पद्मभूषण राम प्रधान यांचा, आज ३१ जुलै २०२१ रोजी प्रथम स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्य, कर्तृत्वाचे हे स्मरण…..
रामचंद्र दत्तात्रय प्रधान यांचा जन्म (आषाढी एकादशी) २७ जून १९२८ रोजी दादर, मुंबई येथे झाला. त्यांचे आजोळ रायगड जिल्ह्यातील नागोठणे. त्यांची आई वत्सला देशपांडे लग्नानंतर आनंदीबाई दत्तात्रय प्रधान झाल्या. मुंबई – गोवा हमरस्त्यावर “आनंदीबाई प्रधान सायन्स कॉलेज” आहे. ते स्थापन करण्यासाठी १९९४ साली राम प्रधान यांनी आईच्या नावाने मोठी देणगी दिली.
राम प्रधान यांचे प्राथमिक शिक्षण दादर येथील “छाबिलदास लल्लूभाई प्रायमरी स्कूल” मध्ये झाले.
तिसरी ते सातवी पर्यंतचे शिक्षण दिल्ली येथील “हार्ट कोर्ट बटलर” या शाळेत झाले. मे ते ऑक्टोबर या कालावधीत ही शाळा सिमला येथे भरत असे. सातवी नंतर वडिलांची बदली झाल्यामुळे राम प्रधान पुणे येथील सदाशिव पेठेत राहू लागले. त्यांनी “न्यू इंग्लिश स्कूल”, नानावाडा येथे प्रवेश घेतला. तेथे आठवी ते अकरावी म्हणजे म्याट्रिक पर्यंतचे शिक्षण घेतले.
राम प्रधान यांनी सुरवातीला पुणे येथील स .प. कॉलेज मध्ये आर्टस कोर्ससाठी प्रवेश घेतला. परंतु काकांच्या आग्रहाखातर “फर्ग्युसन कॉलेजमध्ये” प्रवेश घेतला. त्याच दरम्यान वडिलांची बदली झाल्यामुळे राम प्रधान चार वर्ष होस्टेल मध्ये राहिले. गणित विषय घेऊन ते प्रथम श्रेणीत बी. ए. झाले. त्यानंतर त्यांनी एम .ए.करण्याचा विचार केला होता परंतु आईच्या आजारपणामुळे त्यांनी प्रवेश घेतला नाही . त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्पर्धात्मक परीक्षा १९५१ साली दिली व ते पास झाले. १ एप्रिल १९५२ रोजी आय .ए. एस. प्रशिक्षणासाठी ते दिल्ली येथे गेले.
१७ जानेवारी १९५४ रोजी सदाशिवराव उर्फ बाबासाहेब व सौ. सरला गडकरी यांची कन्या लोपामुद्रा हिच्या बरोबर राम प्रधान विवाहबद्ध झाले.
राम प्रधान हे १९६० ते १९६५ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व तद्नंतर देशाचे संरक्षणमंत्री झालेले यशवंतराव चव्हाण यांचे सचिव होते. १९६६ ते १९७७ या काळात राम प्रधान यांनी जिनिव्हा येथे भारताचे प्रतिनिधित्व केले. १९७७ – १९८१ या काळात ते महाराष्ट्र राज्याचे गृहसचिव आणि १९८२ – १९८५ मध्ये राज्याचे मुख्य सचिव होते. १९८५ -८६ मध्ये त्यांनी भारताचे गृहसचिवपद भूषवले. त्याच काळात पंजाब, आसाम व मिझोराम हे महत्वाचे करार त्यांनी केले. भारतीय प्रशासकीय सेवेत ३४ वर्षे सेवा करून ३० जून १९८६ रोजी ते निवृत्त झाले.
कर्तुत्व संपन्न सेवेबद्दल १९८७ च्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती यांच्या हस्ते राम प्रधान यांना “पद्मभूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निवृत्ती नंतर कॉंग्रेस तर्फे त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले होते तसेच विविध समित्यांवर नियुक्त करण्यात येऊन त्यांच्या अनुभवाचा फायदा घेण्यात आला.
राम प्रधान याची अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल नियुक्ती करण्यात आली होती. तेथे सुध्दा त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.
राम प्रधान यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेत बारा पुस्तकं प्रकाशित करून त्यांचे शब्द सामर्थ्य दाखवले आहे. ज्यांना राम प्रधान यांच्या बद्दल अधिक माहिती हवी असेल त्यांनी त्यांचे “माझी वाटचाल” हे आत्मचरित्र जरूर वाचावे. राम प्रधान यानी ३१ जुलै २०२० रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. अशा या थोर प्रशासकास विनम्र अभिवादन.

– लेखन : दिलीप प्रभाकर गडकरी
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.