Thursday, September 18, 2025
Homeलेखदर्पणकार बाळशास्त्री जांभेकर

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर

बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील “दर्पण” हे वृत्तपत्र ६ जानेवारी १८३२ रोजी प्रकाशित केले होते. हा दिवस दरवर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतोत्या निमित्ताने हा विशेष लेख..

भारतात इंग्रजांच्या आगमनानंतर आधुनिक शास्त्रांशी नाते जुळलेली विद्वानांची पहिली पिढी पुढे आली. त्या पिढीचेच प्रतिनिधित्व बाळशास्त्री जांभेकर करत होते .
ज्ञानाच्या अनेक शाखा अनेक भाषांतून अवगत आहेत आणि मानवाच्या भौतिक प्रगतीसाठी या ज्ञानाने संपन्न होणे गरजेचे आहे; हे त्या पिढीला उमगू लागले होते.

इंग्रजीचा प्रसार हा फक्त राज्यकर्त्यांच्या माध्यमातूनच होत नव्हता तर तो ख्रिस्ती धर्म प्रसारकांच्या माध्यमातूनही होत होता. त्यामुळे ख्रिस्ती धर्माचे गुणगान गाताना येथील समाज, त्यातील बर्‍या वाईट चाली रिती आणि अनिष्ट समजुती आणि प्रथा यावर होणारे हल्ले या नव शिक्षितांच्या दृष्टीस येत होते.

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्रातील पारंपरिक विचारांच्या पलीकडे जाऊन नव्याने विचार करणार्‍या पहिल्या पिढीचे प्रतिनिधी होते.

बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म कोकणातील देवगड जवळील पोंभुर्ले या गावी १८१२ साली झाला. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ते आधुनिक शिक्षणासाठी मुंबईत आले. त्यांनी इंग्रजीचा अभ्यास सुरू केला.

बाळशास्त्रींना एकूण ९ भाषा अवगत होत्या. अवघ्या १८ व्या वर्षी बापूशास्त्री छत्रे यांच्या आश्रयाने त्यांनी विद्याभ्यास पूर्ण केला. बाळशास्त्रींची हेंदवी शाळा पुस्तक मंडळाचे भारतीय सचिव म्हणून नेमणूक झाली.

वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी म्हणजेच १८३१ साली त्यांनी ग्रंथ लेखनास आरंभ केला. वयाच्या २० व्या वर्षीच मराठी वृत्तपत्र सृष्टीची मुहूर्तमेढ रोवणारे “दर्पण” वृत्तपत्र सुरू केले.

बाळशास्त्रींना बंगालीही अवगत असल्याने त्यांच्यावर बंगालमधील सामाजिक चळवळींचा प्रभाव होता. दर्पण हे तसे दोन भाषिक वृत्तपत्र होते. त्यात मराठी मजकूर असला तरी त्याच्या शेजारी इंग्रजीतही मजकूर प्रकाशित होत असे.

सुरुवातीस पाक्षिक स्वरूपात प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र वाचकांच्या आग्रहामुळे चारच महिन्यांत साप्ताहिक झाले आणि दर आठवड्यास प्रकाशित होऊ लागले. दर्पण नाव निवडण्यामागे बंगालमध्ये प्रकाशित होणार्‍या समाचार दर्पण चा प्रभाव असण्याची शक्यता आहे.

दर्पणचा उद्देश पाश्‍चात्त्य विचाराची गोडी मराठी समाजास लागावी, समृद्धी आणि स्वकल्याण या संबंधी विचार करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, सामाजिक सुधारणांवर विचार मंथन व्हावे हा होता.

सामाजिक सुधारणांसंबंधी आग्रही असलेले दर्पण वाचकांचे स्वातंत्र्यही तेवढेच महत्त्वाचे मानत असे. त्यामुळे संपादकीय धोरण आणि विचार या विरोधातील मतांनाही त्यात योग्य स्थान मिळत होते. संपादकीय चुकांबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याचे मोठेपणही दर्पणकारांकडे होते, हे त्याचे लक्षणीय वैशिष्ट्य होते.

इंग्रजी विद्यांचा विचार करताना भारतीय विद्या आणि विद्वत्तेचा रास्त अभिमानही दर्पण बाळगत होते. बुद्धिमत्ता आणि विचारशक्ती ही इंग्रजांची मक्तेदारी नाही, यावर दर्पणकारांचा विश्‍वास होता. दर्पणचा खप त्या काळात ३०० प्रतींच्या जवळपास होता.

१८४० मध्ये मराठी साक्षरांमध्ये लोकप्रिय झालेले दर्पण अनाकलनियरित्या बंद करण्यात येऊन युनायटेड सर्व्हिस गॅझेट मध्ये विलीन करण्यात आले. उण्यापुर्‍या ८ वर्षांत आपली छाप उठवून दर्पण अंतर्धान पावले. पाठोपाठ १७ मे १८४६ रोजी दर्पणकारांचे निधन झाले. अल्पायुषी असूनही त्यांनी केलेले कार्य आजही आपल्याला दिशा देत आहे, यावरूनच त्यांची थोरवी दिसून येते.

महाराष्ट्र शासनातर्फे त्यांच्या नावाने सर्वोच्च उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देण्यात येतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुरले या त्यांच्या गावी भव्य स्मारकही उभारण्यात आले आहे.

अशा या थोर देश भक्तास, मराठी वृत्तपत्र सृष्टीच्या जनकास भावपूर्ण श्रद्धांजली.

देवेंद्र भुजबळ

– देवेंद्र भुजबळ. निवृत्त माहिती संचालक

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. भांडारकर मॅडम व वाणी सर,
    आपल्या दिलखुलास प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

  2. आदरणीय भूजबळ साहेब दर्पणकारांबद्दल छान
    माहिती देऊन त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली.
    इतकेच नव्हे तर त्यांचा मौलिक आदर्श समोर ठेवून
    आपण न्यूज स्टोरी टुडे घ्या माध्यमातून त्यांच्यासारखे
    देशकार्य आपण तळमळीने करीत आहात.एका विशिष्ट
    ध्येयाने झपाटलेलं आपलं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व खूपच
    वंदनीय आहे.वैचारिक सुगंध देणारं आपण चंदनी खोड
    आहात.तुम्ही ज्या खडतर प्रवासातून पुढे आलात तो
    संपूर्ण प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे.व अशा अनेक
    व्यक्तिंनाही तुम्ही टुडेच्या माध्यमातून वाचकांसमोर
    आणत आहात.समाज घडवणारे आपण दीपस्तंभ आहात.आपल्या या मौलिक राष्ट्र सेवेचा
    वाटतो आम्हा खूप अभिमान
    आपण आहात देशाची शान
    जनतेच्या ह्रुदयात मिळवलत
    आपण आदराचं स्थान
    पत्रकारिता दिनाच्या आपणास
    खूप खूप शुभेच्छा
    प्रभूकृपेने पूर्ण होवोत
    आपल्या सर्व इच्छा
    राजेंद्र वाणी, दहिसर, मुंबई.

  3. श्री .देवेंद्र भुजबळ यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयीची मौलीक माहिती या लेखातून दिली आहे.
    खरोखरच दर्पण हे तसं अल्पायुषी ठरलं!तरी त्या काळात
    लोकजागृतीचं आणि समाजाला बदलत्या वाटेवर नेण्याचं
    महत्वाचं काम त्या माध्यमातून नक्कीच झालं.कृतज्ञतेच्या भावनेतून
    ६ जानेवारी हा महाराष्ट्र पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो हे योग्यच आहे!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा