Monday, July 14, 2025
Homeलेखथोर शिवशंकरभाऊ

थोर शिवशंकरभाऊ

श्रीसंत गजानन महाराज संस्थान, शेगावचे अध्यक्ष माननीय शिवशंकरभाऊ पाटील यांचे काल वृद्धापकाळाने दु :खद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…..

साधारणपणे ३ वर्षांपूर्वी राज्य अधिस्वीकृती समितीची बैठक शेगाव येथे झाली होती. त्यावेळी सर्व सदस्यांशी भाऊंनी मनमोकळा संवाद साधला होता. एरवी ते प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहिले. अखेरपर्यंत ते अत्यन्त निरपेक्षपणे सेवा करीत राहिले. सेवेचा नवा आदर्श त्यांनी निर्माण केला.

भाऊंचा जन्म १२ जानेवारी १९४० रोजी झाला. ३१ ऑगस्ट १९६२ पासून ते संत श्री गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त झाले. पुढे त्यांनी आपल्या कार्य कर्तृत्वाने संस्थानची प्रचंड मोठी ओळख निर्माण केली. श्री गजानन महाराज संस्थानचा भव्यपणा, तिथली टापटिप व्यवस्था आणि निष्ठेने काम करणार्याची तन्मयता तिथे गेल्याशिवाय कळणार नाही.

त्या मंदिरात सेवा करण्यासाठी हजारो जणांची प्रतिक्षा यादी आहे. भाऊंची ही कमाल होती की तीन हजार सेवेकरी त्या मंदिराच्या परिसरात तुम्हाला सगळी कामे श्रध्देने काम करणारे दिसतील. भाऊंनी हे परिवर्तन घडविले.

संस्थानच्या कारभाराची सुत्रे भाऊंच्या हातात येण्यापुर्वी या संस्थानची वार्षिक उलाढाल पंचेचाळीस लाख रुपयांची होती. भाऊंनी ही उलाढाल जवळपास १५० कोटी रुपयापर्यंत आणली. त्यातूनच महाराष्ट्रातले सर्वात्कृष्ठ इंजिनिअरिंग कॉलेज तिथे उभे राहिले. आनंदसागर सारखे जागतिक किर्तीचा नंदनवन ठरेल, असा भव्य बगिचा उभा राहिला.

आनंद सागर, शेगाव

शब्दामध्ये वर्णन न करता  येण्यासारखे काही विषय सांगून समजत नाही. ते प्रत्यक्ष पाहण्याचा, ऐकण्याचा आनंद वेगळाच.

आनंद सागर, शेगांव

शिवशंकरभाऊ कोणालाही मुलाखत देत नव्हते. व्यक्तिगत प्रसिद्धी त्यांना नको होती. अमेरिकेतल्या सिटी बॅंकेचे विक्रम पंडित हे गजानन महाराजांचे भक्त, ते नेहमीच शेगावला येतात.

भाऊंचे काम पाहून ते असे थक्क झाले की त्यांनी भाऊंना सांगितले या सगळ्या प्रकल्पासाठी किती कोटी हवे तेवढे सांगा, असे विचारले. विक्रम पंडितांनी त्यांच्या बॅंकेमार्फत किती कोटी द्यावेत ? तब्बल ७०० कोटी ! कोण येवढे पैसे देईल, देणार्याची दानत मोठी असेल, पण घेण्याराचा प्रामाणिकपणा आणि सचोटी माहीत असल्याशिवाय ऐवढी प्रचंड रक्कम कोणती बॅंक देऊ शकेल ? लिखापढी नाही, जमीन नाही, कोणती मालमत्ता बॅंकेकडे गहान नाही, आणि एक भक्त आपल्या बॅंकेचा ऐवढा प्रचंड पैसा भाऊंच्या विश्वासावर देतो.

विक्रम पंडितांनी ७०० कोटी रुपये दिले. विश्वस्त मंडळाने आराखडा तयार केला की किती पैसे लागतील याचा हिशोब केला. किती पैसे परत फेडू शकू ते गणीत बसवले आणि अस ठरवलं की ७०० कोटी आपल्याला नकोत फक्त ७० कोटी रुपये घ्यायचे. महाराजांचा असा संदेश असायचा की गरजे पुरते घ्या आणि जे घ्याल ते परत करा. आम्ही विचार केला गरज ऎवढीच आहे, आणि फक्त ७० कोटी घेतले. त्याची परतफेडही केली. गजानन महाराज यांच्या प्रेमापोटी विक्रम पंडितांनी ही रक्कम दिली, त्याचा विनियोग कुठेही चुकीचा होणार नाही, याची काळजी घेतली आणि म्हणूनच त्यांचा विश्वास बसला.

एका मुख्यमंत्र्यांनी त्यांना पद्मश्री पुरस्कारासाठी माहिती पाठविण्याची विनंती केली होती. ती विनंतीही त्यांनी नम्रपणे अव्हेरली होती. पद्मश्री घेऊन मी काय करू ? दिल्लीला जाण्यायेण्यामुळे उगाचच सेवेत खंड पडेल, असे त्यांचे विचार होते. भाऊ म्हणायचे, “मला कशाचीही हाव नाही, महाराजांनी सेवा करायला सांगीतली न बोलता सेवा करायची, मी संस्थानचे पाणी, चहा घेत नाही घरून पाणी घेऊन येतो. ही महाराजांची शिकवण आहे, आपण देण्यासाठी आहोत घेण्यासाठी नाही, त्यामुळे कसला लोभ नाही, आपण चेतन आहोत, कशाचा लोभ करायला हवा ? पैशाने माणसाची कधी किंमत होत नाही आणि तशी वस्तूने पण होत नाही. माणसाला नाचवणारी माया आहे, आणि मायेला नाचवणारी भक्ती आहे श्रध्दा आहेत. आम्ही माया स्वीकारत नाही. आम्ही श्रध्दा स्वीकारतो ते सुत्र आम्ही पाळले.”

भाऊंनी कधी जाहिरात केली नाही. लोक त्यांना सांगत भाऊ, आनंदसागर पाहण्याची फी ३०० रुपये करा. लोक आनंदाने देतील. ते म्हणायचे अशा पध्दतीने पैसा मिळवायचा नाही आणि मिळाला तरी टिकायचा नाही. त्यांनी १५ रुपये अशी माफक फी ठेवली. संस्थानच्या वार्षिक उलाढालिपैकी त् १३ टक्के पैसे मानवसेवेवर खर्च केला जातो. त्यात रुग्णालये आहेत, औषधे आहेत. १० टक्के रक्कम बाजुला काढुन नवीन बांधकामासाठी ठेवल्या जाते.

आनंद सागर, शेगांव

भक्त निवास अशी बांधली आहेत की बघत राहावी. थोर समाजसेवक बाबा आमटे कुठेच कधी राहत नव्हते. पण ते फक्त इथेच राहायचे.

भाऊंनी शेगावला केवळ देशातीलच नव्हे तर जगातील एक आदर्श संस्थान बनवले. भाऊ आपण कायम आमच्या स्मरणात राहाल. आदरणीय भाऊंना विनम्र अभिवादन.

– देवेंद्र भुजबळ. निवृत्त माहिती संचालक 9869484800.

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. जय शिवशंकर भाऊ शिवशंकर भाऊ पाटील यांचे कार्य यांचे कार्य खरोखरीच महान आहे. यांच्या कार्याची व त्यागाची बरोबर कोणीही करू शकत नाही. त्यांचे नम्रपणे जीवन हा त्यांचा महान संदेश आहे.
    आपण त्यांची खूप चांगली ओळख करून दिली आहे त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन.

  2. महान वंदनीय श्री.शिवशंकरभाऊ पाटील हे सेवाव्रत कसे असते, ह्याचे सर्वोत्तम उदाहरण.
    आम्ही शेगावला नियमित जात होतो. तेव्हां काहीना काही निमित्ताने भाऊंची गाठ पडायची. कधीही मी एवढ्या ‘श्रीमंत’ संस्थानाचा विश्वस्त आहे, ह्याचा उल्लेख काय नामोनिशाणीही त्यांच्या
    वागण्या-बोलण्यात आढळला नाही. असे निस्पृह, निस्वार्थी सेवावर्ती फक्त शेगाव संस्थानातच आढळुन येतात.
    श्री शिवशंकरभाऊ ह्यांना विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली.
    💐🙏💐🙏🙏💐💐🙏🙏

  3. शेगांवचे कर्मयोगी शिवशंकरभाऊंना विनम्र अभिवादन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments