आज डॉक्टर दिन आहे. यानिमित्ताने काही कवितांद्वारे त्यांचे ऋण व्यक्त करणाऱ्या काही कविता…सर्व डॉक्टर मंडळींना, त्यांच्या सहकाऱ्यांना आणि परिवाराला डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
१. ‘डॉक्टर्स डे’
निसर्ग नियमाने मनुष्य घेतो जन्म
जैविक प्रक्रियेतून आलेल्या जीवाला
आजार, रोगराई नाही चुकत
आई काळजी घेते, डॉक्टर दवा देतात…
आई बाळासाठी प्रार्थना करते
डॉक्टर रुग्णांस सल्ला देतात
दोघे ही जीवाची बाजी लावतात
रुग्ण बरा व्हावा हीच अपेक्षा दोघांची…
पण कधी डॉक्टर देवदूत बनतात
लंगड्याला पाय देऊन चालवतात
आंधळ्याला नेत्र देऊन दृष्टी देतात
मनोरुग्णास आधार देऊन माणसात आणतात…
खरा देव कुणीच पाहिला नाही
तो आहे नाही हे ही माहित नाही
पण माणसाच्या रुपात देव भेटतो
हे मात्र कुणी ही नाकारु शकत नाही…!!!
— रचना : प्रभा वाडकर. लातूर
२.
वैद्यकीय व्यवसाय आहे
अक्षय व्रत
सेवा करिता मानवाची अखंडित IIधृII
रुग्णसेवेत सदा
राहता कार्यरत
मनुष्य प्राण्याला देता
जीवन दान II1II
कधी न पाहता वेळ काळ
राहे सेवेत
कुणी निंदा-वंदा
कार्यात राहता मग्न II2II
समाज आरोग्य आहे
तुमचे हातांत
धन्वंतरीचे तुम्ही पाईक
योग्य वेळी निर्णय II3II
सर्व औषधे ठेवता स्मरणांत
तपासून करता योग्य निदान
रुग्णां बरे वाटता
देती घेती आनंद II4II
— रचना : अरुण गांगल. कर्जत – रायगड,
३.
काळापासून पुरातन
डॉक्टरां देव मानले
धन्वंतरी कृपा करी
रोग कितीक पळाले
आतांचं काय चालले
डॉक्टरा वरती हमले
कसली विकृती अशी
संस्कृती सर्व विसरले
जीव घालून धोक्यात
जे अमृत घेऊन आले
अमानुषतेचे हलाहल
आम्ही त्यांना पाजले
एकवीसाव्या शतकां
आदि मानव उपजले
तुळशी वृंदावनामध्ये
भांगेचे रोप निपजले
जरासे दुखले खुपले
डाॅक्टर देवदूत वाटले
बील भर गच्च भरता
म्हणे व्यापारी भेटले
डाॅक्टर दिन शुभेच्छा
उत्साहसमुद्र उसळले
दुजे दिनी लाटा शांत
रौद्र सुप्तवे फेसाळले
— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
४.
एक जूलै खास दिन
दिन राष्ट्रीय डॉक्टर
मानवता सेवकांचा
करु सन्मान सत्वर
रोगी पीडितांची सेव
व्रत निष्ठेनं पाळती
नागरिकांचे आरोग्य
तळहाती सांभाळती
अहर्निश सेवा चालू
जीव धोक्यात घालून
नका करु दृष्टी आड
डॉक्टरांचे योगदान
राष्ट्र निरोगी राखाया
सदा चाले धावपळ
असा सेवा धर्म त्याला
नाही काळ नाही वेळ
सा-या डॉक्टर जनांचे
आज कृतज्ञ होऊया
जीवदान देणा-यांना
दीर्घआयुष्य चिंतूया
— रचना : सुधीर शेरे. डोंबिवली
आणि डॉक्टर म्हटले की हमखास आठवते ती सिस्टर ! तर या सिस्टरसाठीही एक कविता…..
५. सिस्टर
कमी नसते रक्ताच्या नात्यापेक्षा,
इस्पितळातली सिस्टर !
ऑपरेशन असो की बाळंतपण
सिस्टर विना नाही इस्पितळ !
सेवा सुश्रुषा करण्याचे.
कुणा आहे इतुके बळ !
अडीअडचणी बाजूस ठेवुनी,
ड्युटीवर ती जाते !
घरदार सांभाळूनी उत्तम,
पेशंटची काळजी घेते !
बरे होवून जाताना पेशंट,
थॅन्क्स तरी म्हणतो का ?
आभाराचे ग्रीटिंग कार्ड,
तुमच्यासाठी आणतो का ?
कर्त्यव्य असेल तुमचे हि,
नसेल तुम्हास आशा !
रोज येतात नवीन पेशंट,
पाहता तुम्ही दशा !
रक्त लावायचे, काढायचे,
चढवायचे रोज सलाईन !
हळूवार हाताने करता,
काम असते फाईन !
आभार मानन्या सिस्टर्सचे,
कविता घेवून आलो !
प्रणाम करतो तुम्हा सर्वांना,
नतमस्तक मी जाहलो !
— रचना : गजाभाऊ लोखंडे. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800