१. “दिवाळीची मेजवानी”
माणसांचे जीवन असावे सप्तसूरांसारखे
एकमेका आनंद देत छान बहरणारे असावे
षड्ज,गंधार,निषाद,खर्ज, मधुर नाद,ठुमरी
गात गात, लुटावी फराळाची लज्जत सारी
काही रागस्वर मंद्र,कोमल,तारसप्तकातील
पदार्थांचीही तिच रीत, तिखट,गोड,चविष्ट
माणसांचाही राग असाच, बनवावा अनुराग
रागदारी नि पदार्थांचा घ्यावा उत्तम आस्वाद
जीवनाची नि पदार्थांची असते अशी पर्वणी
साजरी करावी एकमेका सांभाळून सर्वांनी
जीवनमैफिलीत आनंदीस्वरांचं स्नान घडावं
खाद्यमैफिलीत उत्तम चवीचं स्नान घडावं
संगिताचा उत्तम स्वाद घ्या कानाने, मनाने
पदार्थांचा उत्तम स्वाद घ्या तोंडाने, गोडीने
— रचना : मधुकर ए. निलेगावकर. पुणे
२. जुन्या पिढीला मागे टाकून
नव्या पिढीने जग जिंकावे
यशगाथा त्या ऐकत असता
सुस्वर माझ्या कानी यावे
आप्त स्नेहीजन यांचे अनुभव
कटू गोड वा कसेही असले
प्रतिध्वनीतुन मनात त्यांचे
सुस्वर माझ्या कानी यावे
राजपटावर चमकून जावे
न्याय नीतिला सांभाळावे
असे कुणी असतील तयांचे
सुस्वर माझ्या कानी यावे
डोंगर हिरवे गार असावे
दुथडी भरूनी नदी वहावी
फुला फळांवर पक्षी दिसावे
सुस्वर माझ्या कानी यावे
युद्धाचे संपवून तांडव
बुद्धाने हे जग जिंकावे
विजयाच्या त्या गीता मधले
सुस्वर माझ्या कानी यावे
सुस्वर ऐसे घेऊन नंतर
नव्या युगाची पहाट यावी
ज्ञानदीप उजळून मनीचे
दीपावली सर्वांची व्हावी
— रचना : सुनील देशपांडे.
३. दिवाळी
आली दिवाळी आली दिवाळी
स्वागत करुया सारे मिळुनी
कामे सारी घेऊ वाटुनी
खेळीमेळीत जाऊ रमुनी
अंगणात त्या सडा घालूया
शेणाने सुंदर सारवूया
रंगीत रंगावली काढूया
फुले भोवताली पसरवूया
नवीन कपड्यांमधे मिरवूया
नृत्य गायनी रमून जावूया
संध्यासमयी दीप लावूया
दीपावलीचे पूजन करूया
पणत्यांनाही सजवून ठेवू
रंगीत रंगी न्हाऊन ठेवू
दारे खिडक्यांमध्ये ठेवू
दीपावलीची गंमत चाखू
फुलबाजीची चमचम बघता
कुणी उडवितो धुम् फटाका
नरसाळ्यातून कारंजी उडता
भुईचक्रही फिरती गरगर करता
देवापुढती प्रसाद ठेऊनी
आई देतसे हातात थाळी
लाडू, करंजी, शेव नि चकली
अनरसे, चिरोटे अन् कडबोळी
मजेत करिता फराळ सुंदर
गोड, तिखट चव राही जीभेवर
दरवर्षी या दीपावलीने
नात्यांमधले मिटते अंतर
— रचना : स्वाती दामले. बदलापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800