Thursday, June 19, 2025
Homeलेखडॉक्टर दिनाच्या निमित्ताने....

डॉक्टर दिनाच्या निमित्ताने….

आज 1 जुलै  राष्ट्रीय डॉक्टर दिन.
मी एक गायनाकॉलॉजिस्ट असल्याने माझ्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस !

वैद्यकशास्त्राचे पितामह- फादर ऑफ मेडिसिन, हिप्पोक्रेट्स म्हणतात, “वैद्यकीय सेवांवर प्रेम म्हणजेच माणुसकीचे प्रेम” म्हणूनच डॉक्टरांच्या सेवेत माणुसकीचे दर्शन अपेक्षित असते.

वैद्यकशास्त्र हा विषय खूप सुंदर आहे. जेवढा त्याचा अभ्यास करू तेवढं आपलं त्यावर प्रेम बसतं. किती सुंदर आहे हे मानवी शरीर ! निसर्गतः ते एक सुंदर रसायन आहे. त्याची उपजत यंत्रणा पाहिल्यास ते किमयागार शास्त्र आहे आणि ते सहज सुंदरही आहे. स्वतःच स्वतःला सुयोग्य, निरोगी राखण्याची शक्ती जन्मतःच त्या शरीरात आहे. आणि तरीही शरीर शास्त्रात अनेक आव्हाने आहेत. याची उकल अजूनही झालेली नाही. यावर अनेक प्रकारची संशोधने अनेकविध देशांतून होत आहेत .

स्त्रीला “शक्ती” म्हटले जाते कारण शरीर अतिशय शक्तिमान आहेच पण स्त्रीचं शरीर हे खऱ्या अर्थाने शक्तिशाली आहे. माझा विषय आहे (obstetrics and Gynaecology) प्रसूतिशास्त्र आणि स्त्री विज्ञान ! हा एक अत्यंत मनोहारी व आनंददायी विषय! स्त्री शरीरातील अनेक स्थित्यंतरे स्पष्ट करणारा हा विषय ! जेव्हा स्त्रीचे रूपांतर मातेत होते तेव्हा एक सुंदर जाणीव निर्माण होते. जेव्हा एखाद्या स्त्रीला कित्येक वर्षानंतरच्या संघर्षानंतर गर्भ राहतो आणि त्यानंतर एका सुंदर आपल्याच हाडा मासावर पोसलेल्या अर्भकाला ती जन्म देते आणि बाळ जन्मताच पहिल्यांदा रडतं तेव्हा आईच्या डोळ्यात दाटलेले आनंदाश्रू पाहणं हा एक सोहळा असतो.

ह्या दाम्पत्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय, रोमांचकारी प्रवास सुरू होतो आई वडिलांच्या रूपाने ! इथे मला याबाबत आजच्या नवीन पिढीचे खूप कौतुक वाटते. पूर्वी स्त्री ही स्वतःच स्वतःची काळजी घेत असे. पण परिवर्तनाच्या प्रवाहात अनेक सकारात्मक बदल झाले. त्यात आज पती गर्भवती पत्नीस अतिशय प्रेमाने आणि काळजीपूर्वक सांभाळून दवाखान्यात आणतो, त्याची ही काळजी आणि आनंद डॉक्टरांनाही सुखदायी असतो. आजच्या या पिढीमध्ये हा बदल अपेक्षित होता आणि तो झालेला आहे म्हणून स्त्रीला पूर्णपणे सकारात्मक पाठिंबा मिळतो. ही जबाबदारी समानपणे स्वतःहून पुरुषानेही बापाची भूमिका पार पाडताना विभागून घेतलेली दिसते.

आजच्या काळात स्त्रीरोग तज्ञ होणं ही एक कला आहे. म्हणजे स्त्री विकारांचे व्यवस्थापन करणे आणि गर्भधारणेमध्ये स्ञीबाबत उच्च जोखीम उचलणे या सोबतच कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घेणाऱ्या स्ञी मातेची काळजी घेण्यासाठी स्त्रियांच्या या विशेष डॉक्टरांना आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावावे लागते. किंबहुना त्यातच त्यांचा आनंद दडलेला असतो.

प्रसूती शास्त्रज्ञ हा एकमेव असा डॉक्टर आहे जिथे रुग्णांना या डॉक्टरांना भेटून आनंद होतो. काही गोष्टी डॉक्टरांसाठी कष्टप्रद असतात. माझ्या करिअरमध्ये एका सहा वर्षाच्या निष्पाप मुलीला मी जेव्हा तिच्या शेजाऱ्याने केलेल्या बलात्काराविषयी उपचारासाठी तपशीलवार माहिती विचारली तो क्षण खुपच दुःखदायी होता. हे असे क्षणही गायनाकॉलॉजिस्टच्या अनुभवाचा भाग बनतात.

बाळाचा जन्म ” हा प्रसूती शास्त्राच्या डॉक्टर साठी आनंद घेऊन येणारा क्षण असतो. पण काही वेळा वेगळे अनुभवही येतात. एक कामगार महिला सात मुली नंतर आठव्यांदा डिलिव्हरी साठी आली होती. सातही मुलींसाठी तिच्यावरच दोषारोपण केले गेले होते आणि आठव्यांदा मुलाचा जन्म झाला होता. म्हणजे आजही समाजात मुलीपेक्षा मुलाचे स्थान जेव्हा अशा पद्धतीने जास्त मानले जाते आणि त्यासाठी त्या मातेच्या शरीराला अतोनात त्रास दिला जातो तेव्हा ते डॉक्टरांसाठी दुःखदायकच असते. कितीतरी स्त्रिया ह्या आपल्या आजारासाठी स्त्री-रोग तज्ञांकडे जाण्यासही लाजतात कारण आपल्या आरोग्यास त्या प्राधान्यक्रम देत नाहीत.

आज भारतात स्त्रियांच्या कॅन्सरचे वाढते प्रमाण हा एक अत्यंत दुःखद भाग आहे. मी आणि माझ्यासारख्या अनेक डॉक्टरांना असे वाटते की, आपली आरोग्य व्यवस्था अजूनही सक्षम करणे अत्यंत गरजेचे आहे. आपले स्ञी आरोग्याबाबत मोठे ध्येय ठेवल्यास स्ञी आरोग्य नक्कीच आपण निरोगी आणि निरामय राखण्यास सक्षम होऊ.

डॉक्टर आणि पेशंट यांचे नाते सौहार्दपूर्ण आणि स्नेहाचे असले पाहिजे. आज या पेशात जर एखाद्या पेशंट बाबत अयशस्विता जाणवली की, लोक त्या डॉक्टरवर आरोप करतात पण प्रत्येक डॉक्टर आपल्या पेशाबाबत प्रामाणिक असतो. अतिशय मेहनत, रात्रंदिवस कष्ट करून प्रेमाने कार्यभार सांभाळत असतो. शेवटी डॉक्टरही माणूसच असतो.

कोरोना काळात सर्व डॉक्टर सेवारत होते. डोक्यावर त्यांच्याही मृत्यूची टांगती तलवार असतानाही अंगावर पीपीई किट घालून अहोरात्र ते कष्टत होते. लोकांचे जीव वाचवत होते. अविश्रांत परिश्रम घेत होते.

आज “डॉक्टर डे” निमित्त सर्वजण आमची प्रशंसा करतील, सत्कार- गौरव करतील, त्या सर्वांना मी एकच सांगू इच्छिते की, डॉक्टरही एक माणूसच आहे. माणसाचा जीव वाचवणे, त्यांच्या चेहर्‍यावर आनंद पाहणे हेच त्याचे लक्ष्य असते. डॉक्टर होताना घेतलेली शपथ आम्ही लक्षात ठेवूनच आम्ही सेवाभावी वृत्तीने सेवा करू ही आजच्या दिवशी आम्हा डॉक्टर जनां तर्फे आपणास शाश्वती आणि प्रेम वचनही !!

– लेखन : डॉ. प्रशंसा राऊत- दळवी. गायनाॕकाॕलाॕजिस्ट,                मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. We are feeling proud of you Dr Prashansa
    For the future strategies need to be developed in Medical science in our developing country
    1 To improve patient psychology by keeping smile on patients face
    2 To strengthen Health Management system
    etc.
    Further the sincere efforts taken by you and working day and night with Covid patients that to in PPE kit is not easy task.
    It’s really proud for our family
    Pradnya and Nitesh

  2. **डॉ.आपल्या नावातच प्रशंसा आहे,!**
    आजारी माणसांच्या चेहऱ्यावर आनंद पाहणे, सेवाभावी वृत्तीने त्यांची सेवा करण्याचे आपण दिलेले वचन व शाश्वती आम्हा समस्थ दुधेरे करांना अभिमानास्पद आहे!. कोरोना काळात मृत्युची टांगती तलवार डोक्यावर घेऊन अविश्रांत परिश्रम घेऊन लोकांचे प्राण वाचविण्यात डाॅक्टरी पेशा **देवासमानच**भासू लागला आहे. आपल्या लेखनाची प्रशंसा करताना शब्दच अपुरे पडतील.
    **आई तुळजाभवानी, ग्रामदेवतेकडे आपल्या उदंड आयुष्या करीता प्रार्थना करतो व सुयश चिंतीतो!.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments