आज भौतिक, तांत्रिक, वैज्ञानिक प्रगती खूप होत चालली आहे. पण दिवसेंदिवस माणूस आपल्याच माणसांपासून दूर जात आहे. हे लक्षात घेऊन दिवाळीच्या निमित्ताने केवळ डिजिटल शुभेच्छा न देता शक्य असल्यास समक्ष भेटून आणि ते शक्य नसल्यास फोन वर बोलून तरी शुभेच्छा देऊ या, असा मोलाचा सल्ला देत आहेत, महाराष्ट्र शासनाच्या राज्य वस्तू कर खात्यातील उपायुक्त, सतत सामाजिक कार्यात अग्रेसर, एक संवेदनशील व्यक्तीमत्व श्री मेहबूब कासार. श्री मेहबूब कासार यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारात हार्दिक स्वागत आहे.
– संपादक
दिवाळी ! दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण, दिवाळी म्हणजे तेजस्वी ज्ञानाची उपासना करण्याचा सण, दिवाळी म्हणजे सर्व अंधार उजळून टाकण्याचे हे पर्व !! भारतीयांची मने जवळ आणणारा, संपूर्ण भारतीयांची मने उजळवून टाकणारा हा सण. यानिमित्ताने संस्कृतीने उजेडाच्या अंगणात याच उत्सवामध्ये मांगल्ये पसरायचे असते. एकमेकांची मने जुळवायची असतात, एकमेकांना समजून घ्यायचे असते.
खरे तर आजच्या या युगात सर्वच नाती गढूळ होत चालली आहेत. तरी या दिवाळीच्या उजेडाच्या वातावरणात काही दिवस तरी आनंद तरंगाचे बळ माणसाला निश्चितच मिळत असते यात काही शंका नाही. वर्षातील विविध जाती-धर्माचे सण म्हणजे जीवनाच्या आनंद यात्रेतील एकेक थांबा असतो. या आनंदी यात्रेत ना कोणी श्रीमंत असतो, ना कोणी गरीब, ना कोणी छोटा, ना कोणी मोठा असतो, ना त्यांच्यामध्ये आपपरभाव असतो. सर्वजण अशावेळी एकमेकांसोबत आनंद लुटत असतात, दुसऱ्याला आनंद देऊन स्वतःचाही आनंद द्विगुणीत करीत असतात.
अशा या आनंदी यात्रेच्या थांब्यावर आपण सर्वांनी राग, द्वेष, मत्सर असूया, अभिमान याला या थांब्यावर सोडून देऊन पुढे जाण्याची जीवनामध्ये प्रेरणा घ्यायची असते. अशावेळी भेटलेली अनेक परिचित माणसे आपल्या सभोवतालच्या वातावरणात हिरवळ आणून आपली प्रसन्नता, आनंद, द्विगुणित करत असतात.
असे म्हणतात की जे हात तुम्हाला गुलाबाचे फुल देतात त्या हाताला गुलाबाचा थोडासा तरी सुगंध हा लागलेलाच असतो. याचा अर्थ स्पष्ट आहे की जेव्हा आपण एक सर्वजण एक दुसऱ्याचे आयुष्य जीवन आनंदी सुखी होण्यासाठी, वेगवेगळ्या स्वरूपात आपण या आनंद यात्रेत सहभागी होतो तेव्हा नकळत आपलाही आनंद द्विगुणीत झालेला असतो.
महाराष्ट्राची ही अनेक भूमी संत, पराक्रमी, वीर, त्यागी समाज सुधारक, देशभक्त यांच्या वास्तव्याने पुढे झाले आहे. हे संत, पराक्रम वीर व समाज सुधारक हीच आपली प्रतीके आहेत. त्यांनीच महाराष्ट्राच्या संस्कृतीची जोपासना केली व तिचा वारसा आपल्या हाती दिला आहे. हा अमोल ठेवा आपल्या हृदयात जपून ठेवून त्याचा सतत विकास घडवून आणून आपण आपले दिवाळीच्या या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये आपल्या पावलापुरता तरी प्रकाश निर्माण करण्याचा संकल्प करूया या वैयक्तिक प्रकाशामधूनच समाज घडणीसाठी सामूहिक ऊर्जा निर्माण होईल अशी आशा करूया. जीवन या निमित्ताने समृद्ध बनवण्याचा प्रयत्न करूया. तसेच जीवनामध्ये प्रश्न अनेक असले तरी नकारापेक्षा स्वीकारण्याची ज्योत ठेवण्याचा प्रयत्न करूया. दररोजची आपल्या कामालाच पूजा मानण्याचा दीप मनामध्ये तेवत ठेवण्याचा प्रयत्न करू या. एकमेकांच्या सुखदुःखाच्या गोष्टीत स्वतःचे सुख शोधण्याची कला अवगत करण्याचा या दीपावली निमित्ताने प्रयत्न करूया.
या दिवाळीत आपल्याच मनातील अंधारा कोपरा उजळून टाकूया. तसेच, बाहेरचा जो दिसतो तो अंधार तो दूर करूया. त्यासाठी आप्तेष्टांशी, मित्र मैत्रिणींशी मनापासून बोलूया. संवादाचे पूल बांधू या. फक्त डिजिटल शुभेच्छा देण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून आणि ते शक्य नसल्यास फोन वर बोलून अधिक आनंद मिळवू या. प्रकाशाचा हा सण साजरा करतानाच पुढील जीवन प्रवासही अधिक प्रकाशमान करण्याचा या निमित्ताने निश्चय करू या.
दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सर्वांना लाख लाख शुभेच्छा.
— लेखन : मेहबूब कासार.
उपायुक्त, राज्य वस्तू कर विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
अत्यंत मोलाचा सल्ला दिलात. असेच लिहीत रहा. आपल्यालाही दिवाळीच्या शुभेच्छा.