दातार यांनी म्हटले.
खुसखुशीत मटार करंजी आणि काँफीचा आस्वाद कार्यक्रमानंतर सर्व जेष्ठांनी घेतला.
— लेखन : सौ.मानसी जोशी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800