डॉक्टर हो पोरी
तुझ्यासाठी मी होईल बनकर
हो सुगंधित गुलाबाचे अत्तर
नाव राखण्या बापाचे जगभर
पोरी डॉक्टर हो ग तू डॉक्टर
व्हावी आनंदीबाई स्वप्न आईचे
पूर्ण करावे बाळा तू लवकर
ठावूक मजला प्रवास खडतर
पोरी डॉक्टर हो ग तू डॉक्टर
कर उपकार माय बापावर
मन लावून तू अभ्यास कर
लाखात एक तू पहिला नंबर
पोरी डॉक्टर हो ग तू डॉक्टर
लाडकी एकुलती एक लेक
दीप ज्योती दिव्य दिप्तकार
म्हाताऱ्याच्या काठीला आधार
पोरी डॉक्टर हो ग तू डॉक्टर

– रचना : विलास कुलकर्णी
मनातलं काहीतरी………🙏🩺🌿🙏
शेतकरी आणि डॉक्टर
एक देहाची मशागत करतो तर एक मातीची
दोन्हीही या भारतमातेचे पुत्र !
राग, द्वेष, गोंधळ कोरोना हा भाग वेगळा
पण दोघे ही सध्या भयाण मनःस्थितीत अडकले आहेत,
एक इथल्या मानसिकतेने हताश झालाय
नि एक इथल्या व्यवस्थेने झोडपलाय, पक्का
दोघांनी ही बरंच काही गमावलय रे,
नकाच तुलना करु एकमेकांच्या गणवेशाची
सध्या दोघांवरही सलाईन लावण्याची वेळ आलीये,
पिकांसारख्या मुंड्या टाकल्यात निराश होऊन
नजरेपुढे मेलीत माणसं आणि पिकं ही अगणित
भावना जिवंत करणारं इंजेक्शन आणायचं कुठून ?
असतील रे काही स्वार्थी सुद्धा
पण सर्वांनाच त्या पंक्तीत का बसवावं ?
बळीराजा, तू मालक आहेस रे इथला
आणि ए वैद्यराजा, तू आयुर्वेदाचा देवच जणू
अगदीच बेशुद्ध पडलीये दोघांची ही संबंध जिंदगी
गजानना, आता या अवस्थेवरची लस कुठून आणायची बाबा…….
🖋 गजानन ऊफाडे
(शब्दश्री)