तरुणांनी नोकरीच्याच मागे न लागता उद्योजकतेची कास धरावी असे आवाहन उद्योजक श्री पोपटलाल डोर्ले यांनी केले. सांगली येथे आयोजित “समाजभूषण संवाद” कार्यक्रमात ते बोलत होते.
पूर्वी पेक्षा आता उद्योजकतेसाठी अतिशय अनुकूल वातावरण निर्माण झाले असून शासनाच्या, विविध महामंडळाच्या, बँकेच्या अनेक योजना आहेत. आपली आवड, शैक्षणिक पात्रता, अनुभव, बाजारपेठ याचा अभ्यास करून नियोजन पूर्वक प्रयत्न केले तर उद्योग व्यवसायात यश हमखास मिळते, हे श्री डोर्ले यांनी स्वानुभवाच्या आधारे स्पष्ट केले.
समाजभूषण पुस्तकाचा गौरवपूर्ण उल्लेख करून श्री डोर्ले म्हणाले की, या पुस्तकात सर्व स्तरातील यशस्वी स्त्री व पुरुषांच्या यशोगाथा आहेत ज्या पुढील पिढीला निश्चितच प्रेरणा देणाऱ्या आहेत. आज ही सर्व मंडळी यशस्वी वाटचाल करत आहेत याबद्दल त्यांनी आनंद व समाधान व्यक्त केले.
श्री डोर्ले यांच्या प्रेमळ आग्रहामुळे सांगली येथील त्यांच्या औषध निर्मिती कारखान्यात जाण्याचा सुवर्ण योग आला. त्यावेळी त्यानी हा मनमोकळा संवाद साधला.
यावेळी बोलताना लेखक श्री देवेंद्र भुजबळ यांनी आजच्या कठीण स्पर्धेच्या परिस्थितीची जाणीव करून देत, आजची तरुण पिढी अपयश पचवू शकत नाही व त्यामुळे आत्महत्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे ही अतिशय चिंताजनक बाब आहे असे सांगून कितीही कठीण परिस्थिती असली तरी तिचा सामना धीराने व धैर्याने केले तर यश निश्चितच आहे असे प्रतिपादन केले.
प्रारंभी “समाजभूषण” पुस्तकाचे सांगली विभागीय प्रकाशन श्री डोर्ले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. प्रथम सर्वांनी आपापला परिचय करून दिला.
प्रा सुभाष दगडे यांनी सर्वांचे आभार मानून समाजभूषण पुस्तकासाठी शुभेच्छा दिल्या. असा हा संवादाचा कार्यक्रम सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
२२ देशात औषध निर्यात करणारे एव्हढे मोठे उद्योगपती असूनही श्री डोर्ले यांनी अतिशय आनंदाने केलेले स्वागत, त्यांचा शांत स्वभाव, प्रेमळ बोलणे यामुळे उपस्थितांमध्ये आपलेपणाची भावना सहज निर्माण झाली.
या संवाद उपक्रमात दि.जैन कासार समाज संस्था संघटक प्रा.सुभाष दगडे, सांगली जिल्हा अध्यक्ष सागर घोंगडे, सर्वश्री नितीन मांगले, महावीर मांगले, दिलीप केंबळे, सचिन घोंगडे, किरण मांगले, आनंद वणकुद्रे, मंगेश गरगट्टे, सहलेखिका रश्मी हेडे, न्यूजस्टोरीटुडे च्या सह संपादक अलका भुजबळ, समाजसेवी दाम्पत्य आशाताई व अशोक कुंदप आदी मान्यवर उपस्थित होते.
एका दिलखुलास संवादाच्या मधुर आठवणी घेऊन सर्व मंडळी रवाना झाली.
– टीम एनएसटी 9869484800